"रंगारी अन कलाकारी".. - मधुकर दळवी

तलासरी तालुक्याच्या उधवा रस्त्यालगत असलेल्या कासपाडा गावात मधुकर दळवी हे बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तू बनवतात त्यांची माहिती विनेश सरांकडून समजली. विनेश सर, मी आणि दिनेश सर त्यांची कलाकुसर पाहण्यासाठी दळवी यांच्या घरी गेलो होतो. कासपाडा आश्रमशाळेच्या समोर एक छोटंसं मातीचं घर आहे. घराच्या बाहेर बाईक लावून आत शिरलो तर दरवाज्याच्या बाहेर मधुकर पेंटर असा फलक लावलेला दिसला. त्यांच्या घरात शिरलो तर दोन्ही भिंतीवर त्यांनी काढलेली चित्र लावलेली होती. जवळपास पन्नासेक चित्र असावीत. ते सगळं पाहून सुखावलो.

मधुकर दळवी

मधुकर दळवींचा जन्म कासपाड्यातलाच. त्यांचं वय वर्ष त्रेचाळीस. पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. दळवी यांचे शालेय शिक्षण कासपाड्यातच झाले. शिक्षण फारसं नसल्यामुळे नोकरी नाही. शेतीवर उदरनिर्वाह करावा लागायचा. पण स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून त्यांनी शाळा आणि इमारतीच्या भिंती रंगवण्याचे काम २०१० साली हाती घेतले. दळवींचं अक्षर चांगलं होतं. रंगकाम करत असताना ते थोडंफार ब्रशने लिहिण्याचा प्रयत्न करायचे. आणि तो प्रयत्न यशस्वी व्हायचा. त्यांच्या गावातल्या शाळेत जाधव सर होते त्यांनी दळवी यांना शाळांच्या भिंतींवर सुविचार लिहायला सांगितले. त्यांचं ते काम पाहून शिक्षकांनाही छान वाटलं. तेच शिक्षक मग सोशल मीडियावर रंगकाम आणि सुविचार लिहिलेले फोटो शेअर करायचे आणि त्यातूनच मग दळवी यांना इतर शाळांत देखील सुविचार लिहिण्यास बोलवायचे. या कामाच्या ओघात ते अनेकांच्या परिचयाचे झाले.

मधुकर दळवी यांच्या घरातील दृश्य

शाळा रंगवणं किंवा सुविचार लिहिणं हे कधीतरी थांबणारं होतं. म्हणून दळवी हे फावल्या वेळेत चित्र काढण्याचा प्रयत्न करायचे. नवीन वस्तू खरेदी केल्यावर त्या बॉक्समध्ये थर्मोकॉल असायचे. लोकं ते थर्मोकॉल फेकून देत. पण तेच फेकून दिले थर्मोकॉल दळवी घेऊन येत. आणि त्यावर चित्र काढत. घराच्या इथून दिसणाऱ्या गंभीरगडाचे चित्र त्यांनी थर्मोकॉलवर काढले आहे. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, विजयदुर्ग, वारली चित्र आणि त्यासोबतच थ्रीडी चित्र देखील काढले आहेत. या चित्रकारीच्या कामास त्यांनी २०१९ पासून सुरवात केली. त्यांच्या या कामामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या घराजवळील आश्रमशाळेत त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून तात्पुरती नोकरी मिळाली आहे.

बांबूपासून बनवलेल्या वस्तू

दळवी हे शेतकरी असल्यामुळे त्यांच्या जमिनीवर थोड्या प्रमाणात बांबूची लागवड देखील आहे. दळवी यांनी बांबूच्या कलेविषयी ऐकलं होतं. ती साकार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे ठरवले. बांबूपासून वस्तू बनवणे जरा जिकरीचंच काम आहे. त्यासाठी लागणाऱ्या मशिनही जवळ असायला हव्या आणि त्याचा वापर करून त्या कलेतही सुबकता हवी. दळवी यांच्याकडे असलेल्या थोड्या थोडक्या साहित्याचा वापर करून त्यांनी त्या वस्तू बनवायला सुरवात केली. सुरवातीला त्यांनी छोटेखानी वस्तू बनवल्या ज्यात पुरुष-स्त्री, बैलगाडी, फाट्या उचलणारी बाई, तारपा वाद्य वाजवणारा व्यक्ती या वस्तू होत्या. जसजसा त्यांचा या कामात वेग वाढला तसे त्यांनी विविध दृश्य दर्शवणारी कलाकुसरी तयार केली. त्यांची ही कला शाळांतील शिक्षकांपर्यंतही पोहोचत होती. गावाजवळच एक मिशनरीची शाळा होती त्या शाळेतील यशवंत थापड सरांनी दळवी यांच्या घरी भेट दिली आणि तेथील वस्तू पाहून त्यांना हायसे वाटले. गावातला एक पेंटर मनुष्य इथवर कलाकारी सादर करू शकतो त्यांना आनंद झाला. नंदुरबारच्या एका महाविद्यालयातील शिक्षकांनी दळवी यांच्याकडील एक वस्तू त्यांच्या कॉलेजला संग्रही ठेवली. 

बांबूपासून बनवलेल्या कलाकृती

दळवी यांनी त्यांच्या घरीच छान सेटअप करून ठेवला आहे. त्यांना विचारलं, हे चित्र असे लावून का ठेवले आहेत चित्र विकून टाकायचे ना. त्यावर ते म्हणत होते, हे चित्र मी आवडीने काढले आहेत विकणार नाही. आणि लोकं म्हणतात तू पेंटर आहेस तर तुझे चित्र लोकांना दिसले पाहिजे. म्हणून हे चित्र लावले आहेत. दळवी यांच्याशी बोलताना त्यांचा साधेपणा दिसत होता. त्यांच्यासाठी किंवा गावासाठी ते पेंटर असतील पण त्यांची एकूण कलाकारी पाहता माणूस उत्तम कलाकार आहे. ऐन चाळीशीत त्यांनी हे बांबूच्या वस्तू बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे. या वस्तूंना बाजार मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दळवींचा कामाच्या बाबतीतला प्रामाणिकपणा त्यांच्या कलेला उंचीवर घेऊन जाणारा आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तू जर कोणास हव्या असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. 

मधुकर दळवी - ८४४६९५०६०८

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. आता गावी जाणार आहे नक्की भेट देतो मी तिकडे काही घेता येते का तेही बघतो नक्की👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. Madhukar Dalvi yanchi kalakruti kharach khupach sundar aahe mala pn khup aavadli🎨🖼️ एक दिवस आम्ही पण येतो दळवी सरांना भेट द्यायला 🤝

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम कलाकृती बरोबरच एक पेंटर असून वेगवेगळ्या कला शिकण्यात जो रस आहे खूपच छान

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"