'गुगल' नव्हे तर "गुरू"
शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जरा वेगळंच असतं. शिक्षकाला सतत वाटत असतं, की आपल्या हातून उत्तम विद्यार्थी घडावा, त्याने त्याचे आयुष्य सार्थकी लावावे. मी उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत शिकलो त्या शाळेत अनेक शिक्षकांनी सहकार्य केलं. चांगलं शिकवलं. सगळ्या शिक्षकांमध्ये एक शिक्षक तर खास असतोच. आमच्या शाळेतले उल्हास चव्हाणके सर हे विद्यार्थीप्रिय आहेत असे म्हणायला हरकत नाही. शालेय शिक्षण संपल्यानंतरही ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात. कोणाचं काय सुरू आहे कोणी चुकीच्या मार्गाला नाही ना हे सतत तपासत असतात. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे २०२० साली 'कोकणरत्न गुणवंत' पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना मिळाला. मी फोनवर शुभेच्छा दिल्या त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत ते म्हणाले, की 'अरे मी कुठे फार मोठं काम करतो.' मुळात काम दिसतंय म्हणूनच तर त्याचं फळ मिळतंय. चव्हाणके सर महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेचे माजी विद्यार्थीच. एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी चांगली जवळीक साधली. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. अमुक विद्यार्थी हुशार किंवा मठ्ठ अशी वर्गवारी कधी केली नाही.
![]() |
| उल्हास चव्हाणके सर |
सरांच्या हाताला इतकं वळण आहे की न बघता ते भारत, आफ्रिका, अमेरिका, इंग्लड इत्यादी देशांचे नकाशे फळ्यावर सहज रेखाटतात. अजूनही शाळेचे माजी विद्यार्थी चव्हाणके सरांची ही कलाकृती चांगलेच ओळखून आहेत. त्यांचा आवडता छंद बुद्धिबळ! एखादा चांगला प्रशिक्षक शिकवू शकेल त्यापेक्षाही जास्त आत्मीयतेने आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मित्राप्रमाणे खेळून मुलांना त्यात पारंगत करायचं हे कौशल्य अप्रतिम आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरच्या गोष्टीतही रमवत असतात. निसर्गात रमण्याचा सरांचा खास छंद. विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ कशी लागेल त्यावर त्यांचं नेहमी लक्ष असतं. त्यातून पक्षी निरीक्षणाचा छंद विद्यार्थ्यांना लावला. विविध जातींचे पक्षी त्यांच्या आवाजावरून ओळखणे. त्याची माहिती सांगणे असे सारे सुरू असते. त्यातच सर्पमित्राबरोबर फिरता फिरता ते साप पकडायचे देखील शिकले. विषारी-बिनविषारी सापांची माहिती घेऊन त्याला कसे हाताळणे हे सगळं जाणूनच पुढे पाऊल उचलायचे. शहरी भागात कोठे साप आढळला आणि त्यांना समजले तर ते सापाला पकडून जंगलात व्यवस्थित सोडायचे. सरांचा मोठा मुलगा अर्णव त्याचे वय अकरा वर्ष. तो बिनविषारी साप सहज हाताळतो. सरांनी एक किस्सा सांगितलेला अर्णव तीन वर्षाचा असेल त्यावेळी सरांनी हरणटोळ पकडून त्याला गोल करून अर्णवच्या डोक्यावर ठेवलेला. आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना कल्याणच्या लाल चौकीला घेऊन गेलो होतो. तेथे सर्पमित्र दत्ता बोंबे असतात. त्यांच्याकडे काही साप आहेत. ते साप हाताळण्याचे प्रात्यक्षिके दाखवायचे त्यावेळी अर्णवने धामण हाताळली होती ते पाहून जरा आश्चर्यच वाटले.
आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रांविषयीची माहितीही सर उत्तमपणे सांगतात. अमावस्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षणाला घेऊन जातात. जेणेकरून आकाशातील तारे सहज दिसू शकतील. २०१८ साली रायगडला शाळेची सहल गेली होती. रात्रीची वेळ. आम्ही महाडला एका ठिकाणी थांबलेलो. तिथे जेवणाची व्यवस्था होती. मुलांचे जेवण आटोपून मुलं बसजवळ आले. तो वेळ वाया जाऊ न देता सरांनी तेथे मुलांना आकाश निरीक्षणाचे धडे दिले. म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा, वेळेचा कसा सदुपयोग करता येईल. याचे उत्तम उदाहरण समोर होते. सरांना ट्रेकिंगचे वेडही आहे. ट्रेकिंगसाठी दूरवर जाणे झाले नाही तर त्यांचा कल्याणमधील दिंडीगड म्हणजे हक्काचा गड. दोन महिन्यातून तरी तेथे जाणे असतेच. आणि जाताना शाळेतल्या मुलांना घेऊन जातात. तिथे गेल्यावर झाडांची, पक्ष्यांची, जवळपासच्या वास्तूंची माहिती विद्यार्थ्यांना सांगतात. एखाद्या कार्यक्रमाची किंवा सहलीची मॅनेजमेंट एकदम जबरदस्त असते. इतिहास, माहिती, गप्पा, मौजमस्ती हे सारं काही त्या सहलीत होतं आणि ती सहल संस्मरणीय ठरते.
![]() |
| महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेत इतिहास अभ्यास कार्यशाळेचे आयोजन. |
आय.पी.एच. अंतर्गत डॉ. आनंद नाडकर्णी यांचा 'वेध' नामक कार्यक्रम असतो. ज्यात यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात. विशेष म्हणजे या सगळ्या मुलाखती विद्यार्थ्यांसाठीच असतात. सरांना वेधविषयी माहिती मिळाली. ठाण्यात जेव्हा वेध सुरू झालं तेव्हापासून ते वेधच्या कार्यक्रमाला न चुकता जातात. पहिले वर्ष स्वतः गेल्यानंतर तिकडे जे काही घडलं ते दुसऱ्या दिवशी शाळेतल्या विद्यार्थ्यांना येऊन सांगणे आणि मग पुढच्या वर्षीसाठी विद्यार्थ्यांना वेधला घेऊन जाण्यासाठी तयार करणे त्यांची ही कसरत सुरूच असते. उल्हासनगर ते ठाणे हा प्रवास करत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जाणार. ज्यांची इच्छा आहे पण तिकीट काढण्याइतपत परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांचे पैसे स्वतः भरून कार्यक्रमाला घेऊन जातात. त्यांची एकच इच्छा असते, की त्या कार्यक्रमातून मुलांनी काहीतरी शिकले पाहिजे. कोठल्यातरी कारणांमुळे विद्यार्थी निराश झाले आणि त्यांनी त्या निराशेत वाईट साईट केले. तशा गोष्टी विद्यार्थ्यांकडून होऊ नये म्हणून त्यांना या मुलाखतीच्या कार्यक्रमाला घेऊन जात. मुलाखत पाहून झाल्यांनंतर विद्यार्थ्यांकडून अभिप्राय नोंदवून घ्यायचे. कल्याणला जेव्हा वेध सुरू झाला तेव्हा सरांना फारच आनंद झाला. जवळच 'वेध' आल्यामुळे ठाण्याला नेण्याची दमछाक वाचली. वेधला आलेल्या फॅकल्टी बरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधून देण्याचे कामही करतात. या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यक्तींविषयी माहिती होतेच पण आत्मविश्वासही वाढीस लागतो. सर स्वतः एक संग्राहक आहेत. त्यांच्याकडे नाण्यांचे संग्रह आहे. ब्रिटिशकालीन नाणी, शिवराई असे विविध नाणे त्यांच्याकडे आहे. शाळेत दरवर्षी आनंद मेळावा भरत असतो या आनंद मेळाव्यात ते स्वतःकडील नाण्यांचे प्रदर्शनही भरवत असतात.
![]() |
| संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांना नाण्यांची माहिती देताना चव्हाणके सर |
दरवर्षी दिवाळीत मुलांना प्रबोधिनीचे दिवाळी अंक उपलब्ध करून देतात.. जेणेकरून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. सरांना आणखी एक सवय होती. गप्पा मारताना सतत काहीतरी विचारत असतात. आधी जेव्हा महाविद्यालयात शिकवायचे तेव्हा सर विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शिकवण्याबद्दल प्रतिक्रिया लिहून घ्यायचे. त्या बिननावाच्या पत्रांत विद्यार्थ्यांकडून स्वतःच्या शिकवण्याची बलस्थाने, सल्ले असं सगळं विचारायचे.. आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करायचे. विद्यार्थ्यांनाही विविध संग्रह करण्याचे आवाहन करत असतात. शाळेच्या विद्यार्थ्याने फक्त पुस्तकी किडा न राहता परिपूर्ण विद्यार्थी बनून स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता आहे असे सरांना कायम वाटत असते. शाळा सोडलेला एखादा विद्यार्थी व्यसन करताना शाळेबाहेर आढळला की सर त्याची भेट घेऊन त्याची काळजी करत त्याला समज देत. समज देऊन बरेच विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला दिसला आहे पण जे समज देऊनही सुधरले नाही त्यावेळी सर स्वतःवर नाराज होतात आपण कोठेतरी कमी पडलो याची खंत त्यांना वाटत असते.
- शैलेश दिनकर पाटील




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा