मित्राची कारागिरी...

कंपनीच्या स्पोर्ट्स करिता रत्नागिरीत गेलो होतो. जेवण आटपून आम्ही मारुती चौकातल्या मारुती मंदिरात फेरफटका मारायला गेलो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे शिवाय काही तोफ, तुतारी, ढोल वाजवतानाचे मावळे अशी शिल्प आहेत. ते ठिकाण आवडलं म्हणून फोटो काढून अपलोड केला. तर मित्र वैभवचा मॅसेज आला. 'जरा क्लिअर फोटो पाठव.' त्याला दोन-तीन फोटो पाठवले. ते पाहून त्याचा मॅसेज आला की, हे मी बनवलं आहे.

मारुती चौकात असलेलं शिल्प 

सुरवातीला वाटलं हा असा का बोलत आहे हे स्मारक बांधून तर बरीच वर्ष झाली. तितक्यात त्याने जुने फोटो पाठवले. ज्यावेळी स्मारकाचं काम सुरु होतं तेव्हाचे ते फोटो होते. तो म्हणाला की, आम्ही कॉलेजला असताना आम्हाला प्रोजेक्ट दिलेला. तेव्हा आम्ही हे बनवले होते. त्याचं काम पाहून खूप अभिमान वाटला. आणि उगाच माझी कॉलर ताईट झाली. जेवण झाल्यावर आमचा काही स्टाफ तिथे आला होता. त्यांना अभिमानाने सांगितलं की हे माझ्या मित्राने बनवलं आहे. खरं सांगू मला फार भारी वाटलं.

वैभवची कलाकारी..

वैभव एक उभरता शिल्पकार आहे. आमचा परिचय विकासच्या माध्यमातून झाला. खरं तर वैभव बाराखडीच्या पोस्ट पहायचा आणि एकदा तो विकासला म्हणाला की, अरे माझ्यासाठी काही असेल तर नक्की सांग. आणि आम्हाला संधीच हवी असते. सप्टेंबर(२०२३) महिन्यात 'एक दिवस छंदाचा' या उपक्रमात मातीकाम कार्यशाळा घेतली आणि त्यात वैभवने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं. वैभव खरंच खूप गुणी आणि खरा माणूस आहे. त्याच्याकडून आणखी नवनवीन पहायला मिळेलच...

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"