कोहोज ट्रेक...
सप्टेंबर महिन्यातला ट्रेक करिता ठरवलेला कोहोज किल्ला. यावेळी कोहोज किल्ल्याला जाण्याकरिता खूप उशीर झाला. नाणे गावमार्गे जाण्याचे नियोजन ठरले. स्थानिक दोन-तीन गावकरी आम्हाला दिले. पण त्यातले एकच जण आमच्या सोबतीला आला.
प्रचंड पावसामुळे गवत आणि झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे जाणारी वाट समजून येतं नव्हती. 'शककर्ते शिवराय' समूहाने दिशादर्शक बाण असलेले पोस्टर लावलेले पण त्यावरील बाण स्पष्ट दिसत नव्हते. पायथ्याला आम्ही पंधरा-वीस मिनिटे रस्ता भरकटलो होतो. मार्गदर्शकाला पण ठाऊक नव्हतं. अखेर त्याने एक वाट दाखवत आम्ही त्यामार्गे निघालो. आणि गडाच्या मूळ वाटेशी पोचलो.
![]() |
सरळ उंच अशा चढाईचा किल्ला. रस्त्यात मोठमोठे दगड. आणि त्या पावसामुळे दगडांवर आलेले शेवाळे त्यामुळे पायही सरकत होते. अर्ध्या टप्प्यात गेल्यावर सरळ उंच अशी दगडांची रांग होती. एकमेकांचा हात देत मदत करत वर चढलो. हा अनुभव खूप थरारक होता.
दोन टेकड्या चढल्यावर गडाच्या अर्ध्या रस्त्यात पोचतो. महादेव मंदिर परिसरात पाण्याचे टाके आहेत तसेच मंदिराच्या शेजारी दोन तोफा आहेत. मंदिराच्या समोर काही जुने अवशेष एका झाडाखाली रचून ठेवलेले आहेत. तिथून पुढे आणखी एक छोटी टेकडी सर केल्यावर एक छोटेसे मारुतीचे मंदिर लागते.
अगदी वरच्या टप्प्यात गेल्यावर काही पाण्याचे टाके लागतात त्यांतील दोन टाके पाणी वापराकरिता आहेत आणि एक पाण्याचे टाके तेथील पाणी पिण्याकरिता वापरतात. थोडं पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. ते विहंगम दृष्य पाहून आम्ही अगदी भारावून गेलो. वर चढून झालेली दमछाक काही क्षणात निघून गेली. बालेकिल्ल्यात शिरलो. वर टप्प्यात दोन सुळके तिथपर्यंत पोचलो.
प्रचंड वारा, धुकं आणि पाऊस अशा वातावरणात खूप भारी वाटत होतं. गडाविषयी जितकं थोडंफार माहिती आहे तितकं सांगून आम्ही एक गारद दिली. कोहोजचा अनुभव सुखद होता. गड चढाई करताना वाटेतील काही भाग कोसळलेला आढळला. नियमित दुसरा ट्रेकही यशस्वी झाला. हे पुढे असंच सुरु रहायला हवं या निमित्ताने ट्रेक होत असताना विविध माहितीही हाती मिळत आहे.
- शैलेश दिनकर पाटील



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा