पाटणादेवी मंदिर...
लहानपणी अनेकांनी महादेवाच्या मालिका पाहिल्या असतील. त्यात राग आल्यावर महादेवाने तांडव नृत्य केल्याचं देखील पाहिलं असेल. त्याची कथा अशी होती की, दक्षप्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञास दक्षप्रजापतीची सती नामक पुत्री आणि त्या सतीचे पती महादेव यांना निमंत्रण नव्हते. तरीही सती त्या यज्ञास जाते. आणि तिथे तिचा अपमान होतो. झालेल्या अपमानाची चीड येऊन सती त्या यज्ञात स्वतःचा देह टाकून देते. महादेवाला असे समजताच त्यांना प्रचंड राग येतो. महादेव सतीच्या शवाला जवळ घेतात व दक्षप्रजापतीचे मुंडके छाटतात. आणि तांडव नृत्य करायला लागतात. ते करत असताना त्यांचे तिसरे नेत्र उघडले जाते. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शन चक्राचा वापर करून सतीचे तुकडे करतात. सतीचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाली. अशा अनेक आख्यायिका आजही ऐकायला मिळतात.
![]() |
| पाटणादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दीपमाळ... |
खान्देशातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर पाटणा हे गाव आहे. गावच्या नजीक गौताळा अभयारण्य आहे. त्यात चंडिकादेवीचं मंदिर(पाटणादेवी), हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेर गड, पितळखोरे लेणी, गणितज्ञ भास्कराचार्यांचे जन्मस्थळ तसेच निसर्गरम्य वातावरण पहायला मिळते. प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी पाटणादेवी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. डोंगरनदीच्या पलीकडे मंदिर आहे. पूर्वी तेथे एक पूल होता परंतु पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे तो वाहून गेला. सद्य स्थितीत त्या पाण्यातून मंदिराकडे जावं लागतं.
![]() |
| मंदिराची मागची बाजू.. |
![]() |
| मंदिराच्या परिसरात भग्न अवस्थेत असलेल्या मुर्त्यांचे अवशेष.. |
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दोन मोठ्या दीपमाळ आहेत. त्यापुढे पायऱ्या चढून मंदिरात जाता येते. मंदिराची पडझड झालेली आहे. प्रथमदर्शनी गणपतीची मूर्ती आहे. शेजारी दोन मुर्त्या आहेत त्या नेमक्या कोणाच्या आहेत कल्पना नाही. त्याच आवारात शिवलिंग आहे. थोडं पुढे गेलं की भगवान विष्णुची मूर्ती पहायला मिळते. आणि त्याच्या पुढे चंडिकादेवीचं दर्शन घडतं. ही देवीची स्वयंभू मूर्ती आहे. त्याची स्थापना गोविंद स्वामींनी केल्याचे सांगितले जाते.
![]() |
| गाभाऱ्यात असलेली चंडिका देवी, विष्णू आणि गणपती समवेत उमा पार्वती.. |
मंदिर परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर शिवलिंग व अनेक मूर्तीचे अवशेष पडलेले आहेत. परिसरात आणखी प्राचीन शिल्पाकृती पहायला मिळते. नवरात्रौत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरी होते. या दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी येथे पाहायला मिळते.
- शैलेश दिनकर पाटील




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा