"बाराखडी-प्रवास अ ते ज्ञ चा..."

आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा मानस ठेऊन वाटचाल चालू आहे. तसेच इतरही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न समूहातर्फे होत असतो. कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आम्ही 'उत्सव कलाम' हा उपक्रम घेण्याचे ठरवले. २०१९ साली उत्सव कलाम उपक्रम पार पडला. हा उपक्रम दरवर्षी घेऊयात असे ठरले. २०२१ हे उपक्रमाचे दुसरे वर्ष! वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी बाराखडी समूहाने महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे 'बाराखडी ज्ञानकेंद्र' सुरू केलं आहे. तेथे मराठी आणि इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. आकर्षक दिवाळी अंक, मार्मिक व इतर अंक तसेच शाळेतल्या मुलां-मुलींसाठी 'मुलांचे मासिक', 'वयम' अशी मासिकं उपलब्ध आहेत. सध्या तरी पुस्तक मिळवण्याची सुविधा तलासरी, उंबरगाव इथपर्यंत आहे. ज्ञानकेंद्रात असलेल्या पुस्तकांची यादी तुम्ही येथे पाहू शकता.

'बाराखडी' समूहातील सदस्य याआधी विविध ठिकाणी वैयक्तिक रित्या उपक्रम घेत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे उपक्रम एकमेकांना समजत होते आणि आम्ही त्याच निमित्ताने एकत्र आलो. अन् 'बाराखडी'चा प्रवास सुरू झाला. शाळांना भेटी देणं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हे ठरवलं. उत्सव कलाम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शोधनिबंध लिहायला सांगितले. त्यांतील ठराविक तीन चार मुलांकडून विशेष निबंध मिळाले. त्याचं आम्हाला कौतुक वाटलं. या उपक्रमांमुळे शाळा जोडल्या जात होत्या. एकीकडे हे उपक्रम सुरु असताना संस्था भेटी सुरु होत्या. पाणी फाउंडेशच्या श्रमदान शिबिरासाठी सिन्नर(नाशिक) येथे जाणे झाले त्या दरम्यान मेंढी गावातील मधुकर गीतेंच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिली. आपल्या जवळच्या परिसरात असणाऱ्या अनेक सामाजिक संस्था किंवा व्यक्तींना भेटी देण्याचे काम सुरु असते. बाराखडीने जानेवारी २०२२ दरम्यान 'पुस्तकांची शिदोरी' उपक्रम सुरु केला. शाळांची पटसंख्या पाहून त्यांना ती पुस्तकं द्यायची आणि त्या पुस्तकाविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची. 'पुस्तकांची शिदोरी' उपक्रमासाठी पुण्याचे शिवराम रामदासी यांच्याकडून दोनशे दहा पुस्तकांची मदत मिळाली.

पुस्तकाची शिदोरी उपक्रम जिल्हा परिषद आवारपाडा शाळा

जिओलाईफ ऍग्रीटेक कंपनीच्या सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून जिओलाईफ युथ क्लब आहे. त्याचे काम श्रिया शेवाळे पाहतात. युथ क्लबच्या माध्यमातून डिजिटल ओमेगा, पिरेड्स रेड डॉट आणि लायब्ररी सेटअप असे तीन उपक्रम चालवतात. श्रिया यांचा फोन आला आणि त्यांनी डिजिटल ओमेगा मार्फत मदत करण्याचे सांगितले. शाळा निवडीचे काम त्यांनी बाराखडीला दिले होते. विविध उपक्रम राबवत असल्यामुळे बऱ्याच शाळा संपर्कात होत्या. त्यांतील दोन शाळांची माहिती श्रिया यांना पाठवली. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी बोलून शाळेविषयीची परिस्थिती जाणून घेतली. आणि कंपनीच्या कार्यालयीन प्रक्रियेनंतर तेथे साहित्य देण्याचे ठरले. जुलै २०२२ मध्ये तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद आवारपाडा शाळेत प्रोजेक्टर आणि लॅपटॉप हे साहित्य देण्यात आलं. याच उपक्रमादरम्यान जिओ युथ क्लबचा पिरेड्स रेड डॉट उपक्रम जिल्हा परिषद आरजपाडा या शाळेत राबवला गेला. मासिक पाळी समुपदेशन आणि मेन्स्ट्रुअल कपचा वापर कसा करावा याबाबत श्रिया, ब्रिजिता यांचं सेशन झालं. आणि त्यांना सहकार्य बाराखडीने केलं. शाळेतील विद्यार्थिनींचा प्रतिसाद पाहता श्रिया यांनी इतर शाळा आणि महाविद्यालयात हे सेशन आयोजित करण्याबद्दल सांगितले.


मासिक पाळी समुपदेशन

ऑगस्ट २०२२ मध्ये एक चांगली गोष्ट घडली. बाराखडी आणि जिओ युथ क्लबने सोबत काम करण्याचे ठरवले. तलासरी तालुक्यातील कॉ. गोदावरी शा. परुळेकर महाविद्यालयातील विद्यार्थीनींशी पिरेड्स रेड डॉट उपक्रमावर संवाद साधला. तेथेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. जिओ युथ क्लबने लायब्ररी सेटअपसाठी दोनशे पुस्तक बाराखडीकडे पाठवली गेली. त्यातली शंभर पुस्तके जिल्हा परिषद वांगडपाडा या शाळेत द्यायचे होते. पण ते देण्याआधी बाराखडीने ठरवले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण काहीतरी वेगळं करू. म्हणून संपूर्ण तलासरी तालुका पायी प्रवास करण्याचे ठरले आणि या प्रवासाला 'शाळा भेट अन् वाचन संवाद' असे नाव देण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट या अडीच दिवसांत पासष्ट किलोमीटर अंतर पायी चाललो. पायी प्रवासादरम्यान विश्व हिंदू परिषद, कॉ. गोदावरी कॉलेज येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वांगडपाडा शाळेत पुस्तके देऊन या प्रवासाची सांगता केली. 


- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"