"पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे"

जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास याविषयी बरंच काही बोललं जातं पण त्यावर नेमकी कृती होत नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या पुनवट गावातली बावीस वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे हिने 'पर्यावरण संवर्धन यात्री' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये पुनवट येथून सायकल भ्रमंतीसाठी सुरवात केली. एप्रिल २०२१ अखेर सात हजार किलोमीटरचा टप्पा पार करत तिने पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. या सायकल भ्रमंतीतून ती पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. प्रणालीने चंद्रपूरच्या पडोली येथील एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क येथून बीएसडब्ल्यू पदवी संपादन केली.

पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे

आई-वडील आणि तीन बहिणी असे तिचे कुटुंब. उदरनिर्वाहासाठी आई-वडील शेती करतात आणि दोन मोठ्या बहिणी शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. प्रणाली सगळ्यात लहान. शाळेत असतानाच तिला पर्यावरण या विषयात रुची होती. सततचे वातावरण बदल आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम या सगळ्यांविषयी तिला जाणीव निर्माण झाली. देश विकासाच्या दृष्टीने जरी जात असला तरी पर्यावरणाची जाणीव ठेवूनच विचार केला गेला पाहिजे.

प्रयोगशील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रणाली

वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळावे म्हणून जवळच्या अंतरासाठी किमान सायकल वापरली पाहिजे, प्लास्टिक पिशव्या आणि बाटलीचा वापर टाळला पाहिजे, परिसरात झाडे लावून त्याचे संवर्धन करणे असे नानाविध संकल्प करून तिने महाराष्ट्र भ्रमंतीला सुरुवात केली. तिच्या या प्रवासाला घरच्यांची इच्छा नव्हती पण ती तिच्या मतावर ठाम होती. खेड्यापाड्यांतील लोकांचे राहणीमान आणि तिथला परिसर तिला अनुभवायचा असल्यामुळे महामार्गाने न जाता खेड्यापाड्यांतून जाण्याचा निर्णय तिने घेतला. अंगावरील कपडे आणि सोबत एक ड्रेस, दररोज लागणाऱ्या छोटछोट्या गरजेच्या वस्तूंनी भरलेली बॅग, सायकलच्या कॅरिअरपाठी

"सायकलची वारी"

'प्रदूषणावर मात करी, पर्यावरणाचे जतन करी

आरोग्यासाठी हित कारी, तापमान वाढ कमी करण्यास मदत करी'

अशा आशयाची संदेश देणारी पाटी हा सारा ऐवज घेऊन प्रवासाला सज्ज झाली. प्रवास सुरु करताना तिने सोबतीला खाऊ किंवा पैसे असे काहीही घेतले नाही.

कल्पवृक्ष केंद्रातील नरेशकाका सावे यांच्याकडून शेतीविषयी जाणून घेताना प्रणाली


महाराष्ट्रात विविध ठिकाणी राहणाऱ्या तिच्या मित्र-मैत्रिणींना तिने प्रवासाविषयी माहिती दिली. या प्रवासादरम्यान वाटेत लागणाऱ्या सामाजिक संस्था किंवा शेतीविषयक होणारे प्रयोग यांना भेट देण्याचे तिच्या नियोजनात होते. तिच्या संपूर्ण प्रवासाचे नियोजन ठरलेले नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा मार्ग ती आदल्या दिवशी रेखाटून ठेवते. प्रवास करतेवेळी जर तिला भूक लागली तर एखाद्या पाड्यात किंवा दुकानात खाण्यासाठी मागते आणि रात्रीच्यावेळी एखाद्या गावात स्वतःच्या प्रवासाविषयी माहिती देऊन मुक्काम करते. मुक्कामाच्या ठिकाणी ती गावातल्या लोकांशी पर्यावरणाविषयी संवाद साधत असते. तिच्या प्रवासाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण होते. त्यांतील काही जण तिला आर्थिक मदत किंवा उपयोगी पडणार वस्तू असे काही देत असतात. पण त्यातही ती फार काटकसर करते. गरजेच्याच वस्तू सोबत ठेवाव्यात. सकाळी पाच किंवा सहाच्या दरम्यान प्रवास सुरू होतो. दुपारच्या उन्हात प्रवास करणे टाळते. संध्याकाळी चारच्या दरम्यान पुन्हा तिचा प्रवास सुरु होतो. ती दररोज सरासरी ऐंशी किलोमीटर प्रवास करते. कोरोना सारख्या वैश्विक महामारीतच तिने या प्रवासाला सुरवात केलेली.

प्रणालीच्या स्वागताला शहापूर येथील सायकलिस्ट


जंगलातून प्रवास करताना तिला भयानक अनुभव आले. शहापूर आठगाव मार्गे वाड्याला जात असताना जंगलाच्या वाटेल तिला भर दुपारी बिबट्या दिसला. बिबट्या निलगायची शिकार करण्यात मग्न होता. संपूर्ण जंगलात फक्त हे तिघेच. बिबट्याला निलगायची शिकार मिळाल्यामुळे या प्रवासातला मोठा अपघात टळला. भंडारा येथील नागझिरा अभयारण्यातून प्रवास करताना देखील असाच काहीसा भयाण अनुभव आला. संध्याकाळच्या प्रवासात उशीर झाला. पौर्णिमा असल्यामुळे चंद्राच्या उजेडात जंगलातून वाट काढत जात होती. तेवढ्यात अजगराच्या शेपटीवरून तिची सायकल गेली. काहीतरी झाल्याचे समजले आणि तिने सायकलचा वेग वाढवत पुढील मार्गावरील गाव गाठले. 

प्रणालीची सामाजिक संस्थांना भेटी

प्रवासात फिरताना वाटेवरील पर्यावरण प्रेमींशी संपर्क होतो. त्यांच्याकडील अनुभव आणि विविध गोष्टी ती समजून घेत असते. याच प्रवासात काही ठिकाणी वृक्षारोपण देखील केले गेले आहे. १६५ दिवसाच्या(०१एप्रिलपर्यंत) प्रवासात तिने जळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन यांचे दीपस्तंभ फाउंडेशन, शहापूर तालुक्याच्या साकुर्ली गावातील सेंद्रित शेती करणारे स्वप्नील अधिकारी, साकडबाव येथे महिलांनी केलेले जलसंवर्धनाचे काम, राष्ट्रपती पुरस्काराने गौरवलेली हाली बरफ, बीजमाता राहीबाई पोपरे, वाड्याचे रोहन ठाकरे यांचे ३६० फार्म, जव्हार येथील मिलिंददादांची वयम् चळवळ, वाणगाव येथील पानसे यांचे ग्राममंगल, आदिवासींच्या लोकसंस्कृतीचे जतन करणाऱ्या फिरोजा ताफ्ती, महाराष्ट्रातील प्राकृतिक शेतीचे प्रणेते कै. भास्करराव सावे यांचे कल्पवृक्ष केंद्र या ठिकाणांना भेटी देऊन प्रत्येक ठिकाणचे काम पाहिले. तलासरीच्या गिरगाव येथील प्रयोगशील शाळेतल्या विद्यार्थ्यांशी तिने 'पर्यावरण संवाद' साधला. पालघरनंतर तिचा प्रवास वसई-कल्याण-पनवेल मार्गे तळकोकणात होणार आहे. नोव्हेंबर २०२१ अखेर प्रवास संपवून घरी पोहोचणार असल्याचे तिने सांगितले. प्रणाली म्हणते, 'मी नोकरी करण्यापेक्षा शेतीवर लक्ष केंद्रित करणार आहे. महाराष्ट्र भ्रमंती करत असताना शेतीचे विविध प्रयोग पहायला मिळत आहेत. या प्रयोगांतून शिकून माहिती घेऊन स्वतःच्या गावी शाश्वत शेती करणार आहे.'

- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या

  1. प्रणाली चिकटे सारख्या पर्यावरण प्रेमी तरुणीला खूप खूप शुभेच्छा व तिला सुंदर लेखणीतून प्रोत्साहन देणाऱ्या तरुण तडपदार लेखक शैलेशजीचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐👌👍

    उत्तर द्याहटवा
  2. Pranali really proud of u...True inspiration for all young generation..Keep inspiring.

    उत्तर द्याहटवा
  3. बापरे खरोखरच स्तुत्य उपक्रम ������ प्रणालीच्या पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा ������

    उत्तर द्याहटवा
  4. प्रेरणदायी आणि भन्नाट आहे हे सारं ❤

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर... अप्रतिम उपक्रम... प्रणालीला अनेकानेक शुभेच्छा👍

    उत्तर द्याहटवा
  6. छान.. साकडबाव येथे महिलांनी जलसंवर्धनावर जे काम केल आहे ते गुंज च्या माध्यामातून झालं. अनेक ठिकाणी याची दखल घेतली जात आहे याचे विशेष कौतूक वाटते..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"