२०१७ साली झी मराठी वाहिनीवर 'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात जव्हारच्या प्रमिलाताई कोकड यांना टीव्हीवर पाहिलं होतं. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी(२०२१) सृजन यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला. दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी त्यांनी जव्हार येथे 'दिव्य विद्यालय' सुरू केले आहे. प्रमिलाताई मूळच्या ठाण्याच्या. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यांचे वडील औदुंबर कोकड हे सार्वजनिक खात्यात नोकरीला असल्यामुळे नोकरीच्या सततच्या बदलींमुळे विविध ठिकाणी जावं लागे. या बदलीमुळे प्रमिलाताईंना ठिकठिकाणचा परिसरही अभ्यासावयास मिळे. प्रमिलाताईंनी पुण्याच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातून बी.ए. ची पदवी संपादन केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेल्या असल्यामुळे तेथील संस्कार त्यांच्यावर झाले होते. समाजाशी एकरूप राहणे त्यांना जोडून घेणे आदि बाबी त्या सहजपणे करत. त्यांनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयातून 'डिफ अँड डम्ब' हा एक वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्रॅमचा कोर्स पूर्ण केला.(कर्णबधिर मुलांची भाषा शिकण्यासाठीचा तो कोर्स आहे.)
 |
| सृजन यात्रेकरूंनी दिव्य विद्यालयाला दिलेली भेट. |
ठाण्याच्या सुनंदाताई पटवर्धन यांची 'प्रगती प्रतिष्ठान' संस्था जव्हार, विक्रमगड येथील आदिवासी भागांतील लोकांसाठी काम करते. त्यांची जव्हार येथे मूक-बधिर मुलांसाठी शाळा आहे. त्या शाळेत शिक्षकांची आवश्यकता होती म्हणून सुनंदाताईंनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयातून डिफ अँड डम्ब कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मागवली आणि त्या यादीच्या माध्यमातूनच प्रमिलाताईंशी संपर्क झाला. शिक्षक निवडीसाठी लागणारी सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या १९८६ साली मूकबधिर शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. शाळेत शिकवत असताना त्यांनी जव्हारचा परिसर देखील अभ्यासला. शाळेत शिकवता शिकवता मुलांशी गप्पा मारणे, त्यांची आंघोळ घालून त्यांना तयार करणे इतक्या त्यांत रमल्या होत्या. याच माध्यमातून त्यांचा वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रीय सेवा समिती यांच्याशी पुन्हा परिचय झाला. जव्हार हा आदिवासी भाग असल्यामुळे इथला महिला-पुरुष वर्ग शेतीवरच अवलंबून आहे. रोजंदारीसाठी त्यांना स्थलांतर व्हावं लागे. हे स्थलांतर थांबवणे किंवा त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने त्यांनी बचत गट स्थापन करून रोजगाराचे माध्यम उपलब्ध करून देण्याचे ठरविले. १९९४ साली त्यांनी सुहासिनी महिला नागरी पतसंस्था सुरू केली. या माध्यमातून महिलांना एकत्र करून उद्योगविषयी मार्गदर्शन करणे, बचत गटांची माहिती देणे इत्यादी कामे सुरू केली. या निमित्ताने महिला बचत गट चळवळ तेथे सुरू झाली. महिलांच्या उद्योगी वृत्तीला चालना मिळावी म्हणून त्यांनी २००४ साली कोहिनुर आदिवासी कला केंद्राच्या नावाने व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे सारं करत असताना एका छताखाली ते असावं म्हणून त्यांनी संस्था स्थापन करण्याचे ठरविले आणि २००३ साली 'श्री. गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था' स्थापन केली.
 |
| प्रमिलाताईंसमवेत मी. |
माणूस निवृत्तीच्या वाट्यावर आला की, निवृत्तीनंतरचे आयुष्य तो धार्मिक किंवा आराम करण्यात व्यतीत करतो. पण याउलट प्रमिलाताईंचं आहे. २००६ साली निवृत्त झाल्या आणि निवृत्तीनंतर कामाला वेग मिळावा नवनवीन कल्पना राबवता याव्यात यासाठी त्यांनी संपूर्ण वेळ समाजकार्यासाठी दिला. २००७ साली त्यांनी दिव्यांग आणि मतिमंद मुला-मुलींसाठी जव्हार येथे निवासी शाळा सुरू केली. पालघर जिल्ह्यातील दिव्यांग मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळेची व्यवस्था नाही या मुलांचे भवितव्य काय? म्हणून त्यांनी तेथे 'दिव्य विद्यालय' सुरू केले. निवृत्त झाल्यानंतर मिळालेला संपूर्ण पैसा त्यांनी समाजकार्यासाठी वापरला. शाळेसाठी जव्हार येथे जमीन खरेदी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील पदाधिकारी बिमल केडिया हे उद्योजक. त्यांनी सुरवातीला संस्थेला मदत केली. मुंबईच्या बाजारपेठेतून वाया जाणाऱ्या कपड्यांचे तुकडे ते जव्हारला पाठवत या कपड्यातून आदिवासी महिला पर्स, कापडी पिशव्या बनवत. केडिया यांच्या परिचयाची असलेली इंग्लंड स्थित 'सेवा यु.के.' या संस्थेशी ताईंना जोडून दिले. इंग्लड स्थित असलेले भारतीय लोकं 'सेवा यु.के.' चं काम पाहतात. 'सेवा यु.के.' हिंदू जनजागृती समितीशी केंद्रित आहे. प्रमिलाताईंनी संस्थेची माहिती पाठवली आणि 'सेवा यु.के.' कडून शाळा उभारणीसाठी निधी जमवला. शाळेचे बांधकाम २०१५ साली पूर्ण झाले. शाळेच्या वसतिगृहाचे उद्घाटन इंग्लड स्थित खासदार बॉब ब्लॅकमन यांच्या हस्ते झालं. वसतिगृह त्यांच्याच मदतीने उभारले गेले. 'सेवा यु.के.' ने भारतभरात पंचवीस ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधून देण्याचे ठरवले आहे.
 |
| दिव्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत तारपा नृत्य करताना यात्रेकरू. |
दिव्य विद्यालयात एकूण एकशे त्रेपन्न मुलं-मुली आहेत. जव्हार-नाशिक मार्गावरील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण शिरपामाळच्या अगदी समोरच हे विद्यालय आहे. विद्यालयाच्या मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर डावीकडे फुलपाखरांची बाग आहे. शाळेच्या मुख्यालयात गेल्यावर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शोभेच्या वस्तू, वारली चित्रकला, आदिवासी महिलांनी बनवलेले पापड, लोणचे, कापडी पिशव्या, पर्स इत्यादी साहित्य तेथे पाहायला मिळते. हे साहित्य संस्थेने विक्रीसाठीदेखील उपलब्ध केलेले आहे. प्रमिलाताई अजूनही गावागावात फिरत असतात. तिथल्या महिलांना सक्षमीकरणाचे धडे देऊन प्रत्यक्षात व्यावसायिक क्षेत्रात आणत आहेत. पुढे आणखी नवनवीन योजना आखण्याचे त्यांचे काम सुरू आहे. २००९ साली त्यांना मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'अपंग व्यक्ती सक्षमीकरण' तर २०१७ साली त्यांना 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान' व 'उंच माझा झोका' पुरस्कार मिळाला आहे. समाजासाठी अविरत काम करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
- शैलेश दिनकर पाटील
Khup sundar lekh. . . Pramila madam che apratim kary. Salam tyana.
उत्तर द्याहटवा