आदिवासी साहित्य संमेलन...

अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचे प्रमुख चंद्रकांत घाटाळ ह्यांच्या अनुजा सेवा संस्था कासा व आदिवासी साहित्य परिषद पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने ०५ एप्रिल २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील कासा येथे पहिले आदिवासी साहित्य संमेलन पार पडले. सदर संमेलन ग्रामपंचायतच्या बिरसा मुंडा या सभागृहात संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व पर्यावरण तज्ञ श्री. देवचंद महाले हे होते. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू-तलासरी विधानसभेचे आमदार श्री. विनोद निकोले होते. संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आलेले. पहिल्या सत्रात बोलीभाषा व आदिवासी साहित्याचे विविध आयाम तर दुसऱ्या सत्रात बोली भाषेत लिहिणाऱ्या नवोदित कविंच्या कविता सादर करण्यात आल्या. डहाणू तालुक्यात असलेले महालक्ष्मी मातेचे मंदिर. या मातेवर आधारित गणू गोविंद सातवी यांनी लिहिलेले 'आई महालक्ष्मी मातेचा इतिहास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ठाणे-पालघर जिल्ह्यात ठराविक ठिकाणी बोलली जाणारी डावर बोलीभाषा. या बोलीभाषेचे अभ्यासक श्री. नितीन बोंभाडे ह्यांनी डावर बोलीविषयी संबोधित केले. तलासरीच्या उत्तरेकडील कोचाई, उपलाट, सावरोली, सूत्रकार, संभा, गिरगांव, घिमानिया तर वलसाड जिल्ह्यातील नंदिगाम, संजान, सारिगाम या भागात डावर बोलीभाषा बोलली जाते. गुजरात सीमाभाग लगत असल्यामुळे गुजराती भाषेचा प्रभाव डावर बोलीवर वाटतो. त्यात वारली भाषेतील काही शब्दांचा वापर देखील होतो. बोलीभाषेतील उदाहरण पहायचे झाल्यास 'कोण खावे, कसो राहाये' असे शब्द येतात. परंतु जेवलास का? ह्याला डावर बोलीत 'दान खास का?' असं म्हणतात. अभ्यासक म्हणतात, अलीकडच्या काळात ह्या बोलीभाषा लुप्त व्हायला लागल्या आहे. याचे जतन करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.



वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करणारे श्री. सखाराम डाखोरे यांनी 'आदिवासी बोलीच्या कवितांमधून अभिव्यक्त झालेली कविता' हा विषय घेऊन संवाद साधला. त्यात त्यांनी भुजंग मेश्राम यांच्या उलगुलान मधील 'निंदनी' कविता सादर करत त्याचा अर्थही सांगितला. आणि अन्याय, अत्याचार होतो त्यावेळी आपल्या भावना आपल्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी बोलीतून व्यक्त व्हायला हवं. जव्हार येथील किशोर डोके यांनी 'आदिवासी भाषा आवाहन, संवर्धन व विकास' या विषयावर संबोधन केले. बोलीभाषेविषयी सुरवात करताना घरातीलच उदाहरण दिले. एकाच घरात तीन पिढ्या असताना जेव्हा बोलीभाषेत संवाद घडतो तेव्हा त्या संवादातील पहिल्या पिढीचे काही शब्द तिसऱ्या पिढीला समजत नाही. आणि तिसरी पिढी त्या शोधात जास्त जात नाही. यात आपणही कुठेतरी चुकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शाळांमध्ये बोलीभाषा शिकवली गेली पाहिजे. असेही मत त्यांनी व्यक्त केले. पहिल्या सत्रातील शेवटचे व्याख्यान श्री. सुनील झळके यांचे झाले. त्यांनी आदिवासी साहित्य बोलीभाषा परंपरा, संस्कृती यावर संवाद साधत यातील सगळंच मुलांपर्यंत पोचू शकत नाही. ते पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करायला हवं असे मत त्यांनी व्यक्त केले. पहिल्या सत्रात सूत्रसंचालनाची धुरा श्री. रवि बुधर यांनी सांभाळली.

'महालक्ष्मी मातेचा इतिहास' पुस्तकाचे प्रकाशन...

दुसऱ्या सत्रात नवोदित कवी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या बोलीभाषेत लिहिलेल्या कविता सादर केल्या. रवि बुधर, दिनेश भोईर, किशोर डोके, यांनी कविता सादर केल्या. या संमेलनात तरुणांची उपस्थिती दर्शनीय होती. दुसरे सत्रही उत्तमपणे पार पडले. तरुणांनी आदिवासी साहित्य निवडून प्रमाणभाषेचा फारसा विचार न करता स्वतःच्या बोलीत लिखाण करत ती आपसूक पद्धतीने पोचवत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. संमेलनाचे अध्यक्ष देवचंद महाले यांनी आदिवासी समाजावर येणारे संकट तसेच आदिवासिंचा संघर्ष याबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉ. सुनील पऱ्हाड यांनी देखील आपले मत व्यक्त केले व उपस्थित साहित्यिक आणि कविंना संस्कृती, रूढी, परंपरा यावर लिहिण्यास आवाहन केले. अनुजा अवकाश केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत घाटाळ यांच्या संकल्पनेतून हे संमेलन घडले. त्यांचे सहकारी सुधीर भोईर, किशोर डोके आणि रवी बुधर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. हे संमेलन छोटेखानी जरी असले तरी त्यातून विचार मात्र मोठ्या पद्धतीने पोचले. या संमेलनात स्थानिक मंडळी उपस्थित होते तसेच वरिष्ठ साहित्यिक, पत्रकार, अधिकारी वर्ग उपस्थित होता.

- शैलेश दिनकर पाटील 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"