आदिवासी, जग आणि फिरोजा ताफ्ती

 पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरातही आदिवासी समाज आहे. त्यांची भाषा, राहणीमान हे सारं कालानुरूप बदलताना दिसत आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या समाजाचे योगदान आणि सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून डहाणूच्या फिरोजा ताफ्ती १९९० पासून काम करत आहेत. त्यांचा पर्यावरणशास्त्रावर उत्तम अभ्यास आहे. फिरोजा मूळच्या मुंबईच्या. १९७९ साली त्यांचे लग्न डहाणूचे जहांगीर ताफ्ती यांच्याशी झाले आणि त्या डहाणूकर झाल्या. डहाणूच्या गंजाडजवळच पंधरा एकर जागेत त्यांची चिकुची वाडी आहे. तेथे त्या राहतात. चिकूच्या वाडीची संपूर्ण पाहणी त्यांचे पती पाहतात. वाडी जवळपासचा परिसर आणि तेथील संस्कृती फिरोजा यांना खूप भावली त्यामुळे त्या लोकांशी लवकर एकरूप झाल्या. जंगल म्हणजे आदिवासींचेच राज्य. हा समाज निसर्गपूजक आहे. स्वतःच्या गरजा आपण कशा सीमित ठेऊ शकतो हे या लोकांकडून सहज समजते. अशा गोष्टी हेरून येणाऱ्या पिढीला जाणीव निर्माण करून देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. दिल्ली येथे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज(INTACH) नामक संस्था आहे. त्या संस्थेचे काम जगभर सुरू असते. संयुक्त राष्ट्र संघाने INTACH ला २००७ साली संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेसह विशेष सल्लागारचा दर्जादेखील दिलेला आहे. नर्गिस इराणी इंटकच्या संयोजक होत्या त्यांनी फिरोजा यांना ते पद सांभाळण्यास दिले. डहाणू तालुक्यात INTACH च्या माध्यमातून आपण आणखी काहीतरी वेगळं करू असे त्यांनी ठरवले. त्यांना २००६ साली डहाणू तालुक्याची जबाबदारी दिली.

फिरोजा ताफ्ती

फिरोजा यांना पर्यावरणाविषयाची आवड असल्यामुळे त्या नर्गिस यांच्या 'पर्यावरण समिती संस्थेत' सहभागी आहेत. त्यांची पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याची कामे विविध ठिकाणी सुरू असतात.  शाळा आणि महाविद्यालयांत जाऊन पर्यावरणाचे धडे त्या देतात. त्यामुळे त्यांचा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी चांगला संबंध प्रस्थापित झाला. त्या सावटा येथील शिरीन दिन्यार इराणी लर्नर्स अकॅडमी या शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण विषय शिकवायच्या. कार्टूनच्या माध्यमातून व्हिडीओ बनवून त्यातून पर्यावरण संरक्षणाविषयीचे धडे द्यायच्या. पाच वर्ष(२००७ ते २०१२) त्यांनी त्या शाळेत सेवा केली. शाळा सोडल्यानंतर देखील त्यांनी तयार केलेले व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवणे सुरूच असायचे. डहाणूच्या धनश्री करंदीकर यांनी TID(दिस इज डहाणू) नावाचं यु ट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्या चॅनलवर फिरोजा यांची पर्यावरण विषयावर मुलाखत देखील आहे. धनश्रींना त्या वेळोवेळी मदत देखील करत असतात.  INTACHच्या डहाणू चाप्टरचा मूळ उद्देश 'आदिवासी संस्कृतीचे जतन करून येणाऱ्या पिढीसमोर मांडणे.' जुनं घर पूर्वी मातीच्या बांधकामचे असायचे पण आता प्रत्येक ठिकाणी काँक्रीट पद्धतीने बांधकाम सुरू आहे. एखाद्या पाड्यात जुन्या पद्धतीने काम सुरू असेल तर त्याचे व्हिडीओ काढून जतन करण्याचे काम फिरोजा करत असतात.

मराठी माध्यमाच्या शाळेत डहाणूच्या सांस्कृतिक वारसाविषयी माहिती सांगताना फिरोजा

आदिवासींच्या वारली कलेविषयी देखील त्यांनी मुंबई, डहाणू येथे वर्कशॉप भरवले आहेत. पद्मश्री जिवा सोम्या म्हशे यांच्या गावानजीकच त्यांची वाडी असल्यामुळे म्हशे यांच्याशी बऱ्याचदा भेट व्हायची आणि वारली चित्रकलेविषयी गप्पा व्हायच्या. त्यांतून त्यांना त्या कलेचे महत्व समजत होते. गंजाड गावातील बहुतेक तरुणांना एकत्र करून योग्य मार्गदर्शन केले. परदेशांतील लोकं INTACH शी संपर्क साधून वारली चित्रांची मागणी करत असतात. फिरोजा गावातल्या मुलांशी बोलून फ्रेमची साईज आणि चित्रकलेची थीम सांगतात त्यापद्धतीने गावातली मुलं ते बनवून देतात. त्याचा योग्य मोबदला मुलांना मिळत असतो. नोकरी नसल्यामुळे किमान या माध्यमातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागतो.  फिरोजा यांच्या प्रयत्नामुळे गंजाड येथील विजयच्या चित्रांचे प्रदर्शन परदेशांत भरवले गेले आहे तर राजेश मोर, प्रवीण म्हसे आणि साठ वर्षीय माणकीबाई यांना फ्रांसला जाण्याची संधी मिळाली.  तेथे वारली चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विदेशी जाण्याचा सगळा खर्च फ्रान्सच्या दुपट्टा संस्थेने केला होता. माणकीबाईंचा हा पहिलाच विदेशी दौरा होता. त्यांनी पारंपरिक वस्त्र घालून तेथे आदिवासी संस्कृतीची माहिती दिली. त्यांचा हा प्रवास फार आनंददायी होता. माणकीबाईंनी थेट विमानाचा प्रवास केला. फिरोजा म्हणतात, 'मी अजून जपानला गेले नाही पण गंजाडचा राजेश मोर आणि त्याने काढलेले चित्रं जपानला जाऊन आले.'

नेरळ येथील अंबी बाई आणि बुवांसोबत.

डहाणूपासून मुंबई एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे. परदेशांतील बरीच माणसं मुंबईत पर्यटनासाठी येत असतात. त्यांतील बरेच जण INTACH शी संपर्क साधून फिरोजा यांच्या वाडीवर येतात. फिरोजा त्यांना गावात घेऊन जातात. त्या गावातील चित्रकारांच्या घरी चित्र पाहण्यास जातात. पर्यटकांना पसंतीस आलेले चित्र पर्यटक विकत घेतात. वारली समाजाचा इतिहास त्यांचा रीतिरिवाज याची माहिती देणारे पुस्तक मधुकर वाडू यांनी मराठीत लिहिलेले आहे. त्या पुस्तकाचे फिरोजा यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी या भागांत चिकुचे उत्पादनं खूप आहेत. दरवर्षी येथे चिकू फेस्टिवलचे आयोजन केले जाते. डहाणू येथे पहिला चिकू फेस्टिवल INTACH ने सुरू केला होता. त्या फेस्टिवलमध्ये आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवायचे. दोनेक वर्षानंतर चिकू फेस्टिवल बोर्डी येथे समुद्रकिनाऱ्याजवळ भरू लागला. फिरोजा त्या फेस्टिवलमध्ये स्टॉल घ्यायच्या आणि तेथे वारली पाडा बनवायचे मग त्या पाड्यात उखळ, बावडी, घोंगडी, कोंबडी आणि तिचे पिल्ले, टोपली, तारपा या साऱ्या वस्तू आणि त्यांच्या माहितीचे फलक सोबत लावायचे. फेस्टिवलला येणाऱ्या लोकांनी त्या पाड्यात जाऊन मनसोक्तपणे सगळं हाताळायचं. वारली संस्कृती त्या स्टॉलवर अनुभवायची. फिरोजा स्वतः लोकांशी बोलून त्यांना उत्साहित करायच्या. आदिवासी संस्कृतीविषयी त्यांची फार तळमळ आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्याचा प्रचार-प्रसार देखील करत असतात. त्या म्हणतात, 'आम्ही डहाणूत राहून जर तिथला अभ्यास करत नसू तिथली संस्कृती अभ्यासत नसू तर आमचा तेथे राहून फायदा काय?' त्यांनी जतन केलेला संग्रह येणाऱ्या पिढीला फायदेशीर ठरणार आहे हे नक्की. 

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"