बाप्पाला पत्र २०२० - गणेशोत्सव


प्रिय गणपती बाप्पा,

यावेळी तुझं आगमन आम्ही थाटामाटात करू शकलो नाही याची खंत कायम मनात राहील. इच्छा असूनही काहीच करता येत नाही नाईलाज आहे सगळा. संपूर्ण देशभर कोरोना रोगाची आपत्ती कोसळली आहे. मागच्या वर्षी तर पावसाच्या पाण्याने झोडपले होते. अनेकांचे घर पुरामुळे बुडाले होते. पै पै जमवलेलं सगळं वाहून गेलं. पण नव्या जोमाने आम्ही पुढे आलो आणि संसार पुन्हा नव्याने थाटला. आता सगळं सुरळीत असताना यावर्षी मात्र कोरोनाने वाट लावली. इथे ना नव्याने सुरवात करता येत, ना जवळच्या व्यक्तींना भेटता येतं. लॉकडाऊनमुळे काही जण दूरवर अडकले त्यांना स्वतःच्या घरीही जाता येईना. अशा परिस्थितीत नातेवाईकांकडे पण जाता येईना.

आम्ही मोकळा श्वास घेत कोठेही जायचो पण मार्चपासून तोंडाला मास्क आणि सतत हात स्वच्छ ठेवणं हे आता गरजेचंच झालंय. लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाची तर पूर्णतः वाट लागली आहे. दोन वेळचं जेवण करणारा माणूस आता काटकसरीनंच जगतोय. देशाचा अन्नदाता आपला शेतकरी बांधव त्याने राब राब राबून शेतात पिकं घेतली पण बाजारच बंद असल्यामुळे त्याला हवा तो भाव मिळाला नाही. मग घरात अन्न सडवण्यापेक्षा त्याने अगदी कमी भावात विकले. बाप्पा तुला खरं सांगू, यावेळी आंबे खायचा विचारही मनाला शिवला नाही कारण आंबे जर खरेदी केले तर आठवडाभर पुरणारे पैसे चुटकीसरशी संपतील. कोरोनामुळे घरातल्या माणसाचा मृत्यू जरी झाला तरी त्याच्याजवळ बसून हंबरडा ही फोडता येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आली आहे.

बाप्पा, सांगितल्याप्रमाणे आम्ही घराबाहेर पडताना तोंडाला कायम मास्क बांधूनच बाहेर पडू आणि शस्त्र म्हणून सॅनिटायझरचा कायम वापर करू. कोणाशीही हस्तांदोलन न करता दुरूनच हात जोडून नमस्कार करू. बोलताना आम्ही कायम अंतर ठेवूनच बोलू. रस्त्यावर कोठेही पचापच थुंकणार नाही. महत्वाचं काम असेल तरंच बाहेर पडू विनाकारण अजिबात बाहेर जाणार नाही. बाबा कामावरून घरी परतले की त्यांना घरात कोणालाही न भेटता घरातल्या बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ करायला सांगू. सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन करू. ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर सुरू होईल. पण अजून शाळा सुरू नाही झाली. ऑनलाईन वगैरे सगळं ठीक आहे. पण शिक्षकांचा मार आता हवाहवासा वाटतोय. यंदा आम्हाला झेंडावंदनाची आठवणच आली बघ. बाप्पा देशावर कोसळलेल्या या संकटाला आता तूच सावर. आमची तुझ्यावर नितांत श्रद्धा आहे. या महामारीपासून देशाला वाचव. विसर्जन करताना तुझ्या कानात आम्ही पुटपुटायचो पण आता सतत दहा दिवस तुझ्यासमोर गाऱ्हाणं गातोय.

या संकटातून देशाला मुक्त कर.                                          या संकटातून देशाला मुक्त कर..                                         या संकटातून देशाला मुक्त कर...

गणपती बाप्पा मोरया !!!

- शैलेश दिनकर पाटील

https://youtu.be/Pfq9lwewYto

टिप्पण्या

  1. Pan yat yek gost samazali
    1=lokanchi manusaki
    2=aaplya mansachi garaj
    3=kahi divas pasun World cha population kami zal kivha green house effect kami zale
    4=yat mansane keleli pragati etki mothi pan nahi ki tia nisarg chya puthe janar
    Karan aapn ch nisargach nuksan kel aahe yachi kimat tar mojavi lagnar
    5=yat aapn sarv desh ek houn parat deshala puth aanu sakato aaplya aaplya capacity ani shakti ani hardwork ne
    6=ase divas yetat jatat pan ethun new start pan gheta yenar aaplya la.
    7=this time will be go I have also hope

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"