कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला...

मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना पनवेल सोडल्यावर रस्त्यालगत 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' लागतं. पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली यांच्या प्रेरणेतून हे अभयारण्य साकारलं आहे. या अभयारण्याच्या प्रवेश द्वारातून एक सुळका दिसतो तो म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाण्यासाठी अभयारण्याच्या प्रवेशद्वारातुनच आत जाता येते. या अभयारण्यात जवळपास दीडशेपेक्षा अधिक पक्ष्यांच्या वावर आहे. त्यामुळे ट्रेक करून झाल्यावर पक्षी निरीक्षण देखील करता येते. येथे पक्ष्यांविषयी त्यांच्या छायाचित्रांसहीत थोडक्यात माहिती दर्शविली आहे. तसेच झाड आणि पर्यावरणाविषयी देखील छानशी माहिती दिलेली आहे. कर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाचे माहिती पत्रक लावलेले आहे. 

आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला सुंदर अशी फुलबाग आहे व त्याच्याच बाजूला खेळण्यासाठी बाग बनवलेली आहे. सरळ मार्गाने जाताना आपल्याला किल्ल्यासाठी दिशादर्शक फलक लावलेले दिसतात. त्या फलकाच्या जवळच वनविभागाचे विश्रामगृह, खानावळ आणि कार्यालय असा परिसर आहे. कार्यालयाचा रस्ता पकडल्यास किल्ल्याकडे जाणारा मार्ग लागतो.

किल्ला चढताना दाट झाडांमुळे उन्हाच्या झळा फार कमी लागतात. चढाई करताना मोठमोठ्या दगडांतून वाट काढत जाताना झाडांचे नैसर्गिक झोके तयार झालेले दिसतात. त्यावर आनंद घेत बालपणीच्या आठवणी ताज्या करत पुढे जाऊ शकतो. मध्ये-मध्ये पठार देखील आहे. विश्रांतीसाठी बाक तसेच पत्र्याचे शेड लावलेले आहेत. रेलिंग चढून वर गेल्यावर पठारावरून अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या सुळक्याचं दर्शन होतं. तसेच किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते.

प्रवेशद्वाराकडे जात असताना वाटेत आपल्याला कर्णाई देवीचे मंदिर लागतं. बहुधा याच देवीच्या नावावरून किल्ल्याचे नाव कर्नाळा असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या बाजूस देवीच्या जुन्या मुर्त्या दिसतात. तेथून पुढे गेल्यावर भग्न पायऱ्यांच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला रेलिंग पार करत किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारावर शरभ शिल्प पहायला मिळते. तेथे एक कमान आहे. त्या कमानीतून आत गेल्यावर किल्ल्याचा मुख्य भाग येतो. तेथे भग्न अवस्थेत असलेलं वाडा सदृश बांधकाम दिसतं.

सुळक्याच्या पलीकडे बुरुजाकडे जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एक प्रवेशद्वार लागतो. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील दोन्ही बाजूस शरभ शिल्प पहायला मिळते तसेच आतल्या बाजूस केलेले नक्षीकाम दिसते. बुरुजावरून आपल्याला विहंगम दृश्य पहायला मिळते.

अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या या सुळक्यामुळे मागची बाजू दिसत नाही त्यामुळे बहुतांश लोक माची आणि बुरुजाकडे फिरकत नाही. सुळक्याच्या तळाशी पाण्याचे टाके पाहून हा किल्ला सातवाहन कालीन असल्याचे सांगितले जाते. १५४० साली निजामशाहीने हा किल्ला जिंकला. त्याच्या अस्तानंतर तो किल्ला आदिलशाहीकडे आला. शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण-भिवंडी जिंकली त्याच दरम्यान त्यांनी कर्नाळा जिंकला. परंतु पुरंदरच्या तहात १६६६ साली हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. मराठ्यांनी तो किल्ला १६७० मध्ये पुन्हा ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या मृत्युनंतर तो मुघलांच्या ताब्यात आला. नंतर पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये कर्नाळा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

कर्नाळा किल्ला चढाई करताना विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. चढाई मध्यम स्वरुपाची असून साधारण दीड ते दोन तासात माथ्यावर पोचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी अभयारण्यातच खानावळ आहे. माथ्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पाणी सोबत घेऊन जावे लागते.

कर्नाळा अभयारण्यात प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलं(वयोगट पाच ते बारा) यांची अनुक्रमे साठ व तीस रुपये प्रवेश फी आहे. तसेच पाण्याच्या प्लास्टिक बाटलीसाठी शंभर रुपये प्रती बाटली अनामत रक्कम जमा करावी लागते. किल्ल्यावरून माघारी आल्यावर ती बाटली दाखवल्यास अनामत रक्कम परत मिळते. या निर्णयाचा फायदा असा की, किल्ल्यावर फार कचरा दिसला नाही.

पायथ्याला वाहनतळाची व्यवस्था आहे. वाहनानुसार त्याचे भाडे आकारले जाते. तसेच कॅमेरा असल्यास त्याचेही वेगळे शुल्क लागते. पक्षी निरीक्षणासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम आहे. त्यावेळी किल्ला अगदी सुंदर दिसतो. पक्षी निरीक्षण आणि किल्ला एक दिवसांत करण्याजोगे आहे.

- शैलेश दिनकर पाटील 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"