शालेय उपक्रम
आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एक उपक्रम जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित केलेला. तो उपक्रम नेमका काय होता त्याविषयी जरा लिहिले आहे. मूळ पोस्ट २०१९ ची आहे.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला सांगितले होते. त्यांनी केलेले लिखाण वाचले. बरेच विद्यार्थी छान व्यक्त झालेत. त्या विद्यार्थ्यांना लिहायला काय देऊ हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता त्यातल्या त्यात एका पाड्यावरची शाळा जिथे घर, शाळा, शेती, काम, अभ्यास या पलीकडे काहीच नाही. त्या शाळेतल्या सरांशी बोलून काही विषय निवडायचे ठरले. माझे सहकारी विकास, ज्योती, उज्वला यांच्याशी चर्चा करून पंधरा-वीस विषयांची यादी तयार केली. इमारत कशी बांधली जाते? वर्तमानपत्रे आपल्या पर्यंत कसे पोचतात? परिसरातील बाजार? तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले व्यक्ती. वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? हे विषय देण्यात आले. मुलींना मासिक पाळीविषयी लिहायला सांगितले.
शाळेत शिकवलेलं घरी जाऊन अभ्यास करणे. त्यानंतर गप्पा गोष्टी आणि मस्ती. यापेक्षा जर त्यांना एखाद्या गोष्टीत गुंतवून त्यावर जर विचार करण्यास भाग पाडले तर त्यांनाही तसे आवडेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून हा प्रयोग करण्याचे ठरले. विषय निवडल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच-पाच मुलांचे गट बनवायचे आणि त्यांना एक विषय द्यायचा, त्या विषयावर त्यांनी गटचर्चा करून लिहून द्यायचे. दिलेल्या विषयाची माहिती विद्यार्थ्यांनी कोठूनही शोधून काढायची गुगल करा, सरांना विचारा, मित्राला विचारा किंवा घरी विचारा पण दिलेल्या विषयावर आम्हाला लिहून द्या. हा आमच्यासाठीही एक छोटा प्रयत्नच होता कारण या भागांतील शाळेत आम्ही पहिल्यांदाच असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा का होईना पण चांगल्यापैकी तो यशस्वी झाला. मुलांनी छान प्रकारे लिहून दिले आहे. त्यांच्या भाषेत लिहिलेली वाक्ये वाचली की आनंद वाटतो.
![]() |
| विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध |
इयत्ता सहावीतल्या एका गटाने 'वाचनाची आवड निर्माण करायची असल्यास काय करावे?' या विषयावर लिहिले मला त्यातली शेवटची ओळ फार आवडली. ती अशी होती, की 'म्हणून वाचन करा. दररोज सकाळी संध्याकाळी म्हणजे नुसतं वाचायचं नाही तर आपण काय वाचतो हे पण कळले पाहिजे.' सातवीच्या गटाने परिसरातील बाजाराविषयी लिहिले. त्यात त्यांनी खाण्याच्या पदार्थांवरच जास्त भर दिला आहे. पुढे ते लिहितात परिसरातील बाजारामुळे लोकांच्या गरजा भागतात. आठवीच्या एका गटाने त्यांच्या परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींविषयी अगदी थोडक्यात लिहिले. शिक्षक रामा सर आणि गावातील एका शेतकऱ्याविषयी लिहिले. आपल्या परिसरात असे लोकं बरेच असतात एकतर आपण त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्याची माहिती नसते. वारली चित्राविषयी एकाने माहिती लिहिली. विशेष म्हणजे ज्या विषयाचा आम्ही विचार केला नाही त्या विषयावर विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्न लिहून एक विषयच तयार करून दिला. तो म्हणजे दररोज वापरात येणारी पेन्सिल. पेन्सिल कश्या बनवतात? तुम्ही लाकडे कोठून आणतात? एका दिवसात किती पेन्सिला बनतात? पेन्सिला कुठे ठेवतात? ते बनवण्यासाठी काय करावे लागते? कंपनी किती वाजता सुरू करतात? कधी बंद करतात? असे प्रश्न त्यांनी तयार केले. गंमत म्हणजे आम्ही शाळेत किंवा आताही बऱ्याचदा पेन्सिलचा वापर केला. अजूनही करतोय पण इतके प्रश्न आम्हाला कधी पडले नाही. आम्ही फक्त त्याचा वापर करत राहिलो. शंभरमुलींपैकी फक्त सात जणींनी मासिक पाळीविषयी लिहून दिले. त्यांनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे. जर कोणाच्या समस्या आपल्याला समजल्या नाहीत तर त्यावर आपण उपाय तरी कसा काढू शकतो? ते वाचल्यानंतर आरोग्याबाबतीत तिथली परिस्थिती फारच कठीण आहे असे दिसून येेेते. एकूण झालेल्या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांनी अभिप्रायही छान लिहून दिलेत. विद्यार्थ्यांना अशा वेगळ्या विषयांत गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. विविध विषयांची माहिती त्यांना मिळते.
- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा