वारली चित्रकला सातासमुद्रापार

पालघर जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणाच्या वारली चित्रांचे प्रदर्शन थेट परदेशात भरते हे खूपच कौतुकास्पद आहे. ऑक्टोबर २०१९ च्या पुढारी वृत्तपत्रात विजयची स्तुतीपर बातमी वाचली. तिथून त्याच्या शोधात होतो. तो फेसबुकवर ऍक्टिव्ह असल्यामुळे आमचा संपर्क लवकर झाला. मागच्या आठवड्यात त्याची भेट घ्यायची ठरले होते पण लॉकडाऊनमुळे काही शक्य झालं नाही. आदिवासी म्हटलं की त्यांची भाषा, तारपा नृत्य, जत्रेच्या प्रथा-परंपरा, संस्कृती आणि वारली चित्र हे सगळं नजरेसमोर उभं राहतं. आपली संस्कृती टिकून रहावी म्हणून गावातील अनेक लहान-मोठी मुलं वारली चित्र शिकत असतात. त्यांतील काही जणं वारली चित्राकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनही पाहतात.

विजयने काढलेली विविध वारली चित्रं

डहाणू तालुक्यातील गंजाड हे विजयचे गाव. पहिली ते दहावी आंबेसरीच्या शासकीय आश्रमशाळेतच झाली. इयत्ता चौथीनंतर चित्रकलेत त्याने जातीनं लक्ष घातलं. चित्रकला जमते पण आपल्या संस्कृतीशी निगडित वारली चित्रकलेकडे त्याचा अधिक कल होता. वारली चित्र जमायचं पण त्यात अगदी परफेक्शन हवं यासाठी त्याचे काका मधुकर वाडू यांची मदत मिळे. विजयची घरची परिस्थिती अगदी हलाखीची. मजुरी करूनच उपजीविका चालते. विजयची दहावी २००९ साली झाली. घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचा शिक्षणात एक वर्ष गॅप पडला. त्या वर्षभरात त्याने स्वतःला वेळ दिला. अवघ्या तीन-चार महिन्यांत तो वारली चित्रकलेत पारंगत झाला. होळी, आदिवासी दिन, दिवाळी यांसारखे सण किंवा लग्नसमारंभ अशा ठिकाणी तो चित्र काढण्यासाठी जायचा तेथे त्याला दोन पैसे मिळे. असे वर्षभर चालले. मग त्याने तलासरीच्या परुळेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. शिकता शिकता त्याचे वारली चित्रांचे कामही सुरू होते.

पर्यटकाने विजयकडून खरेदी केलेली पेंटिंग

डहाणूला पारसी लोकांची वस्ती अधिक प्रमाणात असल्यामुळे इथला आदिवासी भाग त्यांना परिचित आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी ते विविध पाड्यांत जात असतात. त्याच दरम्यान त्यांची विजयशी ओळख झाली त्याने काढलेल्या चित्रांचे तेथे कौतुक झाले. डहाणूच्या फिरोजा ताफ्ती त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर INTACH(इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) नामक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक परदेशी लोकांसोबत त्यांचा चांगला संपर्क आहे. विजयचे काका मधुकर वाडू यांनी विजयचा फिरोजा यांच्याशी संपर्क करून दिला. परदेशी व्यक्ती मुंबईत पर्यटनासाठी आली की त्यांना विजयच्या गावी घेऊन जात आणि त्याने काढलेली चित्र दाखवीत. विजयच्या हातची कला पाहून परदेशी पाहुणेही कौतुक करायचे. मग त्यांनी काही चित्र विकत घेतले. चित्राची जी काही किंमत असेल ते सगळं विजय ठरवणार त्यात कोणी हस्तक्षेप करत नाही. एक-दोनदा डहाणू आणि मुंबईसारख्या ठिकाणी वारली चित्र काढण्यासंबंधी कार्यशाळा देखील आयोजित केलेल्या या कार्यशाळा दोन किंवा चार दिवसीय असायच्या आणि त्यात वारली चित्राची बेसिक माहिती विजय सांगायचा. त्याचे जे काही मानधन असेल ते त्याला मिळायचे. अशा पद्धतीने त्याचे काम सुरळीत सुरू झाले. विजयचे दुसरे काका प्रकाश वाडू त्यांचा आदिवासी विकास विभाग, मुंबई आणि आदिवासी संशोधन संस्था, पुणे येथे चांगला परिचय आहे. या दोन्ही संस्था सरकारी पातळीवर आहेत. राज्यात, देशात किंवा परदेशात चित्रांचे प्रदर्शन असल्यास आदिवासी विकास विभाग आणि संशोधन संस्था यांच्याकडून कळवले जाते. प्रकाश वाडू यांनी विजयचा तेथे संपर्क करून देऊन २०१५ साली त्याची संशोधन संस्थेत नोंदणी केली. विजयची बारावी झाल्यावर वारली चित्रांचे काम वाढले यावेळी पुन्हा त्याच्या शैक्षणिक आयुष्याला खीळ बसली. पण एकंदर त्याचा पुढील प्रवास सुखकर होत होता.

विजय आणि INTACH च्या फिरोजा ताफ्ती

फिरोजा यांच्या सहकार्याने डहाणू, मुंबईत झालेल्या प्रदर्शनामुळे त्याची चांगलीच ओळख झाली होती आणि याच दरम्यान त्याच्या चित्रांचे राज्याबाहेर प्रदर्शन आणि कार्यशाळा सुरू होत्या. ललित कला अकादमीतर्फे २०१४ साली इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात नऊ दिवस कार्यशाळा होती. त्यासोबतच त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. राज्याबाहेरचे हे त्याचे पहिले प्रदर्शन होते. त्यानंतर भुवनेश्वर(२०१६), सुरजकुंड, दिल्ली(२०१८) येथे अनुक्रमे सहा आणि सतरा दिवस चित्रांचे प्रदर्शन लागले होते. सुरजकुंडच्या प्रदर्शनात एकूण तेहतीस देश सहभागी होते. त्यांत एकमेव वारली कलाकार विजय होता. त्याच्यासोबत आदिवासी संशोधन संस्थेचे सहकारी होते. टेक्स्टाईल, वुडन, क्राफ्ट आणि गारमेंट इत्यादींचे प्रदर्शन तेथे होते. विजय त्याच्या काकांसोबत(मधुकर वाडू) विशाखापट्टणम येथे २०१६ साली तीन महिने वारली चित्रकलेच्या कार्यशाळा घेण्यासाठी गेला होता.
विजय आणि त्याचे काका मधुकर वाडू

आर्ट गॅलरीच्या वेबसाईटवर त्याने नोंदणी केली. त्यामुळे त्याच्या चित्रांविषयीची माहिती परदेशांतील लोकांपर्यंत पोचली. त्याचा फायदा झाला असा, की सप्टेंबरच्या २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आर्ट गॅलरीने विजयकडून त्याने काढलेली ब्याऐंशी वारली चित्रे मागवली. त्या चित्रांचे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पैसेही पाठवले. कुरिअरच्या साहाय्याने ऑस्ट्रेलियात चित्र पाठवले गेले. तेथे पाठवलेल्या चित्रांचे प्रदर्शन तीन महिने होते. आर्ट गॅलरीमधूनच त्याला पोर्तुगाल आणि पॅरिस येथून फोन आला. पॅरिसमधील मंडळी मुंबईत पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी ते विजयच्या घरी गेले आणि तेथून पंधरा चित्रांचा सेट घेऊन पॅरिसला गेले. पोर्तुगालच्या माणसांनी ऑनलाईन पद्धतीने चित्र मागवून त्याचे पैसे देऊ केले. याबाबतीत फिरोजा यांचे त्यांना सहकार्य मिळायचे.

शिबिरा दरम्यान विजय पर्यटकांना वारली चित्राविषयी माहिती देताना

आदिवासी विकास विभागाच्या वतीने मुंबई येथे यावर्षीच्या काळा घोडा फेस्टिवलला देखील त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. लेट्स वारली प्रकल्पाच्या अंतर्गत त्याची लवकरच ऑस्ट्रेलिया सफर होणार आहे. तिथे त्याला कार्यशाळेसाठी आमंत्रित करणार आहेत. त्याच्या कामाचा हा लौकिक पाहता आदिवासी विकास विभागाकडून त्याला २०१९ साली नागपूर येथे आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित केले. विजय सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. विजय म्हणतो, 'परदेशातील माणसं जेव्हा माझ्या घरी येतात तेव्हा घरच्यांना फार आनंद होतो. मला पुढे आणखी शिकायचे आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पण ज्याने माझी ओळख निर्माण केली आहे त्या वारली चित्राला मी विसरणार नाही आहे. ती कला इतर मुलांमध्ये अवगत करण्याचा प्रयत्न करेन.'

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. खुप छान ������
    लेखामध्ये विजय यांच्या परवानगीने जर त्यांचा आणि त्यांच्या काही चित्रांचा फोटो टाकला तर चांगले होईल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. नक्कीच काही कारणांमुळे फोटो ऍड करायला शक्य होत नाही. पण लवकरच लेख आणि फोटो अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करेल.

      हटवा
  2. फारच सुंदर,थक्क करणारा प्रवास,जिद्द,चिकाटीला सलाम

    उत्तर द्याहटवा
  3. Yat sarvat most important gost manje tyane ti kala etrana dyachi manje aankhi tyachya knowledge madhe bhar padel ani etrana pan bhetel hi gost khup chagali aahe yat

    उत्तर द्याहटवा
  4. वा खुपच छान लेख होता
    ठीक ठीकाणी फोटोंची मांडणी असती तर अजून छान वाटल असत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"