कातकरी वस्तीचे गुलाबी वाडीत रूपांतर

सृजन यात्रेच्या निमित्ताने सामाजिक संस्थांच्या भेटी सुरू होत्या. आम्ही योगेंद्र बांगर यांच्या फांगणे येथील आजीबाईंच्या शाळेला भेट देणार होतो. पण बांगर सर म्हणाले, मुरबाडपासून पाच किलोमीटर अंतरावर एक गुलाबी वाडी आहे तिथे आपण पंधरा-वीस मिनिटं थांबुया. वाडीतल्या लोकांच्या कहाण्या ऐकू. बाहेरच्या ठिकाणचे लोकं भेट द्यायला आलेले पाहून त्यांनाही हुरूप येईल. म्हणून आम्ही मुरबाडमधून शेलारी गावाकडे जाण्याचा रस्ता पकडला. या गावच्या नजीकच गुलाबी वाडी आहे. वाडीत चाललो होतो म्हणून अनेक प्रश्न मनात होते नेमकं हे कसं असेल? काय असेल?  

गुलाबी वाडीतील रहिवासी

पंधरा मिनिटांत वाडीत पोहोचलो. तिथल्या लहान मुलांनी आम्हा यात्रेकरूंचे स्वागत बँड वाजवून केले. वाडीतच शाळा आहे तेथे लहान मुलं-मुली आणि वाडीतले माणसं एकत्र जमले होते. संध्याकाळची वेळ. शाळेच्या बाहेर भलीमोठी रांगोळी काढली होती. आम्ही येणार आहोत म्हणून वाडीतला स्त्री-पुरुष असा दोन्ही वर्ग गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून छान नटले होते. एरव्ही ते त्याच रंगांच्या वेशात असतात. या वाडीला गुलाबी वाडी म्हणण्याचं नेमकं कारण म्हणजे, इथे प्रत्येक घराला भले ते कुडाचे का असेना त्याला गुलाबी रंग आहे वाडीतील पुरुष आणि स्त्री गुलाबी रंगाचा वेश परिधान करतात. बरं गुलाबी रंग का? तर गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक!


वर्गातल्या भिंतींवर काढलेले चित्र आणि विचार

वाडीत एकूण पंचवीस कुटुंब राहतात. या पंचवीस कुटुंबानी एकत्र येऊन वाडीचा कायापालट करण्याचे ठरवले आहे. सरकार लक्ष देईल तेव्हा देईल पण आपण स्वतः सक्षम होण्याचा प्रयत्न करू. हाच ध्यास मनात ठेवून वाडीतील तेवीस कुटुंब स्वतःहून व्यसनमुक्त झाली. त्यांना उदरनिर्वाहासाठी शेती हे माध्यम आहे. पण आता उद्योगाकडे एक वाटचाल करावी म्हणून प्रत्येक कुटुंब एक उद्योग हाती घेण्याच्या मार्गावर आहे. इथल्या महिला एकत्र येतात समूहाने बोलतात ही बाब सर्वात महत्वाची आहे. इथल्या लोकांचे मार्गदर्शन करण्याचे काम योगेंद्र बांगर सर करत असतात. बांगर सर मुरबाडच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून आहे. शाळेत तर ते शिक्षकाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडतात पण सामाजिक जीवनातही त्यांची तशीच काहीशी भुमीका आहे.

लहान मुलांना शिकविणारी पूजा वाघ

गुलाबी वाडीतील पूजा वाघ नावाच्या विद्यार्थिनीने तर कमाल केली! कोरोना काळात शिक्षण बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं बरंच शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. कोरोना काळात वाडीतील लहान मुलांना एकत्र करून(सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करून) अंकगणित, अक्षरओळख या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आम्ही यात्रेकरू जेव्हा सायंकाळी शाळेत गेलो तेव्हाही पुजाचं शिकवणं सुरूच होतं. आम्ही तिथे कोण आलो कशाला आलो याकडे लक्ष न देता ती पूर्णपणे विद्यार्थ्यांमध्ये रमली होती. तिने यावर्षी(२०२२) कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली आहे. पूजा म्हणते, गावातले कोणी फार शिकलेले नाही मला शिकून गाव समृद्ध करायचं आहे आणि इतरांना ही शिकवायचं आहे. तिच्या या ध्येयाचे खूप कौतुक वाटते. याच वाडीतील एक तरुण ग्रामपंचायत सदस्य पाहायला मिळाला. वाडीतील असे उदाहरण पाहता गुलाबी वाडी एक वेगळी ऊर्जा निर्माण करणारी वाडी आहे. या वाडीसाठी नवी मुंबईच्या रोटरी क्लब व आरंभ संस्थेने मागील महिन्यात नवीन सहा स्वच्छतागृह बांधून दिले. आणि त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील घेतली आहे.

- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"