भिंगरी महोत्सव २०२५
अर्थीयन फाउंडेशनच्या भिंगरी महोत्सवाबाबत कल्पना होती. मागच्या वर्षी(२०२४) जाता आलं नाही परंतु यावेळची माहिती अनेकांकडून मिळाली. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावात भिंगरी महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष.(२०२५) ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या दुसऱ्या पर्वाची समाप्ती याच गावात झाली आणि त्यांच्या आगमनाने महोत्सवाला सुरवात झाली.
![]() |
| स्टेज आणि प्रवेशद्वारावरील सजावट. |
गावात एखादा उत्सव असल्यावर सजावटीसाठी जशी लगबग असते अगदी तशीच लगबग या उत्सवासाठी सुरु होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी तसेच गावातल्या प्रत्येक घराच्या बाहेर फुलांच्या आणि रंगांनी भरलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या. शिवाय गाव एकदम स्वच्छ होतं. गावातील मारुती मंदिराजवळचं मैदान गावातल्या तरुणांनी तसेच अर्थीयनच्या टीमने पूर्णपणे स्वच्छ केलं आणि छानपैकी सजावट करून स्टेज बनवला. या महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी व नवीन काहीतरी शिकण्यासाठी पुणे, नाशिक, मुंबई, वापी अशा ठिकाणाहून पाहुणे मंडळी आली होती.
![]() |
| मुलांनी काढलेले चित्रं. |
आलेल्या पाहुण्यांची गावातल्याच घरांमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आलेली. गावातली माणसं इतकी प्रेमळ आहेत की, त्यांनी त्यांचं घर पाहुण्यांसाठी अगदी मोकळं सोडून दिलं. मग आपलूकीने चहा, नाश्ता जेवणासाठी विचारणा करायचे. गावात फिरताना गावातील कोणतीही व्यक्ती भेटली की, चहासाठी आग्रह करायचे. इतकं प्रेम गावात मिळतंच.
![]() |
| सांस्कृतिक कार्यक्रम पहायला आलेले मुलं आणि पाहुणे मंडळी. |
दोन दिवसाच्या या महोत्सवाची सुरवात दवंडीने झाली. गावातील मुलं आणि आलेल्या पाहुण्यांनी सोबत करत गावच्या गल्लीबोळात जाऊन 'चला रे चला भिंगरी ला चला... काका, मावशी भिंगरीला चला' अशी दवंडी पिटवत होते. महोत्सवाचे उद्घाटन क्वेस्ट संस्थेचे संस्थापक निलेश निमकर सर आणि ऋषिकेश दादांच्या हस्ते झालं. वैशाखरे व खेवरा गावातील मुलांनी नाटक, नृत्य, वाद्यवृंदसहित गीत सादर केले. माईम, कथक, क्लाउनिंग, स्टोरीटेलिंग, नाटक, पारंपरिक गौरी नाच, ओरिगामी कार्यशाळा, ड्रम सर्कल या सादरीकरणासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून कलाकार मंडळी आले होते. शिवाय प्रोजेक्टरवर एक माहितीपट देखील दाखवण्यात आला. वैशाखरे आणि खेवरा गावातील मुलांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन भरवले होते आणि ते चित्र विक्रीसाठी देखील उपलब्ध होते. तसेच मुलांनी केलेले कोलाज काम देखील प्रदर्शनासाठी होते.
![]() |
| पुस्तक कट्टा कार्यशाळा, ओरिगामी वर्कशॉप आणि मुलांशी गप्पा. |
महोत्सव पाहण्यासाठी विविध संस्थेत काम करणारी माणसंही आली होती. वडाखालची शाळेचे यश आणि मेघा ह्यांनी त्यांच्या चिंचवाडी येथील आदिवासी मुलांना आणले होते. तसेच पुण्याच्या खडकवासला येथील जिल्हा परिषद शाळेतील रजनी सरांनी त्यांच्या शाळेतली पंधरा-वीस मुलं आणली होती. वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणारे प्रयोग पाहण्यासाठी ही प्रयोगशील माणसं सतत नवीन माहीती मिळवण्याच्या शोधात धडपडत असतात. त्या सरांकडे पाहून मला आमच्या उल्हास चव्हाणके सरांची आठवणी झाली. याशिवाय काही कुटुंब देखील त्यांच्या मुलांनी नवीन काहीतरी शिकावं-समजावं याकरिता सोबत घेऊन आले होते.
![]() |
| विविध नाटकं या व्यासपीठावर सादर झाली. |
भिंगरी महोत्सच्या शेवटच्या दिवशी तारपा नाच आणि झेम्बे वाद्यावर डान्स झाला. आलेल्या सर्व पाहुण्यांनी नाचण्याचा आनंद घेतला. भिंगरी सारखं फिरणाऱ्या या महोत्सवाची वाट आता दरवर्षी बघावी लागणार हे मात्र नक्की...!
- शैलेश दिनकर पाटील





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा