समाजाची भगिनी "निवेदिता"

रोजगार हमी योजना, पेसा आणि वनहक्क कायदा या विषयांवर जव्हार येथील 'वयम् चळवळ' काम करते. मिलिंद थत्ते या चळवळीचे प्रमुख आहेत. २०१९ला 'वयम्'ने सोशल मीडियावर एका उपक्रमाविषयी आवाहन केले होते. गावातल्या मुलांबरोबर विविध प्रयोग किंवा खेळाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायचे. त्या बदल्यात गावातील मुलं जंगलफेरी आणि वन भोजन घडवून आणतील. ही संकल्पना आवडली. माझे मित्र विकास आणि परमेश्वर यांच्याशी बोलून जव्हार जाण्याची तारीख ठरवली. 'वयम्'च्या कार्यालयात तेथील कार्यकर्त्या निवेदिता यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सांगितल्यानुसार ठरलेल्या गावात गेलो. दोन दिवस आम्ही निवेदिता यांच्यासोबत गाव आणि जंगलफेरी केली. त्यांचा गावातील लोकांसोबतचा संवाद पाहून कामाविषयीचा प्रामाणिकपणा दिसत होता. निवेदिता मूळच्या पालघर येथील अंबोडे गावच्या. शालेय शिक्षण घेत असतानाच काही तरी वेगळं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. घरची परिस्थिती जरा बेताचीच. दोन लहान बहिणी त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि घर सांभाळणं यासाठी निवेदिता यांनी मेहनत घेतली. बारावी नंतर त्यांनी चार-पाच ठिकाणी नोकरी केली. पण तेथे त्यांचे मन रमले नाही. त्या कामात त्यांना समाधान मिळेना. नोकरी करता करता पुढील शिक्षणही सुरूच होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केली. सुट्टीच्या दिवशी मासवण येथील 'आदिवासी सहज शिक्षण परिवारच्या' वसतीगृहातील मुलींना गणित, भाषा विषय सोप्या पद्धतीने शिकवायचे. त्यासोबत खेळ गाणी देखील व्हायचे.

निवेदिता सारिका सुरेश

निवेदिता यांचा मामेभाऊ हेमेंद्र समाजकार्याशी जोडलेला असल्यामुळे त्याला सामाजिक शिबिरांविषयी कल्पना होती. त्याने डॉ. अभय बंग यांच्या 'निर्माण'विषयी माहिती दिली. समाजातील परिवर्तन घडवणारी व्यवस्था या हेतूने निर्माणचे काम चालते. निवेदिता यांनी स्वतःची संपूर्ण माहिती भरून निर्माण येथे अर्ज केला आणि त्यांना मुंबई येथे मुलाखतीसाठी बोलावले. डॉ. अभय बंग यांचा मुलगा अमृत बंग मुलाखत घेणार होते. निवेदिता यांच्या अर्जातील माहिती पाहूनच अमृत बंग म्हणाले, 'तुम्हाला शिबिराची आवश्यकता नाही तुम्ही थेट संस्थेशी जोडून काम करू शकता.' विक्रमगडचे सुनील ढवळे यांची ढवळे ट्रस्ट आणि जव्हारचे मिलिंद थत्ते यांची वयम् चळवळ या दोन संस्थांना संपर्क करण्यास सांगितले. निवेदिता यांनी दोन्ही ठिकाणी स्वतःची माहिती पाठवून संपर्क केला. त्यातील मिलिंद थत्ते यांच्याशी बोलून कामाला सुरुवात केली. नोव्हेंबर २०१८ साली त्या 'वयम्'शी जोडल्या गेल्या. शिकवण्याची आवड म्हणून त्यांना वयमच्या 'धडपड प्रयोगशाळा' या उपक्रमात गुंतवले. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रयोगांची गोडी लागावी म्हणून सोप्या पद्धतीने त्यांना प्रयोगाची माहिती देणे. यु ट्यूबवर अरविंद गुप्ता यांचे टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाचे प्रयोग दाखवणारे प्रात्यक्षिके आहेत. ते प्रात्यक्षिके आधी स्वतः करून मग विद्यार्थ्यांना ते सांगणे. त्यासोबतच पाड्यांतील मुलांबरोबर गप्पा आणि जंगलफेरी उपक्रमदेखील होत. धडपड प्रयोगशाळेत त्यांच्या कामाचे कौशल्य पाहून त्यांच्याकडे जनसंपर्काचे काम दिले. जव्हार तालुक्यात येणाऱ्या गावांना भेटी द्यायच्या. तेथील लोकांना रोजगार हमी योजनांविषयी माहिती द्यायची. या योजनेतून गावकऱ्यांना काम आणि त्याचा मोबदला म्हणून वेतन कसे मिळेल याची इत्यंभूत माहिती देणे. अशा जबाबदाऱ्या त्यांना दिल्या.

पाड्यातल्या लोकांशी संवाद साधताना निवेदिता

जव्हार तालुका संपूर्ण आदिवासी भाग त्यामुळे तेथील भाषाही वेगळ्या. लोकांशी बोलून तिथली भाषा त्या स्वतः शिकल्या. मग लोकांशी त्याच भाषेत संवाद साधायचा. रोजगार हमी योजनेतून बऱ्याच गावांतील लोकांना फायदा झाल्यामुळे लोकांचा निवेदिता आणि वयम् चळवळीवर चांगलाच विश्वास बसला. या योजनेच्या व्यतिरिक्त पेसाविषयी जनजागृती करायची. गावातल्या लोकांना ग्रामसभेची माहिती द्यायची आणि त्यातून गावाला नेमका काय फायदा होणार आहे याचे महत्व पटवून द्यायचे. या सगळ्या कामांचा सतत पाठपुरावा करणं इत्यादी कामंही निवेदिता पाहतात. जव्हार तालुकाप्रमुखाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. वर्षभराचं टार्गेट ठरलेलं असतं त्यानुसार कामाची आखणी करतात. त्यांनी आतापर्यंत सत्तर गावांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक गावात त्यांनी स्वतःच्या कामाची छाप पाडल्यामुळे त्यांना कोणतेही गाव परके नाही. मुळात लोकांशी एकरूप होणं, चांगल्या भेटीने काम करणं आणि सगळ्यांना सांभाळून घेणं हा उत्तम गुण त्यांच्याकडे आहे. निवेदिता म्हणतात, 'पैशांपेक्षा आत्मिक समाधान मला येथे मिळते ते कोठेही मिळू शकत नाही आणि माणसाने समाज घडवण्यासाठी कायम तत्पर असले पाहिजे.' वयम् चळवळीच्या कामात सातत्य ठेऊन पुढे एम.एस.डब्ल्यू. करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"