भास्करगड उर्फ बसगड...

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात असलेली डोंगररांग त्यास 'त्र्यंबक' डोंगररांग असेही म्हटले जाते. या डोंगररांगेत भास्करगड उर्फ बसगड वसलेला आहे. गोंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली.

तेराव्या शतकात हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. बहामनी पाठोपाठ निजामशाहीने देखील हा किल्ला यादवांसोबत युद्ध करून ताब्यात घेतला. निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजी राजेंनी बंड करून भास्करगड ताब्यात घेतला. पुढे तो किल्ला मोगलांनी जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८१८ पर्यंत भास्करगड पेशव्यांच्या ताब्यात होता.

भास्करगडाचे वैशिष्ट्ये म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि सर्पिलाकार मार्ग. या मार्गातून वर आल्यावर प्रवेशद्वार लागते. पूर्वी हा प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्यात गाडला गेल्यामुळे झोपून(सरपटून) जावे लागायचे. परंतु गडसंवर्धन करणाऱ्या चमुने तो ढिगारा काढून तेथे जाण्याचा मार्ग सुकर केला.


प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर गडाच्या माथ्यावर पाण्याचे टाके पहायला मिळतात. तेथेच मारुतीरायाची जुनी मूर्ती आहे आणि त्या शेजारी दगडांचे काही जुने अवशेष देखील आहे. 

गडावरून दिसणारा सूर्योदय सुखद अनुभव देऊन जातो. भास्करगडावरून ब्रह्मा, अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, नागफणा हे किल्ले दिसतात. त्यातल्या त्यात भास्करगड अपरिचित असल्यामुळे येथे गर्दी फार कमी दिसते. चढाई मध्यम स्वरूपाची असून चढाईस दोन तास लागतात. पाण्याची व्यवस्था वर नसल्यामुळे पाणी सोबत घेऊन जावे.


या गडावर पावसाळ्यात जाणे थोडे धोकादायक असू शकते. त्यामुळे जाताना योग्य ती माहिती घेऊनच जाणे. भास्करगडाच्या पायथ्याशी असलेले गाव निरगुड पाडा. तेथे जाण्यासाठी कसारा रेल्वे स्थानकात उतरून निरगुड पाड्यासाठी गाडी करू शकतात. निरगूडपाड्यात चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच मार्गदर्शक(गाईड) तुम्हाला तेथे मिळू शकतो. विशेष म्हणजे हरिहर आणि भास्करगड असे दोन्ही किल्ले एका दिवसांत करता येण्यासारखे आहे.


- शैलेश दिनकर पाटील 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"