महालक्ष्मी जत्रा अन् भीमबांध...
मुंबई-अहमदाबाद मार्गालगत असलेल्या विवळवेढे(महालक्ष्मी) गावात चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावस्या या दिवसांत जत्रा भरते. या जत्रेला मुंबई, नाशिक आणि सुरत या ठिकाणाहून येणारी भक्तगणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विवळवेढे गावापासून सहा-सात किमी अंतरावर वाघाडी गाव आहे आणि त्या गावात भीमबांध म्हणून एक पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे.
![]() |
| महालक्ष्मी मंदिर अन् जत्रेतील पाळणा. |
| भीमबांधची एक दंतकथा आहे. असं म्हणलं जातं कोल्हापूरची महालक्ष्मी या मार्गाने जात होती. त्यावेळी पांडव वनवासात होते. महालक्ष्मी भ्रमण करत असताना मातेची अन् भीमाची गाठ पडली. मातेचा शृंगार पाहून भीमाने त्या मातेकडे विवाहाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मातेला अनुचित वाटला पण मातेने भीमापुढे एक अट ठेवली. वाघाडी गावातून वाहणाऱ्या सूर्यानदीवर एका रात्रीत बांध बांधून ते पाणी मुसळ्या डोंगराकडे वळविणे. भीमाने ही अट मान्य करत बांध बांधण्याचे काम सुरु केले. काम पूर्ण होऊन काहीतरी अनर्थ घडेल या भीतीने मातेने कोंबड्याचं रूप धारण करून बांग दिली. भीमास वाटले, पहाट झाली. त्याने स्वतःची हार मान्य करत हा बांध अपूर्णच ठेवला. आजही तेथे गेलात तर तो बांध अपूर्ण असल्यासारखे वाटते म्हणून या जागेस भीमबांध असे म्हणतात. |
![]() |
| भीमबांध. |
गावात असलेल्या महालक्ष्मी मातेचे असणारे मुळ मंदिर डोंगरात वसलेले आहे ते वाघाडी गावातून दिसते. मुळ मंदिर जरी डोंगरात असले तरी मातेने पायथ्याशी दर्शन दिल्याची देखील दंतकथा प्रसिद्ध आहे. मातेच्या दर्शनासाठी गावातली एक स्त्री नेहमी गडावर जायची. पुढे ती गरोदर राहिली अन् दर्शनाला जाताना ती भोवळ येऊन पडली. मातेला तिच्यावर दया आली अन् तिला दृष्टांत दिला. यापुढे गडावर येण्याची आवश्यकता नाही मी तुला येथेच दर्शन देणार. आणि मग ही वार्ता गावात पसरल्यावर जेथे दृष्टांत दिला त्या जागेवर मंदिर बांधण्यात आले. आणि त्यादिवसापासून या गावात जत्रा मोठ्या उत्साहात भरत आहे.
![]() |
| मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळील महालक्ष्मी गावातून दिसणारा गड. |
जत्रेवळी महालक्ष्मी गडावर ध्वज लावण्याची परंपरा वाघाडी गावातील सातवी कुटुंबाकडे आहे. दृष्टांत दिलेल्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या मंदिरात आजही प्राचीन काळच्या शीळा पाहायला मिळतील. या दंतकथेची नोंद ठाण्याच्या गॅझेटमध्ये नोंदवली असल्याचे सांगितले आहे.
© शैलेश दिनकर पाटील



खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा