सामाजिक सहल - सृजन यात्रा

कराड येथील 'सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान' सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. सामाजिक भान जपणाऱ्या तरुणांसाठी संस्थेने 'सृजन यात्रा' नामक उपक्रम सुरू केला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम करणाऱ्या संस्था, आदर्श व्यक्ती यांच्याशी भेट आणि संवाद साधणारी ही सामाजिक सहल आहे. संस्था आणि कर्तृत्ववान व्यक्ती यांच्या कामाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी आणि त्या प्रेरणेतून कोणीतरी त्यांच्या भागात सामाजिक काम सुरू करावे. तथा जाणिवा जागृत कराव्या हा यात्रेचा मूळ हेतू आहे. यात्रेची संकल्पना २०१४ साली मांडली गेली आणि २०१५ पासून यात्रेला सुरवात झाली.


ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सृजन यात्रा पार पडते. ही यात्रा कमीत कमी चार ते जास्तीत जास्त आठ दिवसांची असते. त्याचे नियोजन पाच-सहा महिन्याआधी सुरू असते. तेथील संस्थांची यादी करून त्यांना भेटी देऊन यात्रेकरूंच्या जेवण आणि राहण्याच्या सोयीचे पाहिले जाते. यात्रेत सहभागी होण्यासाठी सेवायोगच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. त्यात अनेक प्रश्नांची विचारणा केली जाते. आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया होते. निवड झाल्यानंतर प्रवासादरम्यान राहणे आणि जेवणे यासाठी नाममात्र फी आकारली जाते.

यात्रेची सुरवात संस्थेचे मूळ ठिकाण कराड येथून होते. सृजन यात्रा का? कशासाठी? याचे सत्र आयोजित केले जाते या सत्रात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत असते. त्यांतील कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख(काकाजी) यांचे दरवर्षी मागर्दशन मिळत असते. सृजन यात्रेची प्रत्येक अपडेट त्यांना मिळत असते. सृजन यात्रेचा प्रवास रेल्वे अगर बसने होणार असेल तर त्याचे आरक्षण केले जाते. संस्था भेटीच्या प्रवासाआधी हीच आमुची प्रार्थना, तू बुद्धी दे, इतनी शक्ती हमे दे ना अशा प्रकारचे गीत समूहाने गायले जाते. हा क्रम दररोजचा आहे. सकाळ-संध्याकाळ गीतं बोलली जातात आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे गीत असते. 

प्रवासादरम्यान यात्रेकरूंसाठी नियमावली ठरलेली आहे. प्रत्येक यात्रेकरुने स्वतःची ओळख एका मिनिटात करून द्यायची असते. स्वतःचा मोबाईल बंद करून बॅगेत ठेवायचा प्रवासात जितकी जास्तीत जास्त चर्चा करता येईल तितकी करायची. सकाळचा प्रवास सुरु झाल्यावर/दुपारचे सत्र आटोपल्यावर बसमध्ये स्वतःची जागा आणि शेजारचा पार्टनर देखील बदलायचा. याचा मूळ उद्देश हाच की, प्रत्येकाशी आपली ओळख झाली पाहिजे आणि त्यांचे काम जाणून घेतले पाहिजे. संस्था भेटीवेळी त्यांच्या कामाचा प्रवास, त्यांना आलेली अडचण त्यावर त्यांनी मात कशी केली या साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या जातात. प्रवासात विविध विषयांवर गटचर्चा होते. काही ठिकाणी सामाजिक विषयांवर पथनाट्य बसवली जातात. संध्याकाळच्या जेवणानंतर भेट दिलेल्या संस्थेच्या कामाविषयी चर्चा होते. या यात्रेत सहभागी झालेल्या बऱ्याच जणांनी स्वतःला सामाजिक कार्यात जोडून घेतलं काहींनी सामाजिक भान जपत स्वतःच काहीतरी उद्योग सुरू केले. यात्रेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंसाठी 'सृजन यात्रा' हा अभ्यास दौराच ठरतो असे म्हणायला हरकत नाही.

पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा

२०१५ पासून सुरू झालेल्या सृजन यात्रेचा आतापर्यंतचा प्रवास विदर्भ, मेळघाट, खानदेश आणि कोकण या ठिकाणी झाला. त्या यात्रेत प्रयास-सेवांकुर संस्था, पीपल फॉर ऍनिमल संस्था, सेवाश्रम आश्रम, पवनार आश्रम, बालग्राम, सहारा अनाथालय, शोधग्राम, आनंदवन, मेंढा लेखा, हेमलकसा, खानदेशातील नीलिमा मिश्रा यांचा गोधडी प्रकल्प, आदर्श गाव- बारीपाडा, गांधीतीर्थ, दीपस्तंभ, स्नेहज्योती अंध विद्यालय, सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ(चिपळूण), कासव मित्र मंडळ, लोकसाधना ट्रस्ट, प्राचीन कोकण संग्रहालय, स्वप्ननगरी पुनर्वसन केंद्र, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थांना भेटी दिल्या गेल्या. आतापर्यंत अडीचशेपेक्षा अधिक तरुण यात्रांत सहभागी झाले आहेत. सावली फाउंडेशन, उद्योगवर्धिनी(सोलापूर), उमेद फाउंडेशन, विद्योदय, शाहूवाडी तालुका शिक्षक इत्यादी स्थानिक सामाजिक संस्था व त्यांचे सभासद यात्रांत सहभागी होतात. यात्रांमध्ये नव्या सामाजिक संस्थांची उभारणी, सामजिक संस्थांत स्वयंसेवक म्हणून दाखल होणे, यात्रांत सहभागी सामाजिक संस्था व प्रतिनिधी यांचे परस्पर सहकार्य, त्यातून वाढणारी कामाची व्याप्ती, संकल्पनांची देवाणघेवाण असे सारे या सृजन यात्रेत घडत असते.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. सृजनयात्रा खुप छान आठवणी आहेत. अनेक सृजनयात्री भेटले अनेक सामाजिक कार्य जवळून पाहता आली. महान विभूतीना भेटता आलं. पण 😔हे सर्व मिस करत आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"