"संजान डे"

दररोजच्या प्रवासात संजान गावानजिक एक अग्नीज्वाला असलेला स्तंभ दिसतो. तो स्तंभ पारशी लोकांचं प्रतीक असल्याचं सांगितलं जातं. त्या स्तंभाविषयी माहिती घेण्याकरिता काल गेलो. झादरान कॉलेजमधील एक शिक्षक त्या स्तंभाची आणि परिसराची देखभाल करतात. १५ नोव्हेंबर हा दिवस 'संजान डे' म्हणून साजरा केला जातो. डहाणूपासून संजान(गुजरात दिशेने) हे चौथे रेल्वे स्टेशन. मध्ययुगीन काळात संजान हे बंदर होतं. आजही नारगोल दिशेला जाताना संजान बंदर असा बोर्ड लावलेला दिसेल.

स्तंभ.

पर्शियात राहणारे पारशी. असं म्हणतात की, पर्शियावर इस्लामने आक्रमण केले. आणि त्याला इराण असे नाव मिळाले. तेथे असणाऱ्या पारशी बादशहाचा पराभव झाला. आणि तेथील लोकांचा धर्मच्छळ सुरु झाला. त्याला त्रासून पारशी लोकं इतरत्र देशांत पांगली. त्यांतील एक जत्था गलबतात बसून समुद्रमार्गे भारताच्या दिशेने मार्गस्थ झाला. ते गलबत संजान बंदरात आले. त्यावेळी तेथे हिंदुचे राष्ट्र होते.

हिंदूंनी पारशी लोकांना आश्रय दिला. असं म्हणतात की, दुधात साखर टाकल्यावर दुधाला जसा गोडवा येतो तशाच पद्धतीने आपण एकत्र राहू असे पारशी लोकं सांगत. संजान बंदरानजिक संजान किल्ला देखील होता. आता तेथे केवळ बुरुजाचे अवशेष शिल्लक आहे.

पारसी भाषेत लिहिलेला शिलालेख.

संजान बंदरात पारशी उतरले. आणि तेथेच ते स्थायिक झाले. पारशी लोकांची वस्ती बऱ्यापैकी या भागात आहे. मगाशी ज्या स्तंभाचा उल्लेख केला तो स्तंभ १९२० साली उभारण्यात आला. त्याला 'संजान मेमोरीयल' असेही नाव आहे. पारशी लोकांना पवित्र वाटणारे अग्निहोत्र म्हणजेच अग्निच्या ज्वाळेचे शिल्प तेथे आहे शिवाय त्याच्या बाजूला एक कॅप्सूल आत गाडलेली आहे. स्तंभाच्या तिन्ही बाजूस गुजराती, इंग्रजी आणि पारशी भाषेत त्यांच्या आगमनाची स्थिती कोरलेली आहे.

स्तंभाचा परिसर खूप मोठा आहे. त्या परिसरात एक हॉल आहे तसेच राहण्याची व्यवस्थेकरिता जुन्या प्रकारची खोली आहे. १५ नोव्हेंबर या दिवशी संजान रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि एसी ट्रेन अशा मोठ्या गाड्यांना थांबा असतो. कारण त्या दिवशी भारतभरातून येणारे अनेक पारशी बांधव या स्थानकावर उतरतात. स्तंभाच्या थोडं पुढे गेलं की पारशी अग्यारी आहे. तेथे मात्र प्रवेश निशिद्ध आहे. संजान बाबत आणखी एक उल्लेख कल्याणच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. १९५० च्या आसपास संजान हा भाग मुंबईपर्यंत जोडलेला होता. 

- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"