प्रयोगशील शिक्षक - विनेश

२०१८च्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नवनाथ जाधव सरांबरोबर पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील  ठराविक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्या भेटी दरम्यान विनेश धोडी या प्रयोगशील शिक्षकाशी परिचय झाला. आमची भेट सिगलपाडा शाळेत झाली. शाळेतल्या खोलीत गेल्यावर चित्रे, फुलदाण्या आणि तोरण असे बरेच काही पाहायला मिळाले. विनेश मूळचे तलासरीच्या वेवजी गावचे. त्यांचे शालेय शिक्षण डहाणू तालुक्याच्या बोरिगाव येथील आश्रमशाळेत झाले. भांडुप येथील नवजीवन महाविद्यालयातून त्यांनी डी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या गिरगाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आरजपाडा येथे आहेत.


विनेश यांना कार्यानुभवाची आवड शालेय शिक्षणापासूनच होती. टाकाऊपासून टिकाऊ, कागदांपासून काहीतरी बनवणे हे सारे उद्योग सुरू असायचे. शालेय शिक्षणात त्यांचा कार्यानुभव हा विषय नाही पण आवड म्हणून ते विद्यार्थ्यांना क्राफ्टिंगचे धडे देत असतात. शालेय विषय शिकवून झाल्यावर वेळ काढून विद्यार्थ्यांना क्राफ्टिंगमध्ये रममाण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. गणेशोत्सव दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातीचा गणपती, शाळेत आलेल्या पाहुण्यांसाठी पुष्पगुच्छ किंवा कागदी फुलदाण्या असे उपक्रम घेत असतात. दिवाळीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देत सतत आणि विद्यार्थी त्यात आवडीने सहभागी होतात. शिक्षक दिन, दिवाळी किंवा वाढदिवस असो विद्यार्थी स्वहस्ते ग्रीटिंग कार्ड बनवून त्यांच्या शिक्षकांना देत असतात. या कलेची संपूर्ण देण म्हणजे विनेश.

विणेश धोडी

शाळेअंतर्गत किंवा शाळाबाह्य स्पर्धेत ते आवर्जून सहभाग नोंदवतात. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार तर्फे 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या पोस्टर स्पर्धेचे संपूर्ण जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विनेश यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत त्यांनी प्रवेश मिळविला आहे. प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे आणि जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्याकडून सत्कार देखील झाला आहे. अशीच एक स्पर्धा सोलापूरच्या 'सर फाऊंडेशन' या संस्थेने आयोजित केलेली. राष्ट्रीयस्तर नवोउपक्रम नामक ती स्पर्धा होती. तेथे देखील त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. या संस्थेकडून त्यांना 'सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०' या पुरस्काराने सन्मानित केले.

गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे यांच्याकडून परितोषिक स्वीकारताना विनेश

विनेश ज्या शाळेत शिकवतात ती शाळा प्रयोगशील आहे. त्या शाळेत विविध प्रयोग सुरू असतात. आमोद जोशी यांच्या 'रीड अ स्टोरी' या उपक्रमात विनेश हिरीरीने सहभाग नोंदवतात. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिता, वाचता आणि बोलता आलं पाहिजे हाच मूळ उद्देश आहे. सरांचं घराणं उच्चशिक्षित आहे. त्यांची पत्नी, लहान भाऊ आणि बहीण तिघेही शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतात. आणि या प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला आहेत.

शाळा आणि स्वतःची आवड जोपासून ते शेतीदेखील करतात. त्यांच्या बंगला वजा घरात एक खोली आहे. त्या खोलीत विनेश यांनी बनविलेले तोरणं, फुलदाण्या, आकाश कंदील, ड्रम, वारली चित्रे, थ्री डी पेंटिंग, कलाकुसरीच्या वस्तू अगदी सारं पद्धतशीरपणे मांडलेले आहे. या वस्तू नेमक्या कशा बनवतात त्याचे प्रात्यक्षिक ते "विनेश क्रिएशन" या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवतात.

विनेश यांनी तयार केलेल्या कलाकृती

शालेय उपक्रमासाठी त्यांची फार मदत होत असते. विद्यार्थ्यांना कलेबाबत ते कायम प्रोत्साहित करत असतात. आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना नवोदय मध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्यासाठी ते अधिक वेळ देतात. शाळेच्या भिंतींना विविध पद्धतीने रंगवून त्यावर आगळे वेगळे चित्रं काढून विद्यार्थ्यांना त्याकडे आकर्षित करण्याचा मानस त्यांचा असतो. या विविध उपक्रमांमुळे ते भिवंडीच्या 'ग्रंथभारती' आणि सोलापूरच्या 'सर फाउंडेशन' या संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. खुप मस्त लेख.अशा शिक्षकांची आजच्या पिढीला गरज आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. विनेश सर प्रत्येक कलाकृतीतून नाविन्यपूर्ण वस्तू बनवतात व आपली कला सर्वांना शिकवतात.विनेश सर एक उत्तम कलाकार आहेत तसेच शैलेश सर एक उत्तम लेखक आहेत अशीच दोघांची कला वाढत राहो ही शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. खरच ख़ुप छान लेख आहे, विनेश सर वेवजी गावा च आणि आमचा बोरीगाव शाळेच नाव खरच खुप रोशन करणार, पुढच्या कारकिरदी साठी खुप- खुप शुभेच्छा...!!!

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच उपक्रमशील आणि मेहनती शिक्षक आहेत विनेश सर आमचे मित्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

    उत्तर द्याहटवा
  5. विनेश सर खूपच उपक्रमशील आहेत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"