बारड ट्रेक अनुभव...
मागच्या वर्षी(२०२२) बारड गडाकडे निघालो होतो पण रस्ता चुकल्यामुळे तो पूर्ण करता आला नाही. अखेर मागच्या रविवारी(२०२३ जुलै) आमच्या कार्यालयातील संघटनेच्या वतीने बारड गडाकडे निघालो आणि गडावरील चढाई पूर्ण केली. विशाल महाकाय असा बारड गड. गडावर चढाईकरिता अनेक रस्ते आहेत. उंबरगाव रोड रेल्वे स्थानकापासून चौदा किमी अंतरावर असलेल्या करजगाव येथून गडावर जाता येते. तसेच अस्वली, वेवजी सोनारपाडा येथूनही जाता येते.
०२ जुलैला गडावर तलासरी-डहाणू तालुक्यातील अनेक जण मोठ्या संख्येने तिथे येतात. असं ऐकून होतो की गडावर निसर्गाची पूजा करण्याची ही प्रथा होती. त्यावेळी तारपा व ढोल वाजवून नृत्य करतात.(याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे.)
बारड गडावर बहरोत नामक लेण्या आहेत. त्याचा नेमका इतिहास माहित नाही पण अनेकदा लोकांकडून विविध माहिती मिळत राहते. संजान येथे पारसी लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. साधारण चौदाव्या शतकात तुघलकच्या सेनापतीने संजान येथील पारसी वसाहतीवर हल्ला केला आणि तेथील पारसी लोकं गडावर आले. तेरा वर्ष या गडावर ते लपून होते त्यांनी त्या तेरा वर्षाच्या काळात इराणशाह ज्वाला बहरोत येथे हलवण्यात आली. असे म्हटले जाते. त्याआधी बौद्ध भिख्खुंनी तेथे लेण्या कोरल्याचे सांगितले जाते. नेमकी माहिती उपलब्ध नाही. गडावर काही लेण्या कोरलेल्या आहेत. पावसाळ्यात तेथे पाणी साचलेले असते.
![]() |
| लेण्यांचे अवशेष. |
गडावर चढाई करायला सुरवात केली. वर पाणी नसल्यामुळे प्रत्येकाला किमान तीन लिटर पाणी घेऊन जाणे बंधनकारक होते. गावातले काही जण सोबत असल्यामुळे काही वजनाचा भार त्यांनी घेतला होता. साधारण चढाईस दोन-अडीच तास लागले. प्रत्येकाची वाट पाहूनच आम्ही पुढे जात होतो. गडावर दोन वयस्कर माणसं भेटली. ती माणसं जडिबुटी अर्थात आयुर्वेदिक औषधं घ्यायला आली होती त्यामागची त्यांची शास्त्र उत्तम होते. जेवण वगैरे आटपून माघारी परतलो. उतरताना आम्ही वेगळा रस्त्याने निघालो. आणि तोच खरा थ्रील होता. एकच जण चालू शकेल अशी पायवाट होती आणि आजूबाजूला पूर्णपणे झाडी. हा थ्रील चांगला अनुभवायला मिळाला.
यावेळी देखील माझी लेक राजाऊ सोबत होती. एरव्ही जबरदस्तीने उठवायला लागतं पण डोंगरावर जायचं म्हटलं तर एका आवाजात किरकिर न करता उठली. यावेळी ती एक किमी अंतर जास्त चालली अर्थात मागचा अकरा किलोमीटर स्वतःचाच रेकॉर्ड मोडत बारा किलोमीटर चालली. आणि चालताना तिची बडबड सुरूच होती. शिवाय संध्याकाळी आल्यावर ना थकवा ना काही. तिची उत्सुकता पाहून मलाही आनंद होतोय.
- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा