जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने
बाराखडी संस्थेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भागातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांना वेगळ्या विषयावर लिहिण्यासाठी उद्युक्त करत असतो. मुलांसमोर रिसर्च टाईप विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे गट करून, इमारत कशी बांधली जाते?, रस्ता कसा तयार करतात? अशा प्रकारच्या विषयावर त्यांना लिहायला सांगतो. मुलींसाठी 'मासिक पाळी' हा कॉमन विषयच घेतो. कारण हल्ली मासिक पाळीवर फारसं बोललं जात नाही. पुरुषमंडळींसमोर देखील हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही.
मागच्या वर्षी शालेय साहित्य वाटप उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना 'माझी पहिली मासिक पाळी', 'मासिक पाळी-अंधश्रद्धा', 'मासिक पाळी अनुभव' या विषयांवर लिहिण्यास सांगितले. त्यांनी ते कागदावर अगदी मुक्तपणे मांडले. मासिक पाळीविषयी गावपाड्यांमध्ये अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यांना वेगळ्या खोलीत बसवणं, देवाला न शिवणं, जेवण आणि झोपण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करणं, तिच्या हातचे काही खायचे नाही. हे काही प्रमाणात शहरी भागात देखील होत असणार. मासिक पाळी, सॅनिटरी पॅड, टैम्पून्स आणि मेन्स्ट्रुल कप याची माहिती शहरात बऱ्यापैकी आहे पण खेडोपाड्यांत याउलट आहे. तेथील मुलींना पाळीविषयी सखोल माहिती हवी असते पण घरातील वडीलधाऱ्या माणसांसमोर बऱ्याच गोष्टी टाळल्या जातात. पाळी दरम्यान होत असलेली अडचण व्यवस्थितपणे समजावून घ्यायची असते पण तसे होताना फार दिसत नाही.
मुलींनी लिहिलेल्या निबंधात त्यांच्या अनेक समस्या होत्या. त्यात काहींनी लिहिलं होतं. पॅडपेक्षा आम्हाला कापड वापरणे सोयीचे जाते. आमची आई पण आम्हाला तेच सांगते. मेडिकलमध्ये पॅड घ्यायला लाज वाटते. काही जणांकडे तर ते घेण्यासाठी मुबलक पैसे नसतात. मुलींचं अशा पद्धतीने व्यक्त होणं जरा वेगळंच वाटतं. घरात बायको, बहीण असेल तर तिचा पाठीराखा होऊन तिची काळजी घेणं तिला पॅड आणून देणं हे सारं सद्य स्थितीत घडलं गेलं पाहिजे. काही संस्था मासिक पाळी समुपदेशन किंवा कापडी पॅड बनवणे इत्यादी शिबिर भरवत असतात. त्या शिबिरातील माहिती समजून घेणे गरजेचे आहे. गावांमध्ये आशा वर्कर्स येतात त्यांच्याकडूनही मासिक पाळीविषयी जाणून घेतले तर अधिक उत्तम होईल.
- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा