पुणे नगर वाचन मंदिर
पुणे रेल्वे स्थानकापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर 'पुणे नगर वाचन मंदिर' आहे. १७५ वर्षे जुन्या असलेल्या या वास्तूला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. ०७ फेब्रुवारी १८४८ साली वाचन मंदिराची स्थापना झाली. या वाचन मंदिराचे संस्थापक लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख).
![]() |
| पुणे नगर वाचन मंदिर वास्तू. |
वाचन मंदिराच्या पहिल्या मजल्यावर वाचन कक्ष आणि अभ्यासिका आहे. मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिक आणि इतर पुस्तके वाचणासाठी उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लॉकर दिलेले आहेत. याच वाचनकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, लोकहितवादी, बालगंधर्व या महापुरुषांची तैलचित्रं आहेत. दुसऱ्या मजल्यावर पुस्तकांचं दालन आहे. जवळपास एक लाखापेक्षा अधिक पुस्तके येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकाला कोड दिलेला आहे जेणेकरून ते शोधण्यास अधिक सुलभ होईल.
![]() |
| अभ्यासिका अन् वाचन कक्ष |
वाचन मंदिरातील वाचक सभासदांची संख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे. तुळशी बाग येथे मुख्य शाखा आहे. दूर राहणाऱ्या वाचकांना पुस्तक देवघेवसाठी सोयीचं व्हावं म्हणून वाचन मंदिराच्या बिबवेवाडी, वारजे, कर्वेनगर आणि सिंहगड रोड याठिकाणी शाखा आहेत. पुस्तकांची देवाणघेवाण संगणकाद्वारे होते. दुसऱ्या मजल्यावरून ग्रंथालयात प्रवेश केल्यावर तेथे आरएफआयडी यंत्रणा बसवली आहे. एखादा वाचक नोंद न करता पुस्तक घेऊन गेल्यास त्वरित ई-मेल द्वारे वाचन मंदिरास समजते. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने केला आहे.
![]() |
| श्री. रानडे माहिती सांगतांना |
वाचन मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. व्याख्यानमाला, सामाजिक काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती, एखादं उत्तम पुस्तक लिहिणारे लेखक अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता देखील विविध उपक्रम राबवत असतात. दिवाळी अंकाची विशेष योजना देखील राबवतात. दिवाळी अंकांची वार्षिक योजना संपल्यावर उपलब्ध असलेली दिवाळी अंक वाचक सभासदाकरिता १० टक्के किमतीत विक्री करिता उपलब्ध असतात.
![]() |
| वाचनालयातील पुस्तक दालन. |
वाचन मंदिराचा एक अतिमहत्वाचा उपक्रम म्हणजे डिजिटलायजेशन. तेथे असणारी दुर्मिळ पुस्तकं काळाच्या ओघात नष्ट होत आहे त्याचे डिजिटयजेशन करून वाचकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १९०० सालच्या आधी प्रकाशित झालेली पुस्तकं स्कॅन करून त्यांतील अक्षरं सुस्पष्ट आणि अधिक ठळक दिसायला हवी. अशी व्यवस्था असणारं ऍप त्यांनी बनवलं आहे. स्कॅन केलेल्या पुस्तकाची पीडीएफ करून वाचकांसाठी सहज उपलब्ध करून देता येईल. बहुतेकवेळा अभ्यासाकांना संदर्भाकरिता ग्रंथ शोधण्यासाठी येतात त्यांना हे अधिक सोयीचं ठरणारं आहे. २०२० पासून डिजिटायजेशनला सुरवात करण्यात आली आणि आतापर्यंत तीनशे पुस्तकं स्कॅन करून झालेली आहेत. पुस्तकांबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड अतिशय उत्तमपणे करत आहेत. |
पुणे नगर वाचन मंदिर,
१८१, लक्ष्मी रोड, तुळशी बाग, बुधवार पेठ, पुणे, ४११००२.
- शैलेश दिनकर पाटील




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा