कळसुबाई ट्रेक...

कधी कधी अचानक ठरलेला प्लॅन तुम्हाला सुखद अनुभव देऊन जातो. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट समजलं जाणारं सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथे सूर्योदय पहायला म्हणे अनेकजण येत असतात त्याच भरतीमध्ये आम्ही पण सामील झालो. पण दिवस निवडला तो अगदी शुक्रवार रात्र आणि शनिवारच्या पहाटेचा. नाईट ट्रेकचा वेगळा अनुभव घ्यायचा होता.

आकाशातून दिसणारे ग्रह-तारे..

मागच्यावेळी सावर्णे गावात मोहनच्या 'सुख सह्याद्रीत' नाईट कॅम्पिंगचा अनुभव घेतला होता. मोहननेच बारी गावातील सह्याद्री हॉटेलचे जनार्दन कचरे ह्यांचा संपर्क दिला. मग मुक्काम तिकडेच करायचं ठरलं. बारी गावात आम्ही रात्री एक वाजता पोचलो. तेथून जनाभाऊंच्या घरी आलो. तेच आमचे गाईड असल्यामुळे आम्ही एकमेकांची ओळख करत पहाटे तीनला ट्रेक सुरु करायचे ठरवले. आमच्याकडे तासभर वेळ होता. घराबाहेर खुर्च्या टाकून आम्ही बसलो. आकाशाकडे पाहिलं तर ग्रह-तारे अगदी स्पष्ट दिसत होते. मग नेहमी प्रमाणे मोबाईलमध्ये ऍप ओपन करून ग्रह-तारे चाळत बसलो. तेच चाळता चाळता आमच्या गप्पा सुरु होत्या.

शिखरावरून दिसणारा सूर्योदय.

पहिलाच नाईट ट्रेक असल्यामुळे गाईड घेणं गरजेचं वाटलं आणि महत्वाचं म्हणजे जनाभाऊंचं काम आणि कळसुबाईविषयी अधिक माहिती समजणार होती. सुरवातीला त्यांनी सूचना दिल्या. सोबत जे काही आणलं असेल त्याचा कचरा इतरत्र न टाकता सोबत घेऊन जावा. त्यांचं म्हणणं अगदी रास्त होतं. ट्रेक सुरु झाला. सुरवातीची ऊर्जा जोरदार होती. पण चढ आल्यावर अंगात संचारलेली थंडी पळत होती थोडा थकवा जाणवत होता पण नंतर सगळे नॉर्मल झाले. जसा वेळ जात होता तशी पर्यटकांची संख्या वाढत होती. पुणे, मुंबई, कोलकाता, कर्नाटक येथून ट्रेकर्स टीम येत होत्या. त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी होती. हळूहळू प्रवास करत थांबत आणि नेहमीप्रमाणे आता पंधरा मिनिटात पोचू असे सांगत सर्वजण क्षणिक आनंद घेत होते. चढाई थोडी कठीण आहे परंतु नेहमी ट्रेक करणारा माणूस अडीच-तीन तासांमध्ये पोचतो फक्त नवख्या माणसाला साधारण चार तास लागतात.

आमचा ग्रुप...

कळसुबाई चढताना चार लोखंडी जिने(शिडी) लागतात. त्यावरून जाताना मात्र मनात भीती असते पाय सरकला की काही खरं नाही. हळूहळू वर चढत होतो. मंदिराकडे जाणारी शेवटची शिडी चढताना वेगळाच आनंद होता. कळसुबाई शिखर सर केल्यानंतर तिथल्या सूर्योदयचा अनुभव घ्यायचा होता. अनेक जण तीन-चार तास ट्रेक करून अगदी दुरून केवळ सूर्योदयाचा सुखद अनुभव घेण्यासाठी आले होते. गुलाबी थंडी त्यात जोराचा वारा असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून आणलेले सर्व स्वेटर, शाल अंगावर पांघरून घेतल्या होत्या.

कळसुबाई पायथा..

डोंगराच्या पलीकडून सुंदर असे दिसणारे नारंगी किरणे...! हळूहळू सूर्य वर येत होता. तप्त लाल गोळा उच्च तापमानाला तापवल्यावर जसा भडक दिसतो अगदी तसाच दिसत होता. ते पाहताना राजाऊच्या आवडीची कविता आठवली.

'डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे,

शेकत बसले डोंगर निळे,

उंच आभाळत रंगत जुळे....

सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुखद हसू येत होतं. काहींनी तो क्षण मोबाईलमध्ये टिपला तर काहींनी तो क्षण जिवंत डोळ्यांनी अनुभवला बहुतेक त्यांनी त्यावेळी सूर्याशी अगदी मनोमनी गप्पा मारल्या असाव्यात. सगळे सुखद क्षण घेतल्यावर कळसूआईचे दर्शन घेऊन फोटो वैगरे घेत परतीच्या प्रवासाला निघालो. लोखंडी जिन्यावरून चढताना काही वाटले नाही परंतु उतरताना पाय अगदी लटलट करत होते. हळूहळू उतरत अध्ये-मध्ये धडपडत सगळे जण सुखरूप पायथ्याला पोचले.

शिखरावरून दिसणारे दृष्य.. 

कळसुबाईविषयी दोन-तीन आख्यायिका सांगितल्या जातात. कळसुआई ही तिथल्या गावची सुन होती. तिला औषधी वनस्पतींबद्दल माहिती होती. त्या वनस्पतींचा वापर करत ती गावातील लोकांची सेवा करीत. तिच्या मृत्यूनंतर तिची ओळख म्हणून त्या शिखराला कळसुबाई असे नाव दिले व आठवण म्हणून मंदिर बांधले. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेलं बारी हे बाराशे लोकवस्तीचं गाव.

जनाभाऊ सह्याद्री हॉटेल चालवतात. कळसुबाईसाठी येणारी माणसं त्यांना मार्गदर्शक म्हणून सोबत असतात तसेच ते नाईट कॅम्पिंग देखील करतात. घराच्या जवळच या सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या आहेत. एक वेगळेपणा घेऊन काम करायचं असं दिसत होतं बाकी एक हाडाचा ट्रेकर अथवा एखाद्याला जाण असावी असा हा मनुष्य. दुपारचं जेवण त्यांच्या घरी करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. शेवटी इतकंच सांगेन आयुष्यात एकदातरी कळसुबाईला आलं पाहिजे...

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"