निसर्ग पूजणारी माणसं
बारड गडावर भेटलेली ही दोन माणसं. त्यातला एक माणूस अगरबत्ती लावून पूजा करत होता त्याच्या जवळ गेलो अन् त्याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, बाफळी(बाफली?) नामक वनस्पती आहे. ती लावण्याकरिता मी आलो आहे. एखाद्याचं पोट दुखत असेल अथवा पोट साफ होत नसेल तर ही वनस्पती खाल्ली की बरं होतं. शिवाय त्याने ती अगदी कडू असल्याचंही सांगितलं.
आम्ही त्याच्याकडून ती बाफळी हातात घेतली आणि त्यांना विचारलं तुम्ही कशाला आलेत. तर ते म्हणाले मी महिन्यातून इथे येत असतो. गडावर बाफळी वनस्पती लावण्याचं काम मी माझ्या परीने करतो. शिवाय हे करण्याआधी ते अगरबत्ती पेटवून काही मंत्र बोलून पूजा करत होते. ही निसर्गपूजा अगदी भावत होती.
पुढे गेल्यावर आणखी एक माणूस भेटला तेव्हा ते म्हणाले मी जडीबुटी घ्यायला आलोय. मग आमच्या माहितीकरिता त्यांना विचारलं तर त्यांनी एक एक वनस्पतीची माहिती सांगितली. त्यांच्या हातात जी वनस्पती आहे ती कॅन्सर आजाराकरिता उपयुक्त असल्याचे सांगितले तसेच ज्यांना मूल-बाळ होत नाही त्यांच्याकरिताही काही औषधं असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थात हे ते खूप आधीपासून करत असावेत किंवा त्यांच्या घरची ती परंपरा असावी.
ह्या आदिवासी माणसांना वनवासी असं देखील संबोधलं जातं. आपल्यापेक्षा निसर्ग त्यांना अधिक कळतो. निसर्गाशी संवाद साधनं आणि त्याची पूजा अर्चा करणं हे त्यांच्याकडून(जुन्या-जाणत्या) माणसांकडून चांगलं शिकायला मिळतं. आपण या निसर्गाकडून काहीतरी घेतोय पण आपण त्याबदल्यात त्यालाही काहीतरी देऊ असा सेवाभाव त्या दोन्ही माणसांकडे पाहून दिसत होता.
- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा