आदिवासी, जग आणि फिरोजा ताफ्ती
पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरातही आदिवासी समाज आहे. त्यांची भाषा, राहणीमान हे सारं कालानुरूप बदलताना दिसत आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या समाजाचे योगदान आणि सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून डहाणूच्या फिरोजा ताफ्ती १९९० पासून काम करत आहेत. त्यांचा पर्यावरणशास्त्रावर उत्तम अभ्यास आहे. फिरोजा मूळच्या मुंबईच्या. १९७९ साली त्यांचे लग्न डहाणूचे जहांगीर ताफ्ती यांच्याशी झाले आणि त्या डहाणूकर झाल्या. डहाणूच्या गंजाडजवळच पंधरा एकर जागेत त्यांची चिकुची वाडी आहे. तेथे त्या राहतात. चिकूच्या वाडीची संपूर्ण पाहणी त्यांचे पती पाहतात. वाडी जवळपासचा परिसर आणि तेथील संस्कृती फिरोजा यांना खूप भावली त्यामुळे त्या लोकांशी लवकर एकरूप झाल्या. जंगल म्हणजे आदिवासींचेच राज्य. हा समाज निसर्गपूजक आहे. स्वतःच्या गरजा आपण कशा सीमित ठेऊ शकतो हे या लोकांकडून सहज समजते. अशा गोष्टी हेरून येणाऱ्या पिढीला जाणीव निर्माण करून देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. दिल्ली येथे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज(INTACH) नामक संस्था आहे. त्या संस्थेचे काम जगभर सुरू असते. संयुक्त राष्ट्र संघाने INTACH ला २००७ साली...