शूर हाली

माझा मित्र स्वप्नील अधिकारी मूळचा शहापुरचा. सामाजिक कामानिमित्त आदिवासी पाड्यांना भेट देत असतो. शहापूर तालुक्यात 'हाली' नामक आदिवासी महिला तिने दाखवलेल्या धाडसामुळे प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी(२०१९) स्वप्नील आणि त्याचा मित्र मकरंद घनघाव हालीच्या घरी भेट द्यायला गेले होते. त्यांनी तिला भेट म्हणून साडी-चोळी दिली होती. या भेटीमुळे हालीने दाखवलेल्या शौर्याची आठवण झाली.

स्वप्नील आणि मकरंद 'हालीला' साडी चोळी भेट देताना.

शहापूर तालुक्याच्या नांदगाव जवळील जमन्याच्या पाड्यातील एका तबेल्यात रघुनाथ बरफ काम करतात. तेथून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रघुनाथ यांना शकुंतला आणि हाली या दोन मुली. शकुंतला थोरली आणि हाली तिची लहान बहीण. २०१२ सालची घटना आहे. रघुनाथ यांची लहान मुलगी हाली हिने बिबट्याच्या तावडीतून शकुंतलाची(मोठ्या बहिणीची) सुटका केली होती. शकुंतला गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. शहापूर तालुक्यात तानसा अभयारण्य आहे. तेथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. या अभयारण्याच्या क्षेत्रात तानसा जलाशय आहे. हे जलाशय मुंबई सारख्या शहराला पाणी पुरवठा करते. पाड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी जेवणासाठी चुलीचाच वापर होतो. चुलीसाठी लागणारी लाकडं जमा करण्यासाठी शकुंतला आणि हाली अभयारण्यात गेले होते.  शकुंतला आणि हाली लाकडं जमा करत असताना अचानक शकुंतलावर बिबट्याने झडप घातली. हालीने तो प्रसंग पाहिला कोठेही न डगमगता तिने बिबट्यावर मोठमोठ्या दगडांचा मारा केला आणि आरडाओरड देखील केली. तिच्या त्या ओरडण्याने जवळपासची माणसं लाकडं घेऊन धावत आली. हालीचा दगडांचा मारा सुरूच होता. तिच्या या माऱ्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. शकुंतला त्यात जबर जखमी झाली. तिच्यावर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मोठ्या बहिणीचा जीव वाचला म्हणून ती आनंदी होती. हालीने दाखवलेल्या धाडसाबद्दल गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले. त्यावेळी हालीचे वय होते अवघे पंधरा वर्षे. हालीच्या धाडसाचे संपूर्ण गावात कौतुक झाले. त्यानंतर तालुका-जिल्हा-राज्य-राष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक झाले. या धाडसाचे कौतुक म्हणून तिला २०१३ साली प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे माजी. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून "वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय बालवीर पुरस्कार" मिळाला. या पुरस्कारासाठी जिल्हा प्रशासनाने शिफारस केलेली. दिल्लीला जाण्यासाठी तिचे आई आणि मामा सोबत होते. हालीचे कौतुक पाहून तिचे वडील रघुनाथ यांना फार आनंद झाला.

मा.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याहस्ते हाली पुरस्कार स्वीकारताना

काही वर्षांनी हालीचे लग्न झाले. हाली सध्या शहापूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील रातांधळे पाडा येथे राहते. शहापूर येथील आश्रमशाळा आणि तेथील मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी हाली आणि तिचे पती राम यांना तात्पुरती नोकरी मिळाली आहे. नोकरीसाठी आमदार पांडुरंग वरोरा यांनी सहकार्य केले. सध्या कोरोना आपत्तीमुळे आश्रमशाळा बंद असल्याने हाली आणि तिचे पती दोघेही घरीच आहेत. त्यांच्याकडे शेती नसल्यामुळे उत्पन्नाचा दुसरा पर्याय नाही. हालीच्या धाडसाच्या कौतुकाची नोंद शालेय पाठ्यपुस्तकात देखील करण्यात आली आहे. इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात "धाडसी हाली" हे प्रकरण मुलाखत स्वरूपात अभ्यासासाठी आहे.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर लेखण ! छान माहिती मिळाली. बर आहे सामाजिक जाणीव म्हणून तरुण लोक तिथपर्यंत जातात. तुमच्या सारखे लेखण करतात त्यामुळे आम्हाला माहिती मिळते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"