गावरान गोधडीची ऊब सातासमुद्रापार.

पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेने 'सामाजिक बांधिलकी' या उद्देशाने शहापूर तालुक्यातील खराडे गावात काम सुरू केले. हे गाव शहापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावातील एबीएम कातकरी व आदिवासी मुलींची शाळा मुंबई येथील माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दत्तक घेतली. त्या शाळेला शासकीय अनुदान नसल्यामुळे ती बंद पडली होती. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी माझगांव डॉक कंपनीला आर्थिक सहाय्य मिळणेबाबत पत्र व्यवहार केला. कंपनीने पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेशी संपर्क करून त्यांना शाळेची परिस्थिती आणि तेथील गरज जाणून घेण्यास सांगितले. कर्वे संस्थेने शाळेचा पायाभूत सर्व्हे करून आजूबाजूच्या परिसरातदेखील काम करण्याची आवश्यकता आहे असा अहवाल कंपनीस दिला. मार्च २०१५ पासून कंपनीने शाळा दत्तक घेत कर्वे संस्थेला मॉनिटरिंग करण्यास सांगितले. २०१५ ते २०२० या पाच वर्षांत कंपनीने शाळा आणि गावाच्या कामासाठी आर्थिक सहाय्य केले. २०२०मध्येच एबीएम कातकरी व आदिवासी मुलींच्या शाळेला शासकीय अनुदान मंजूर झाले आहे.

आरती गिते यांच्यासोबत ऊर्जा महिला स्वयं-सहायता गट.

कर्वे संस्थेने त्या गावात गोधडी प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापक स्नेहल नाईक आहेत तर त्या प्रकल्पात समन्वयक आणि प्रत्यक्षात फिल्डवरील काम आरती गिते पाहतात. आरती आणि त्यांचे पती धनंजय गिते कर्वे संस्थेतून २०१२ साली एम.एस.डब्ल्यू. उत्तीर्ण झाले. गावातील बहुतांश पुरुष मंडळी ठाणे, मुंबई यांसारख्या शहरी भागात नोकरीसाठी जातात. या प्रवासातच त्यांचा फार वेळ जातो. वेळ वाचावा म्हणून काही पुरुष मंडळी कल्याण, ठाणे भागात राहतात. शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी ते घरी येतात. पावसाळा सुरू झाला की भातशेतीसाठी घरातली सगळी मंडळी गुंतली जाते हे काम जवळपास चारेक महिने चालते. एकदा भातशेतीचे काम आटोपले की मग बाकीचा वेळ असाच घरात जातो. फावल्या वेळात काय काय करू शकतो अशा चर्चा संस्थेबरोबर होऊ लागल्या. महिला सक्षमीकरण हा विषय समोर ठेऊन डिसेंबर २०१५ साली कामाला सुरुवात झाली. गावातील महिलांना एकत्र करून संस्थेने मार्गदर्शन केलं. सुरवातीला पंधरा-वीस महिलांनी पुढाकार घेऊन 'ऊर्जा स्वयं-सहायता महिला बचत गटाची' स्थापना केली. सुरवात कोणत्या उद्योगापासून करायची हे सगळं ठरलं. इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या गोधडी प्रकल्पाविषयी माहिती मिळवली. 'रॅमन मॅगसेसे पुरस्कृत' नीलिमा मिश्रा यांच्या जळगाव येथील 'भगिनी निवेदिता संस्थे'ची माहिती घेतली. संस्थेच्या संबंधित व्यक्तीशी बोलून खराडे गावातील पंधरा महिलांना तेथे प्रशिक्षणासाठी पाठवले. गोधडी आणि इतर शिवण कामाचे प्रशिक्षण महिलांना दिले. हे प्रशिक्षण पाच दिवस सुरू होते.

रॅमन मॅगसेसे पुरस्कृत नीलिमा मिश्रा यांच्यासमवेत बचत गटातील महिला.

प्रशिक्षण घेतल्यांनंतर महिलांनी कामाला सुरुवात केली. लहान बाळांपासून ते मोठ्या माणसांपर्यंतच्या विविध प्रकारच्या डिझाइन असलेल्या गोधड्या त्यांनी बनवल्या. खराडे गावानजीक चांग्याचा पाडा आहे त्या पाड्याजवळील चौकात एक गाळा घेतला. गोधडी बनवण्याचे साहित्य ज्या दिवशी येणार त्या दिवशी सगळ्या महिला एकत्र येतात आणि आलेल्या साहित्याचे एक मताने समसमान वाटप करतात. दरमहा नियमित मासिक सभा आणि पंधरा दिवसांतून एकदा पाठपुरावा सभा घेऊन गटाच्या सर्व व्यवहाराची आणि व्यवसायाचे विचार विनिमय केले जातात. मटेरियल कुठून आणण्याचे, किती आणायचे, प्रदर्शन कोठे व कसे भरवायचे, गोधड्या आणि इतर पूरक उत्पादने बनवून घेणे यांसारख्या गोष्टींचा पाठपुरावा घेतला जातो. गटातील महिला दिलेलं साहित्य घेऊन स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे गोधडी शिवतात. बनवलेल्या गोधड्या विक्रीसाठी गाळ्यावर आणतात. गोधडी विक्रीसाठी गाळ्यात कोणी थांबावे यासाठी महिलांनी प्रत्येकाचे वेळापत्रक बनवले आहे. त्या वेळापत्रकानुसार दररोज महिला बदलत असतात. या गावच्या जवळच बंजारा हिल्स आहे. येथे मुंबई येथील बऱ्याच जणांची घरं आहेत. सुट्टीच्या दिवसांत तेथे आल्यावर बचत गटाच्या गाळ्याला आवर्जून भेट देतात आणि तेथील साहित्यही खरेदी करतात. गोधडीचा व्यतिरिक्त कापडी पिशव्या, उशीचे कव्हर, टेबल मॅट, लॅपटॉप कव्हर आणि इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड हे देखील बनवून विकतात. महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शन भरले असेल तर कर्वे संस्था बचतगटाला कळवते. डोंबिवली, मुंबई, ठाणे या ठिकाणी प्रदर्शन भरवले गेले आहे. या साऱ्या कामांतून आतापर्यंत अडुसष्ट महिलांना रोजगार मिळाला आहे. विक्री झालेल्या सगळ्या वस्तूंचे उत्पन्न बचत गटाच्या खात्यात जमा होते. त्या खर्चाचा हिशेब आणि पासबुक वाचन बचत गटातील सगळ्या महिलांच्या समोर होते. या महिलांनी हे काम स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतर संस्थांनाही प्रशिक्षण दिले आहे. पुण्याजवळील शिळीम गावी क्रिएटिव्ह पीपल(पुणे) आणि पू. ना. गाडगीळ यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रकल्पांतर्गत, पुण्यातील ठाकूर साई आणि मांदेडे ग्रामपंचायत आणि आळेफाटा येथील भरारी संस्थेच्या महिलांना गोधडी प्रशिक्षण दिले आहे. महिला सक्षमीकरणा व्यतिरिक्त इतरही कामे येथे सुरू असतात. शहापूर तालुक्यात गोधडी व्यवसाय करणारा युनिक गट म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभागाकडून ऑगस्ट-२०१९ साली 'राजमाता जिजाऊ पुरस्कार' मिळाला आहे. तसेच या बचत गटाला प्रोत्साहन म्हणून राज्य शासनाकडून 'हिरकणी पुरस्कार' आणि बावन्न हजार पाचशे रुपयांचा धनादेश देखील मिळाला आहे.

गोधडी प्रदर्शन, गोधडी शिवणकाम.

शिक्षण, शेती व पशु संवर्धन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन ही कामे धनंजय गिते पाहतात. शहापूर तालुक्यातील दहा शाळांना सोलर सिस्टमसहित ई-लर्निंगचे साहित्य देण्यात आले आहे. त्यासोबतच शाळा-अंगणवाडी यांची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. शेती व पशु संवर्धन उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना एसआरटी आणि चारसूत्री भात लागवडीसाठी युरिया ब्रिकेट गोळीखताचे वाटप दरवर्षी करण्यात येते. तसेच जनावरांचे दर सहामाही लसीकरण व औषध वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे व प्रदर्शनही भरवण्यात येते. पाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत चाफेवाडी, कथोर पाडा, पडवळ पाडा, अंबर पाडा, निसन पाडा चांग्याचा पाडा या ठिकाणी पाणी योजना दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे.

- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या

  1. खूपच छान काम, खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण व पाड्यांच्या विकासाचे काम चालू आहे. सौ आरती गिते व श्री धनंजय गिते यांच्या कार्यास शुभेच्छा !

    प्रा डॉ गोरक्षनाथ सानप, संगमनेर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"