पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावाला इतिहास आहे. गावातली अनेक घरं जुन्या धाटणीची आहेत. शिवाय गावात असलेलं हरिहरेश्वराचं मंदिर. साधारण तेराव्या शतकात मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हेमाडपंथी आहे. परंतु आता मंदिराला रंग देण्यात आला आहे. पिंपळगावपासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर नदी(बहुळा?)वजा ओढा आहे. मंदिराच्या आवारात मोठ्या पायऱ्या आहेत. त्यातील दुसऱ्या पायरीवर 'ॐ श्री हरिहरेश्वराय नमः या फरशीचे काम शके १८४१ त झाले...' असा मजकूर कोरलेला आहे.
![]() |
| मंदिराचे प्रवेशद्वार. |
मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला भास्करचार्य आणि लिलावती या दोघे भाऊ-बहिणीची समाधी आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. या समाधीच्या बाजूला नंदी आहे. तो नंदी दरवर्षी बैलपोळा या दिवशी तिळातिळाने पुढे सरकतो. अशी आख्यायिका सांगितली जाते.
![]() |
| भास्करचार्य आणि लिलावती यांची समाधी. |
नंदीच्या अगदी समोर मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे. तेथे आत गेल्यावर मंदिराच्या गर्भातील कोरीव नक्षीकाम पहायला मिळते. तेथेच गणपतीची जुनी मूर्तीदेखील आहे. मंदिराचा गाभारा खोल आहे. गाभाऱ्यात गेल्यावर शंकराची पिंड आहे. त्या पिंडीच्या वरच्या बाजूस दगडी रेघ आहे. असं म्हणतात की, विष्णू आणि शंकर यांची येथे भेट झाली आणि त्याचीच ही निशाणी आहे. या दोहोंच्या भेटीमुळे हरिहरेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते.
बाहेरून मंदिर पाहिल्यास आयताकृती वाटते. मंदिराच्या उजव्या बाजूस एक दगडी शिळा आहे. ती शिळा भस्मासूराची असल्याचे सांगितले जाते. विष्णुने मोहिनीचे रूप धारण करून भस्मासूराचा वध केला. ग्रामस्थांकडून मंदिराविषयी अनेक गोष्टी ऐकायला मिळतात.
![]() |
| दगडी शिळा... |
त्याच शिळेच्या आवारात शिवलिंगाचे अवशेष आढळतात. मंदिराच्या समोरील नदीजवळ पुलाच्या बांधकामावेळी खोदकाम सुरु असताना एक दगडी चौथरा आढळला. त्या चौथाऱ्याच्या चारही बाजूस छोटेखानी नक्षीकाम दिसते. तो चौथरा मंदिराच्या जवळच आहे. त्यावर भग्न अवस्थेतील नंदी आणि छोटछोट्या शिवलिंगाचे अवशेष आहे. गावातच श्रीगोविंद समर्थ महाराजांचं मंदिर आहे ते देखील या मंदिरात येऊन गेल्याचा उल्लेख त्यांनी रचलेल्या अभंगात आढळतो.
- शैलेश दिनकर पाटील



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा