वन्यजीवांचे रक्षक - सृष्टी आणि सिद्धार्थ
बीड जिल्ह्यातील शिरूर गावानजीक तागड गावात सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे या दाम्पत्यांनी वन्यप्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. तेथे जखमी व आजारी जीवांवर उपचार केले जातात. सृष्टी-सिद्धार्थ यांना वन्यप्राण्यांविषयीची जाण लहानपणीच झाली. सिद्धार्थ यांच्या गावात भिल्ल समाज आहे. लहानपणी सिद्धार्थ आणि सृष्टी त्या समाजातील मुलांसोबत जंगलात पक्षी मारायला जायचे. त्यात त्यांना आनंद वाटायचा. त्यावेळी दोघांचे वय साधारण सहा-सात वर्ष. ससा, पक्षी पकडणं आणि सापाला हाताळणं त्यांना सहज जमत होतं. या सगळ्यांमुळे त्यांची वन्यप्राण्यांविषयी वाटणारी भीतीच नष्ट झाली. सिद्धार्थ इयत्ता दुसरीत असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली. जंगलात फिरत असताना त्यांना 'विरुळा' नावाचा साप आढळला. ते पकडण्याचं धाडस त्यांनी केलं पण विरुळाने त्यांच्या बोटाला दंश केला. त्यावेळी गावात सापांविषयी अनेक गैरसमज होते. विरुळाने दंश केल्यावर नदीतलं गढूळ पाणी प्यायचं आणि मोहोळ खायची. हे सगळं सिद्धार्थ यांनी केलं त्यांना काहीच झालं नाही. सापांची माहिती घेत असताना त्यांना नंतर समजलं की तो साप बिनविषारी आहे. सापांविषयी थोडी माहिती मिळाल्यावर त्यांनी काही प्रयोगही केले. जंगलात जाऊन सापाला पकडून गावात आणायचे, खेळवायचं आणि संध्याकाळी पुन्हा जंगलात सोडून द्यायचं. या कामांत सृष्टीदेखील सोबत असायच्या. सिद्धार्थ साप पकडतात हे गावात समजले. आणि तेथूनच त्यांची सर्पमित्र म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. मग गावात कोणाच्या घरी साप आला तर ते सिद्धार्थ यांच्याशी संपर्क करायचे. हे सगळं करत असताना सिद्धार्थ यांना प्राण्यांविषयी कळवळा वाटू लागला. आधी आपण त्यांना मारायचो पण आता पकडून जंगलात सोडत आहोत या स्वबदलाच्या जाणिवेतून त्यांनी वन्यप्राण्यांसाठी काम करायचे ठरवले.
![]() |
| सर्पराज्ञीतील उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या अजगराला जंगलात सोडताना वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण, सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे. |
![]() |
| हिंस्त्र तरसावर उपचार करताना सृष्टी सोनवणे |
सृष्टी आणि सिद्धार्थ लहानपणापासून सोबत असल्यामुळे एकमेकांना चांगलेच ओळखून आहेत. दोघेही नात्यात असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचे ठरविले. २०१० साली जागतिक पक्षी दिनाच्या निमित्ताने रामेश्वर येथील चौघाडा धबधब्याजवळील निसर्गरम्य परिसरात त्यांचा विवाह झाला. त्यांच्या विवाहाची व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. निसर्गाला पुजूनच विवाहाला सुरवात केली. फुलांच्या माळेऐवजी सिद्धार्थ यांनी सृष्टी यांच्या गळ्यात अजगर घातला तर सृष्टी यांनी सिद्धार्थ यांच्या गळ्यात धामण घातली. अक्षता म्हणून त्यांनी बियांचा वापर केला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीत लग्न करण्यामागचं कारण म्हणजे लोकांच्या मनात असलेली सापांविषयीची भीती दूर करायची. याच दिवशी त्यांनी गावातल्या लोकांसोबत निसर्गरम्य परिसरात सव्वाशे रोपं लावली.
![]() |
| बहुरूपी श्यन्य गरुडास प्रेमाने घास भरवताना सृष्टी आणि सर्पराज्ञी. |
- शैलेश दिनकर पाटील



खूप छान काम करतात दोघेही. अशी स्वप्नवत ऊदाहरणे आपल्याकडे फारशी नाहीत. आपल्या कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा!
उत्तर द्याहटवानिसर्गमित्र दादासाहेब पोळ संपर्क ९२२०४१०३७६