चालतं फिरतं ग्रंथालय
वाचन संस्कृती रुजावी म्हणून काही वाचनालय किंवा संस्था विविध मार्गाने प्रयत्न करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न बारामती येथील बेचाळीस वर्षीय राजेंद्र सुमंत करत आहेत. मागील सोळा वर्षांपासून(२००६) वाचकांसाठी पुस्तकं घरपोच पोचविण्याची सेवा देत आहेत. राजेंद्र सुमंत यांनी वाई येथील किसन वीर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना साहित्य क्षेत्र आणि वाचनाची गोडी लागली. ते वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे १९९९ साली सभासद झाले. तेथे त्यांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात दुरून येणारे वाचक, तेथील व्यवस्था हे सारे त्यांच्या नजरेखालून जात होते. त्याच दरम्यान त्यांना वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली. पण त्याचे नियोजन कसे करता येईल? या विचारांतच दोन-तीन वर्षांचा कालावधी गेला.
![]() |
| राजेंद्र सुमंत |
घरगुती वाचनालय सुरू केल्यावर वाचक तेथपर्यंत पोचेल की नाही या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी पुस्तक घरपोच देण्याचा विचार केला. या निमित्ताने त्यांचा जनसंपर्कदेखील वाढणार होता. ०१ जानेवारी २००६ रोजी 'साहित्य संस्कृती' या नावाने ग्रंथालय' सुरू केले. त्यांच्या परिचयातील दोन-तीन मित्रांना वाचनालयाच्या संकल्पनेविषयी सांगून कामाला सुरुवात केली. सुमंत सुरवातीच्या काळात सायकलच्या कॅरिअरवर पुस्तकं ठेऊन सभासदांच्या घरी जात आणि त्यांना पुस्तकं देत. दिलेल्या पुस्तकाची व्यवस्थित नोंद करायचे. त्यांच्या या सेवेमुळे त्यांना विशेष जाहिरात करण्याची गरज भासली नाही. त्यांच्याच वाचक सभासदांनी ग्रंथालयाची तोंडी जाहिरात केली. त्यामुळे वर्षागणिक वाचकांची संख्या वाढतच होती. सद्य स्थितीत त्यांच्याकडे पंच्याहत्तर वाचक सभासद
आहेत.
![]() |
| साहित्य संस्कृती ग्रंथालय |
सुमंत हे बारामतीत एका कन्स्ट्रक्शन कंपनीत ऑफिस एडमिनिस्ट्रेशन म्हणून नोकरी करतात. सोमवार ते शनिवार नोकरी, सुट्टीचा दिवस रविवार. आणि या सुट्टीच्या दिवशीच काम करण्याचे ठरवले. २००६ ते २०१५ या दहा वर्षांत प्रत्येक रविवारी त्यांनी सायकलवर पुस्तकं पोचवण्याचं काम केलं आहे. त्या दिवसाचा तीस किलोमीटर इतका प्रवास व्हायचा. वाचक आणि त्यासोबत प्रवासातल्या पुस्तकांची संख्या दिवसागणिक वाढत होती. पुस्तकांच्या अति वजनामुळे सायकलवर ते नेणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी २०१६ पासून दुचाकीचा वापर करण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी सात ते दोन घराबाहेर असणार, दोन वाजता जेवणाची वेळ, त्यानंतर संध्याकाळी चार ते सात पुन्हा बाहेर असे नियोजन त्यांचे होते. संपूर्ण चौदा वर्षांत त्यांना फक्त चार रविवार आजारपणामुळे आराम करावा लागला. इतरवेळी त्यांच्याकडून रविवारचा क्रम कधी चुकला नाही. पावसाळ्यात त्यांना पुस्तकांची विशेष काळजी घ्यावी लागे. त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना पुस्तकं झाकण्यासाठी फ्रिजचे प्लास्टिक कव्हर दिले होते.
वाचक सभासदांकडून कोणतीही अनामत रक्कम न घेता दर महिना एक ठराविक रक्कम घेण्याचे त्यांनी ठरवले. २००६ साली त्यांची वीस रुपये महिना सभासद फी होती आणि आता सध्या वाचक सभासद रक्कम पन्नास रुपये महिना इतकी आहे. त्यांना मिळणाऱ्या या सभासद रकमेतून वाचकांसाठी ते नवीन पुस्तकं खरेदी करत असतात. त्यांच्याकडे आतापर्यंत पंधराशे पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यांचे म्हणणे असे की, नवीन पुस्तक असले की वाचक उत्साहाने ते वाचतो.
![]() |
| ग्रंथालयातील पुस्तकांचा संग्रह |
पुस्तकांच्या नोंदी, कव्हर घालण्यापासून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते स्वतःच करतात. वाचनाची आवड असल्यामुळे आपल्या हातून समाजसेवा घडावी हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवूनच त्यांचे काम सुरू आहे. पुस्तक बदलीसाठी जेव्हा वाचकांकडे जातात तेथे त्यांचा चांगला पाहुणचार होतो. वाचकांकडून त्यांना कधी वाईट अनुभव आलेला नाही. सुमंत यांना त्यांच्या घरचे देखील सहकार्य करत असतात.
मागील वर्षभरात कोरोना संसर्गामुळे घरपोच सेवा देणं थांबलं आहे. पण वाचक सभासदांशी फोन किंवा मॅसेजद्वारे संभाषण घडत असते. सेवा देता येत नसल्यामुळे त्यांना खंत वाटत आहे. कोरोना संसर्ग किती काळ टिकेल याची कल्पना नाही त्यामुळे सुमंत यांचा 'वाचक मंडळ' सुरू करण्याचा मानस आहे.
- शैलेश दिनकर पाटील



Excellent..jabardast mehnatila aamcaha nehmich salaam
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाफार सुंदर व प्रेरणादायी कार्य वाचाल तरच वाचाल!!राजेंद्र सरांना व त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या माझ्या दोस्ताला मानाचा मुजरा!👍💐💐💐
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाएखादं काम ईतक्या कल्पकतेने करणं आणि पुढे आणणं हे भन्नाट आहे !!!!
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाGood work
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाखूपच सुंदर.��तुमचे कार्य फार उल्लेखनीय आहे, कारण वाचाल तर वाचाल।आणि ह्या जागतिकीकरणात टिकून राहताल.��
उत्तर द्याहटवा"असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तुम्ही त्यातलीच एक आहात."💐💐
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवा