वाबळेवाडीची प्रयोगशील शाळा..

वाबळेवाडीच्या झिरो एनर्जी स्कुल बद्दल ऐकून होतो. आम्ही मित्र अष्टविनायक करत होतो त्यावेळी थेऊरचा बाप्पा करून आम्ही शिक्रापूर मार्गे वाबळेवाडी शाळेत पोचलो. वाबळेवाडीची ही शाळा जिल्हा परिषदेची. माध्यम मराठी. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश केला तर शाळेचं वातावरण उत्सवमय होतं. गोपाळकाला असल्यामुळे शाळेत दहीहंडीचा छोटासा कार्यक्रम सुरु होता. शाळेच्या प्रवेश द्वारापाशी चप्पलचे स्टॅन्ड आहे. तेथे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या चपला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रचून ठेवल्या होत्या. वारे गुरुजींनी या शाळेचा कायापालट केल्या त्याबद्दल ऐकून होतो. फारूक सरांना फोन करून त्यांनी मला तिथल्या सचिन सरांचा नंबर दिला होता आणि आदल्या दिवशी आम्ही येणार असल्याची कल्पना त्यांना दिली. शाळेत पोचल्यावर आम्ही सचिन सरांची भेट घेतली. आणि मग आमच्या गप्पा सुरु झाल्या.

शाळेची वर्गखोली.

२०१२ साली दत्तात्रय वारे गुरुजींची या शाळेत बदली झाली. ग्रामस्थांशी चर्चा आणि त्यांच्या भेटीगाठी करत त्यांना विश्वासात घेऊन गुरुजी आणि ग्रामस्थांनी शाळेचा कायापालट केला. ग्रामस्थांनी स्वतःची एक-एक गुंठे असे करत दीड एकर जमीन शाळेकरिता दिली. शाळेच्या उभारणीकरिता बँक ऑफ न्यूयॉर्ककडून दीड कोटी रुपयांची मदत मिळाली. या मदतीने शाळेत वर्गखोल्या बांधल्या गेल्या. ग्रामस्थांच्या सहकार्याने काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. हजारो विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असतात. मोठमोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा जवळ असून देखील या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड सुरु असते.

शाळेच्या सर्व वर्गखोल्या पारदर्शी आहेत. चारही बाजूने काचेच्या(स्लाईडींगच्या) भिंती. वर्गखोलीत शिक्षकासाठी टेबल वा खुर्ची नाही. पंखा आणि ट्यूबलाईट पण नाही. विद्यार्थी भारतीय बैठकीत बसतात. शिक्षक समरस होऊन शिकवतात. वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना गरम होऊ नये या करिता खोलीचे छत वेगळ्या धाटणीचे बनवलेले आहे. त्यातून उष्णता परावर्तीत होते. अशा एकूण आठ वर्गखोल्या आहेत. वर्गखोलीतल्या तळघरात एक लाख लिटर पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. रेन हार्वेस्टिंगचा प्रकार या शाळेत पहायला मिळाला. या पाण्याचा वापर विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी होतो. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा. विद्यार्थी संख्या सहाशे आणि शिक्षक पंधरा.


गप्पा मारताना आम्ही विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत होतो. शाळेच्या पटांगणात दहीहंडीचा कार्यक्रम सुरु होता आणि इयत्ता आठवीचे विद्यार्थी वर्गात शिकत होते. बाहेर विद्यार्थ्यांचा कल्ला सुरु होता पण त्या वर्गातील एकही विद्यार्थी बाहेर डोकावत नव्हता. हे खूप विशेष होतं. शाळेच्या परिसरात काही मुलं दोन वेगळ्या ट्रेमध्ये कचरा वेचत होते. त्यात ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण होतं. मुलं हे स्वतः करत होते. त्यामुळे शाळेच्या आवारात एकदम स्वच्छता होती.

शाळेचं स्वतंत्र असं ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात एनसायक्लोपीडिया देखील आहे. इथली मुलं ही पुस्तकं चाळतात. सचिन सरांना साहित्याची गोडी आहे. त्यांची स्वतःची बावन्न पुस्तकं प्रकाशित आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना गोष्ट आणि कविता वाचन करून घेणे असे उपक्रम ते करत असतात. याचा परिणाम असा झाला की, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी कविता करायला लागले. झाड, नदी, शाळा असे विषय घेऊन कविता रचल्या. दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दोन काव्यसंग्रहदेखील प्रकाशित केले गेलेले आहेत. या सगळ्यामागे सचिन सरांची अफाट मेहनत आहे. शाळेतील इतर शिक्षकही त्यांच्यापरीने विविध उपक्रम राबवत असतात.

सचिन बेंडभर सरांसोबत आमची बाराखडी टीम आणि शाळेतील विद्यार्थी.

आम्ही माघारी निघताना सरांनी आमच्या समोर काही प्रयोग केले. इयत्ता पहिलीच्या मुलांना मराठी लिहिता आणि वाचता देखील येतं. त्यांनी आमच्यासमोर सचित्र बालमित्र पुस्तकं काढलं त्यातलं एक अक्षरावर बोट ठेवायला सांगितलं. सचिन सरांनी विद्यार्थ्यांशी विशेष खानाखुणा करत शब्द ओळखण्यास सांगितलं. अवघ्या वीस सेकंदात विद्यार्थ्यांकडून उत्तर मिळालं. त्यांच्या त्या प्रयोगमुळे विद्यार्थ्यात शिकण्याची गोडी आपसूकच निर्माण होते. सरतेशेवटी सरांनी त्यांची बालकविता सादर केली. वाबळेवाडीतून आम्ही बाहेर पडताना प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडलो. या भेटीचं संपूर्ण श्रेय आमचे खास शिक्षक मित्र फारुक सरांना देईल.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"