पुस्तक परिचय - माझी काटेमुंढरीची शाळा
पुस्तक - माझी काटेमुंढरीची शाळा
लेखक - गो. ना. मुनघाटे
गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात असणारे काटेमुंढरी हे गाव. माडिया गोंड हा आदिवासी समाज याच परिसरातला. या गावात एका शिक्षकाची नियुक्ती होणे. आणि ते त्याच्या मनाविरुद्ध घडलं. म्हणून सरकारविषयी सूड मनात ठेवला आणि व्यसनाच्या आहारी गेला. आणि अशातच त्याची आत्महत्या/खून झाला.
गावात शाळा आहे शिक्षक हवा म्हणून गोविंदराव मुनघाटे यांची नियुक्ती झाली. काटेमुंढरी जाताना 'बाबूजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो' असा सल्ला ट्रक ड्रायव्हरने दिला. पण तरीही आपली वाट धरून मुनघाटे गुरुजी गावात पोचले. गावचे मडगू पाटील यांनी केलेले स्वागत आणि त्यांनी दिलेली मोलाची साथ गुरुजींना खूप भावली.
गावचा कायापालट करण्याकरिता गुरुजींना महत्वाची साथ लाभली ती गावचे मडगू पाटील, गावचा खबरी डाफ्या कोतवाल, विद्यार्थी शिदू यांची.. हे पुस्तक वाचताना खऱ्या अर्थाने सामाजिक भान जपणारी माणसं वाचायला मिळतात. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे नागोसे गुरुजी आणि मडगू पाटील...
विद्यार्थ्यांसाठी जीव ओतून काम करणाऱ्या नागोसे गुरुजींना देखील कारागृहात जावे लागते अन् खोट्या आरोपांमुळे अन्नत्याग करून प्राणत्यागाला सामोरे जावे लागते. खोटे आरोप मुनघाटे गुरुजी आणि मडगू पाटलांवर देखील होतात परंतु या दोघांमुळे गावात झालेला बदल पाहून खोट्या तडाख्यातून ते वाचतात.
पंचवीस वर्ष सेवा करून त्याच गावात निवृत्त होणारे मुनघाटे गुरुजी यांनी त्यांचा अनुभव या पुस्तकात रेखाटला आहे. खरे समाजसेवक जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचावे.
- शैलेश दिनकर पाटील

👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा