ऊसतोड कामगार आणि जागरूक समाज
माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागे भला मोठा उसाचा मळा आहे. ऐन होळीच्या दिवशी त्या मळ्यात पन्नासेक माणसं आले होते. त्यांनी तेथे स्वतःच्या झोपड्या बांधल्या. मळ्यातील ऊसतोडणीसाठी ही माणसं आली होती. म्हटलं चला चांगलं झालं इथे त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना आलेले अनुभव तरी रेखाटता येतील. माझ्या घरातल्या किचन आणि बेडरूममधल्या खिडकीतून त्यांच्या झोपड्या आणि दिनक्रम दररोज पहायला मिळतो. त्यांची कामं पाहता पाहता आठवडा गेला. ऊसतोड कामगारांविषयी मित्र-मैत्रिणींकडून गेल्या एक-दोन वर्षांत बरंच काही ऐकलेलं होतं. सातारा, सांगली येथील ऊसतोड कामगारांसाठी काम करणारे माझे काही मित्रही आहेत. मळ्यात आलेल्या ऊसतोड कामगारांसाठी मी शिक्षणविषयक नियोजन आखले होते पण कोरोना आला आणि सगळं काही विस्कटलं. मागच्या आठवड्यात त्यांच्यातल्या ताराचंदची भेट घेऊन त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली. ही सगळी मंडळी नंदुरबारच्या एका खेडेगावातून आलेली. साखर कारखान्याचा सुपरवायझर सांगेल त्याठिकाणी त्यांना जावं लागतं.
![]() |
| ऊसतोड कामगारांची तात्पुरती घरं |
इकडे(उंबरगाव) त्यांचा मुक्काम पंधरा ते वीस दिवसांचा होता पण लॉकडाऊनमुळे मुक्काम आणखी वाढला आता तो किती दिवस आहे? हे अजून निश्चित नाही. दोन वेळा येथून निघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाता आले नाही. एकूण वीस कुटुंब त्यांच्या लहान पोराबाळांसहित इथे आली. त्यांचा पहिला दिवस निवांत गेला पण दुसऱ्या दिवशीपासून मळ्यात त्यांच्या कामाचा धडाका सुरू झाला. रोज सकाळी सहाच्या आत उठून जेवण बनवून ऊसतोडणीसाठी मळ्यात निघणे. त्यांच्यातील आठ-दहा महिन्याच्या बाळाला सांभाळण्यासाठी सात-आठ वर्षाच्या मुला-मुलीकडे देणे. ही मोठी मुलं-मुली त्यांना खेळवण्यात दंग असतात. त्यांची खेळणी मला फार आवडली. एक छोटासा चप्पलेचा खोका त्याचे वरचे कव्हर फाडून खोक्याच्या पुढच्या बाजूला दोनेक मीटरची सुतळी बांधायची आणि त्याचीच गाडी गाडी खेळायची. दुसरा खेळ असा, की भला मोठा बॉक्स त्यावर लहान मुलांना बसवायचं आणि दोन मोठ्या मुलांनी तो ओढत न्यायचा. खाली माती, दगड काय आहे काही पहायचं नाही फक्त खेळाचा आनंद घ्यायचा. ही या लहान मुलांची खेळणी. संध्याकाळी चार-पाचच्या दरम्यान सगळेजण मळ्यातून घरी येणार. घरी आले की विहिरीतून पाणी आणून त्याच थंड्या पाण्याने अंघोळ करणार. पुरुषांचं ठीक आहे ते उघड्यावर आंघोळ करू शकतात. पण महिलांचं काय? इलाज नाही म्हणून त्यांनाही उघड्यावरच आंघोळ करावी लागते. हे सगळं चित्र जेव्हा डोळ्यांसमोर दिसतं तेव्हा खूप वाईट वाटतं. पण त्यांना त्याचं काहीच नाही त्यांचं जीवनच तसं आहे.
![]() |
| माझा सहकारी त्या मुलाशी खेळताना |
ताराचंदला विचारलं, मुलं शाळेत जातात का नाही? त्यावर त्याच उत्तर नकारार्थी होतच पण त्यापुढे तो म्हणाला, 'शिक्षण घेऊन कोणाचं भलं झालंय? आम्ही शेती करतो, आमची मुलं पण तेच करणार. आम्ही एका ठिकाणी नसतो. सुपरवायझरचा फोन आला त्याने कामाचं ठिकाण सांगितलं की बिऱ्हाड घेऊन तिकडे जायचं. दिवाळी संपली की बाहेर पडतो आणि आखाजी(अक्षय तृतीया) जवळ आली की घरी जातो. सहा महिने घरी आणि सहा महिने बाहेर असतो. त्यामुळे मुलांचे शिक्षणही नीट होत नाही. घरी कमाईचे काही साधन नाही गावी फक्त स्वतःच घर आहे पण कामासाठी दुसऱ्यांच्या शेतातच जावंच लागतं. काम नाही मिळालं की जीवनावश्यक वस्तूंसाठी सावकाराकडून पैसे घ्या. मग ते पैसे परतफेड करण्यासाठी त्याच्या शेतात काम करा किंवा मग गावाबाहेर जाऊन काम करून कमावलेले पैसे देऊ करा'.
![]() |
| माझ्या सहकारी तिथल्या महिलेशी संवाद साधताना |
एकीकडे देश स्मार्टच्या दिशेने जातोय हे खरंय पण अशी जीवन जगणारी लोकं अजूनही आपल्याकडे आहेत. ज्यांना स्वतःचं पुढील भविष्य ठाव नाहीये. ऐन उन्हाळा सुरू आहे इतक्या उन्हात ते मळ्यात काम करणार आणि घरी थकून भागून आले की अंधार पडण्याआधी स्वयंपाकाच्या मागे लागणार. सुरवातीला त्यांच्याकडे लाईटची व्यवस्था केलेली नव्हती पण त्याचे त्यांना काहीच नाही. बहुतेक त्यांना अंधारात राहण्याची सवयच झाली असेल. चार-पाच बल्ब त्यांना पुरेसे आहेत. अंधारात जेवणं आणि मग त्यांनंतर मच्छरदाणी लावून झोपणं पंखा वगैरे काही नाही. इतकं सगळं असूनही ते सुखाची झोप घेत आहेत. ताराचंद म्हणतो 'आमची कामं आटोपली आहेत आम्हाला कामाच्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं आहे पण सगळं बंद असल्यामुळे कुठे जाता येत नाही.' काही काम हाताखाली नसताना नुसतं बसून राहणं त्याला पटत नव्हतं हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं पण पर्याय नव्हता.
आमच्या बिल्डिंगमध्ये जवळपास ८०% शिक्षक वर्ग आहे. आणि हे सगळे शिक्षक जिल्हा परिषद शाळेतले आहेत. त्यांतील ठराविक शिक्षक ओळखीचे आहेत. लॉकडाऊनपूर्वी संध्याकाळी नेहमी त्यांचे कट्टे बसायचे. विविध विषयांवर चर्चा वगैरे व्हायच्या. आमच्या इथून गुजरातचा औद्योगिक भाग जवळच आहे. महाराष्ट्रातील आदिवासी भागांतील बऱ्याचश्या महिला-मुली तिथे कामाला जातात. त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी गाड्या आमच्या बिल्डिंगच्या खाली लागतात. बहुतेक २० किंवा २१ मार्च असेल मी काही साहित्य आणायला किराणा दुकानात गेलेलो ते घेऊन माघारी येताना पाहिलं सगळे शिक्षक मंडळी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मास्क वाटप करत होते. मी नेमका मोबाईल घरी ठेवल्यामुळे मला काही टिपता आले नाही. ०२ एप्रिलचा प्रसंग आहे. लॉकडाऊनमुळे सगळा परिसर सामसूम होता. बिल्डिंगच्यापाठी आलेले ऊसतोड कर्मचारी त्यांनाही कुठेच जाता येत नव्हते. बिल्डिंगमधल्या सगळ्या शिक्षकांनी ठरवले आपण काही रक्कम काढून जीवनावश्यक वस्तू घेऊन ऊसतोड कामगारांना देऊयात. कारण परिस्थती अशी झाली, की त्या कामगारांना बाहेर पडता येत नाही स्वतः आणलेलं धान्य किती दिवस पुरेल? याचे टेन्शन. इथल्या शिक्षकांनी तांदूळ, तेल, बिस्कीटपुडे असं बरंच काही दिलं. शिवाय मळ्यातल्या मालकाने तांदुळाची गोणी, भाजी असे साहित्य दिले. मळ्याच्याच समोरच्या शेतकऱ्याने कॅरेटभरून शिमला मिरची दिली. या सगळ्यांनी जी काही मदत केली त्यात कोठेही मोठेपणा येऊ दिला नाही. जी मदत करायची ती करून आले. माझ्या घरातल्या खिडकीतून हे सारे दृश्य दिसते. शिक्षकवर्ग मदत करत असताना त्यांच्या नकळत एक फोटो घेतला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी आणखी मदत देऊ केली.
![]() |
| जि.प. शाळेच्या शिक्षकांनी केलेली मदत |
आमच्या कंपनीतील सहकारी पण आले त्यांनीही मदत केली. थोडी थोडी मदत करून या लोकांकडे बरंच काही जमलं आहे. कोरोनासारख्या रोगाने देशात थैमान घातलं आहे आणि अशावेळी या व्यक्तींना वेगळ्यात टाकण्यापेक्षा तुम्ही आमच्यातलेच आहात काही लागलं तर जरूर सांगा अशी हक्काची साथ मिळाली की त्यांनाही खूप समाधान मिळतं. एकटेपणाची जाणीव होत नाही. मळ्याचा मालक, समोरचा शेतकरी, मराठी शाळांतील शिक्षकवर्ग, माझे सहकारी या सगळ्यांविषयी मनात एक वेगळे बंधन निर्माण झाले आहे.
(हे सगळं समोर घडलं म्हणून लिहिले. अशाच प्रकारच्या मदत भारतभर सुरू आहेत. माझ्या नजरेत आलेल्या या मदतीच्या कहाण्या 'जागरूक समाज' या सदरेखाली मांडण्याचा प्रयत्न करेल.)
- शैलेश दिनकर पाटील




खुप छान ������
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवाडोळ्यासमोर घडणाऱ्या किती तरी गोष्टी असतात. पण सगळ्यांच लक्ष जातच अस नाही. काहींच लक्ष जाऊनही ते दुर्लक्ष करतात. पण तुम्ही नुसत लक्षच देत आहात अस नाही तर पुढे येऊन प्रत्यक्ष काम देखील करत आहात. आणि अप्रतिम शब्दात व्यक्त देखील केल आहे. ����
उत्तर द्याहटवाप्रणवराव धन्यवाद
हटवाछान ...
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा