खान्देशातील लोकपरंपरा 'वन'

जसे कोकणात 'दशावतार', विदर्भात 'सोंग', आदिवासी भागात 'बोहाडा' त्याचप्रकारे जळगाव जिल्ह्यात 'वहन' ही लोकपरंपरा जपली जाते. चोपडा तालुक्यातील हातेड गावात 'वहन' लोकपरंपरा एक वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. अहिराणी भाषेत 'वहन' शब्दाचा अपभ्रंश होऊन 'वन' या शब्दानेच ही लोककला प्रचलित आहे. जळगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हातेड गाव आहे. या गावातील एकूण लोकवस्ती चार हजार पाचशे. 'वन' ही लोककला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पन्नास वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावात अगदी नियमितपणे सुरू आहे. २००७ सालानंतर या लोककलेत काही कारणांमुळे दोन वर्ष खंड पडला होता. गावातल्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्यावर विचार केला, की पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण जपली पाहिजे या हेतूने गावातले लोकं उत्साहाने पुढे आले. २००९ पासून ते आतापर्यंत या लोककलेचे सादरीकरण उत्तमपणे होत आहे. लोककलेत कलाकार मंडळी 'रामलीला' सादर करतात. गावातल्या श्रीराम मंदिरासमोरच त्याचे सादरीकरण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणाऱ्या रामलीलाचा कालावधी पाच दिवसांचा असतो. त्या पाच दिवसांत तीन ते चार तास कलाकार मंडळी त्यांची कला सादर करत असते. रामलीला पाहण्यासाठी हातेड गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांपासून ते प्रौढ माणसं सारे जण येतात. 


रामलीलाची सुरुवात श्रीगणेशवंदनाने होते. त्यानंतर 'विश्वामित्राचा सुरू असलेला यज्ञ भंग करणारी त्राटीका-त्या त्राटीकेचा वध-शूर्पणखेचे विद्रुपीकरण-श्रीरामांचा वनवास-मारुतीचे आगमन आणि शेवटच्या दिवशी रावणाचा वध अशा प्रसंगाचे सादरीकरण होते. या कलेतील युद्ध नृत्यस्वरूपात होते. श्रीरामांच्या वनवास पाहताना प्रेक्षक मंडळी भावुक होते. ही लोककला संवादानेच नाही तर पद आणि भजनांनी देखील गुंफली आहे. पात्र साकारणाऱ्या कलाकारांबरोबर वादकांचा ही मोलाचा वाटा आहे. रामायणाव्यतिरिक्त महिषासुर, वीरभद्र, मत्स्यावतार हे देखील या कलेचे आकर्षण आहे. रामलीला सादर करणारी मंडळी याच गावातली असते. सहभागी असणारी मंडळी स्वतःची नोकरी, शेती सांभाळून परंपरा जपण्याचे काम करते. रामलीलेतील स्त्री पात्र पुरुष मंडळीच साकारतात. रामलीलाची तालीम एक महिनाआधीच सुरू करतात. कार्यक्रमासाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून जमा केला जातो. कला सादर करणारी मंडळी कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही. येथील लोककलेच्या परंपरेबद्दल एबीपी माझा या वृत्तवाहिनीनेदेखील दखल घेतली आहे.


माहिती स्रोत : कमलेश सोनवणे

- शैलेश दिनकर पाटील

('वन' या लोककलेच्या सादरीकरणाचे फोटो उपलब्ध नाहीत. कोणाकडे फोटो असतील तर त्यांनी जरूर कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"