लोकसंस्कृती जपणारी माणसं...

२२ नोव्हेंबरला आमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत दादरा नगर हवेली येथील दुधणी येथे फिरायला गेलो होतो. दुधणी पर्यटन केंद्र असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी तेथे प्रचंड गर्दी असते. तेथील बोटिंग हे मुख्य आकर्षण. महाराष्ट्र, गुजरात आणि सिल्वासा येथून बरीच माणसं तेथे फिरायला येतात. दुधणीच्या बोटिंग पॉईंटजवळ एक लोकमंच बनवला गेला आहे. आम्ही सहकारी मंडळी फिरत असताना त्या लोकमंचावर विशेष वेशभूषा परिधान करणारा पंधरा-वीस जणांचा समूह पहायला मिळाला. त्यांचं नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी त्या लोकमंचाजवळ गेलो. आलेल्या समूहाने पाच मिनिटे विश्रांती करून सादरीकरणाच्या तयारीला लागले. थोड्यावेळासाठी मला शहरात होत असणाऱ्या फ्लॅश मॉब डान्सची आठवण झाली. तारपा नाच करणारे सगळे शाळकरीच विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतीला त्यांचे पालकदेखील होते. आणि त्यांच्यातले दोन वयस्कर माणसं तारपा आणि तूर वाजविणारे. त्यांतील एकाने तूर वाजविण्यास सुरुवात केले. त्याचा सूर ऐकून फिरायला आलेली माणसं त्या लोकमंचाकडे आकर्षित झाली. तूर आणि थाली वाजविणारा मध्यभागी आणि त्यांच्याभोवताली मुलामुलींनी एकमेकांच्या कंबरेवर हात ठेवत नृत्याला सुरवात केली. संगिताची ताल बदलताच नृत्याची लय देखील बदलत होती. तूर वाद्य दहा मिनिटं सादर केल्यानंतर त्यांनी पाच मिनिटांनी विश्रांती घेऊन तारपा नृत्याला सुरवात केली. त्या नृत्याचे विविध अविष्कार तेथे पहायला मिळाले. सभोवताली जमलेली माणसं टाळ्या वाजवून कौतुक करत होते.  या समूहाने मंचाच्या पायरीजवळ एक दानपेटी ठेवली होती. ज्याला नृत्य आवडलं त्याने त्या पेटीत दान करावे असा त्या मागचा हेतू.

तारपा वाद्यावर केलेले तारपा नृत्य.

सादरीकरण करणाऱ्या समूह प्रमुखाचा शोध घेत होतो. लोकमंचाच्या अगदी कोपऱ्यात बसलेला माणूस त्यांच्या समूहाशी संवाद साधत होता आणि पुढे काय करायचं हे सांगत होता. समूहाच्या विश्रांतीचा वेळ झालेला आणि तीच संधी साधत त्यांच्या प्रमुखाशी भेटलो. प्रमुखाचे नाव शंकर मोंडकर. ते आणि त्यांच्या सोबत असलेला समूह दादरा नगर हवेलीजवळच राहणारा. मोंडकर हे त्या भागात ठाकरे या नावाने प्रचलित आहेत. समूहातील सगळी माणसं एकाच पाड्यातली. स्वतःची शेतीवाडी सांभाळून इथे वेळ देत असतात. मोंडकर सांगतात, ' आम्ही आदिवासी हे आमचं पारंपरिक नृत्य आहे. ते जपण्याचं काम आम्ही करत असतो. पारंपरिक कलेच्या स्पर्धा जिल्हा, राज्य पातळीवर होतात त्यात आम्ही सहभाग घेत असतो. तीन-चार वेळा आमचा पहिला क्रमांक देखील आला आहे.'

तूर वाद्यावर केला जाणारा नाच.

मोंडकर यांनी १९९५ साली 'जय जलाराम मंडळाची' स्थापना केली. गावातल्या लोकांना सोबत घेऊन गावाबाहेर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या ठिकाणी त्यांच्या मंडळाने नृत्याविष्कार सादर केला आहे. त्यांच्या मंडळातील तारपा वादकाचा एक पुतळा सिल्वासा येथील 'नरोली'जवळ उभारला गेला आहे. दुधणीच्या बोटिंग पॉईंटजवळील लोकमंचावर त्यांनी पहिल्यांदाच सादरीकरण केले. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत सादरीकरण करण्याचे ठरविले आहे. मोंडकर यांचं म्हणणं आहे की किमान तिकीट दर लावणे गरजेचे आहे. लोकं येतात पाहतात आमच्यासोबत फोटो काढतात. त्यांतले ठराविक जणच दानपेटीत पैसे देतात. आम्हाला लागणारे ड्रेस आणि त्यांत चेहऱ्याची सजावट, सोबत असलेल्या वाद्यांची देखभाल हा सगळा खर्च स्वतःला करायचा असतो. स्पर्धेत उतरण्यासाठीही फॉर्म भरण्यापासून ते प्रवासापर्यंतचा सगळा खर्च स्वतःला करावा लागतो. मोंडकर यांचा समूह बाहेर ठिकाणीही वैयक्तिक रित्या कार्यक्रम करत असतात. त्यांनी याच निमित्ताने आवाहन देखील केले, की कोठे सादरीकरण करायचे असल्यास जरूर कळवा आम्ही तेथे येऊ फक्त आमचा खर्च सुटेल इतके मानधन आम्हाला द्या.


- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"