अनेक महिलांना उद्योगात सक्षम बनविणारी उद्योगवर्धिनी संस्था

देशभर कोरोना महामारीचे संकट कोसळले असताना अशा परिस्थितीत मैदानी पातळीवर काम करणे म्हणजे जरा जिकरीचेच. सोलापूरच्या उद्योगवर्धिनी संस्थेविषयी ०८ मार्चला ब्लॉगवर लेख लिहिला होता. लॉकडाऊन दरम्यान उद्योगवर्धिनीकडून बरीच कामे झाली. मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसांची अवस्था बिकट झाली होती. एप्रिल-मे दरम्यान रुग्णांची संख्या वाढतच होती. बाहेरचे खाणे बंद. मग अशा परिस्थितीत जेवणाचे हालच. उद्योगवर्धिनीच्या अन्नपूर्णाची सगळी टीम सज्ज झाली. कोरोना महामारीत योग्य ती काळजी घेऊन सगळ्या महिला कामाला लागल्या. रूग्णालयात दाखल केलेले कोरोना रुग्ण, कोरान्टाईन व्यक्ती, डॉक्टर, नर्स अशा व्यक्तींना जेवणाचे डबे पोहचवण्याचे काम सुरू झाले. सोलापूर येथील अश्विनी आणि सिव्हिल हॉस्पिटल, समर्थ बँक येथे तीनशे ते चारशे जेवणाचे डबे दररोज(लॉकडाऊन असेपर्यंत) पोहचत होते. तसेच रोटरी क्लब आणि रोटी बँकच्या माध्यमातून सातशे ते आठशे डबे पोहचत होते. जेवण बनवण्याचे काम उद्योगवर्धिनीकडेच होते.

महाराष्ट्रात राहणाऱ्या परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी जाता यावे म्हणून लॉकडाऊन दरम्यान काही ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. रेल्वे कँटीन फेरीवाले बंद असल्यामुळे प्रवाशांचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून उद्योजक केतन व्होरा यांचा मुलगा रोहन व्होरा आणि पुतण्या चिंतन व्होरा यांनी प्रवाशांच्या जेवणाची सोय केली. प्रवाशांसाठी जेवण बनवण्याचे काम व्होरा यांनी उद्योगवर्धिनीकडे सोपवले होते. दोन हजारपेक्षा अधिक लोकांपर्यंत त्यांनी जेवण पोहचवलं. अनलॉक सुरू झाल्यावर सगळं हळूहळू पूर्वपदावर येत होतं तोवर पुन्हा रुग्णांची संख्या वाढायला लागली. सोलापूर येथे पुन्हा १६ ते २६ जुलै रोजी लॉकडाऊनची घोषणा केल्यावर उद्योगवर्धिनीने पुन्हा जोशाने कामाला सुरुवात केली. उद्योजक केतन व्होरा यांच्या मदतीने गरजू आणि बेघर लोकांसाठी अन्न वाटपाचे काम हाती घेतले. चार दिवसांत दोन ते तीन हजार लोकांना अन्न वाटप केले. या कामासाठी आस्था रोटी बँक, संभव फाउंडेशन, सुहास कदम त्यांची टीम आणि जनाधार फाउंडेशन यांनीदेखील सहकार्य केले. कोरोना काळात उद्योगवर्धिनी काय काम करत आहेत हे उधृक्त केले आहे. ही संस्था नेमकं काय करते? त्यांच्या कामाची सुरुवात कशी झाली ते सविस्तर पुढे दिलेच आहे.

लॉकडाऊनच्या दरम्यान जेवण वाटप करताना.

आमच्या कार्यालयातले सेक्शन इंचार्ज माडे साहेब यांच्या लग्नानिमित्त सोलापूरला जाणे झाले होते. इतक्या दूर जाणार आहे म्हणजे एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तीची भेट घेणे ठरलेले असते. सृजन यात्रेदरम्यान परिचय झालेले मयांक चौहान यांची सोलापुरात भेट घेतली. सेवायोग संस्थेने आयोजित केलेल्या २०१८ च्या सृजन यात्रेत आमची पहिली भेट झाली होती. त्यांच्या उद्योगवर्धिनीबद्दल तेव्हापासून ऐकून होतो. या भेटीत मात्र त्यांच्या संस्थेची कामं पहायला मिळणार होती. सोलापूरला पोहोचल्यावर ते घ्यायला आले. सोलापूरच्या दत्त चौकातील शुभराय मठात घेऊन गेले. या मठाचे मठाधिपती शुभांगी बुवा आहेत. मठाच्या जागेतच उद्योवर्धिनीचे काम सुरू असते. दुपारच्या वेळी गेलो असल्यामुळे किचनचे काम आटोपले होते. उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिकाताई चौहान यांना भेटलो. आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेत होतो. १९९३ सालापासून उद्योगवर्धिनीचे काम सुरू झाले. पण संस्थेची नोंदणी २००४ साली केली. आठ-दहा मैत्रिणींनी एकत्र येऊन एक छोटेखानी काम सुरू केले होते आणि पाहता पाहता आज त्याचा पसारा फारच मोठा झाला आहे. उद्योगवर्धिनी हे नाव उद्योगाशी जरी जोडलेले असले तरी इथला मूळ उद्देश उद्योगिनी निर्माण करणे हाच आहे. संस्थेने सामाजिक जाणिवेतून काही उपक्रम सुरू केले आहेत. आपल्या येथे कार्यरत असलेल्या व्यक्तींची काळजी अगदी उत्तमपणे त्यांनी हाताळली आहे. अन्नपूर्णा, टेलरिंग आणि पाखर संकुल अशी बरीच कामे येथे चालतात. बचत गटांना मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्या-त्या कामाशी जोडले जाते. उदाहरणार्थ एखादे बचत गट असेल जे शेंगांची चटणी बनवणारे असतील तर त्यांना फक्त तेच बनवायला लावायचे आणि मग ऑर्डर नुसार त्यांच्याकडे कामे येत राहतील. आतापर्यंत उद्योगवर्धिनीने जवळपास दहा हजार बचतगटांना प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या दिशेने नेले आहे. इथल्या स्त्रीने बाहेर कामाला जाण्यापेक्षा आहे त्याच ठिकाणी स्वतःचे काहीतरी सुरू करून सक्षम बनवण्याचे काम उद्योगवर्धिनीकडून सुरू आहे. उद्योगवर्धिनीच्या सल्लागार अपर्णाताई रामतीर्थकर आहेत.

शुभांगी बुवा, अपर्णाताई रामतीर्थकर आणि चंद्रिकाताई चौहान

संस्थेत दुपारी आल्यामुळे अन्नपूर्णा विभागाने बनवलेले छानसे जेवण जेवता आले. जेवण आटोपल्यावर दादांनी अन्नपूर्णाच्या कामाविषयी सांगितले. अन्नपूर्णा विभागात प्रामुख्याने दोन योजना कार्यरत आहेत. पहिली म्हणजे अन्नपूर्णा योजना आणि दुसरी सरस्वती योजना. रोटरी क्लबच्या सहकार्याने ना नफा ना तोटा तत्वावर या योजनेचे काम चालते. अन्नपूर्णा योजनेत शंभर वृद्धांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. मठाच्या जवळपासच्या परिसरातील गरजू वृद्धांसाठी दोन वेळचे जेवणाचे डबे तयार असतात. बाकी जे सोलापूरच्या दूरवर भागात आहे अशांना घरपोच डबे दिले जाते. संस्थेने दोन रिक्षा कायम ठरवलेल्या आहेत त्या रिक्षा सकाळी डबे पोहोचवण्याच्या वेळेत येतात. डबे पोहोचवून दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या भाज्या हे सगळं साहित्य घेईपर्यंत रिक्षा सोबतच असतात. रिक्षाचालक स्वतःचा जितका वेळ देतात त्यांना त्याचे मानधन मिळत असते. सरस्वती योजनेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य पोळीभाजी देण्याची जबाबदारीही यांच्याकडे आहे. जैन समाजाकडून भुकेल्यांना गरम पोळीभाजी देण्याचे काम जैन रोटीघरच्या माध्यमातून चालते. जैन समाजाने हे काम २०१२ साली उद्योगवर्धिनीकडे सोपवले. संस्थेच्या कामाची पद्धत आणि व्यवहार पाहता इथले कामही वाढू लागले आहे. शालेय पोषण आहारातून चार शाळांना(जवळपास दोन हजार विद्यार्थी) त्यांच्या नियोजित वेळेत पोषण आहार पोहोचवला जातो. या सगळ्या कामांमुळे अन्नपूर्णा विभागाला बाहेरून जेवण बनवण्याच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. जसजसे ऑर्डर मिळू लागले तसतसे काही बचतगटांना जोडून त्यांना प्रशिक्षण देऊन योग्य ती कामे त्यांच्याकडे सोपवली जातात. दादा सांगतात, दिवाळीच्या दोन महिन्याआधी आम्हाला किचनची जागा वाढवावी लागते. कारण दरवर्षी संस्थेकडे फराळाची मागणी खूप असते. जसजशा ऑर्डर येतात तसतसे पदार्थ बनवले जातात. या व्यतिरिक्त भाजणीची चकली, धपाटे, ज्वारीची कडक भाकरी(नव्वद दिवस टिकेल अशी), शेंगांची चटणी, काळा मसाला, तांदूळ पापड, कुरडई, शेवया, सांडगे, भरली मिरची, राजगिरा लाडू, शेंगांच्या पोळ्या, तिळगुळ हे सारे पदार्थ बनवले जाते. त्यांच्या स्टोरमध्ये हे सारे पदार्थ पहायला मिळाले. किचनमध्ये काम करणाऱ्या ताईंशी परिचय करून दिला. किचनमधील वातावरण अगदी मनमोकळं. दुसऱ्या दिवशीचा किंवा पुढील आठवड्याचा जेवणाचा पदार्थ काय आहे याची यादी तेथे लावलेली असते. आणि प्रत्येक महिलेने ज्याचे त्याचे काम वाटून घेतलेले आहे. त्यामुळे कामाचा फारसा ताण येत नाही. एखाद्या महिलेला काही कारणास्तव यायला जमले नाही तर तिच्याऐवजी दुसऱ्या महिलेला काम करावे लागते. पण अधिक काम केल्यामुळे त्या महिलेला अधिक भत्ताही मिळतो. किराणा सामान, भाजीपाला आणण्यासाठी त्यांचे दुकानदार ठरलेले आहेत. चपात्या बनवण्यासाठी लागणारे पीठ बाहेरून न घेता काही बचतगटांना गिरणी कर्जावर घेऊन त्यांच्याचकडे गहू दळायला देणे. याने दोन्हीही कामे साध्य झाली पिठही मिळाले आणि महिलेला-बचतगटाला उद्योगही मिळाला. असे एक-एक उद्योगिनी या संस्थेकडून सक्षम बनत आहे.

उद्योगवर्धिनीच्या लातूर केंद्रात भाकरीचे प्रशिक्षण देताना

किचनमध्ये बराच वेळ दिल्यानंतर आम्ही टेलरिंग विभागाकडे गेलो. तिथल्या महिलांचा परिचय दादांनी करून दिला. महिलांनी शिवलेले विविध प्रकारचे ब्लाउज, ड्रेस, कापडी पिशव्या, रजई आणि गोधड्या हे सारे पाहिले. इथल्या महिलांना टेलरिंगविषयी बेसिक प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंगचे तंत्र समजावून सांगितले जाते. त्यानुसार इथेही बाहेरून जशा ऑर्डर येतील तसे त्यांचे काम सुरू होते. २०१८ च्या सृजन यात्रेची बॅग बनवण्याचे काम उद्योगवर्धिनीलाच देण्यात आले होते. काही कापडी पिशव्या आणि पर्स त्यांनी दाखवल्या. वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन करून बनवलेल्या त्या पर्स अगदी आकर्षक दिसत होत्या. सोलापूरला नॅपकिन बुके देण्याची पद्धत प्रसिद्ध आहे असे समजले त्याचेही काम इथे चालते. नॅपकिन बुके बनवून विक्रीसाठी बाहेर पाठवले जाते. शिलाई प्रशिक्षणामुळे हजारोंपेक्षा अधिक महिला-मुली आत्मनिर्भर झाल्या आहेत. प्रशिक्षण घेतल्यानंतर, टेलरिंगचा परवाना कसा काढायचा?, त्याचे उत्पादन कसे वाढवायचे?, विक्री कौशल्य यासाठी उद्योगवर्धिनी मार्गदर्शन करत असते. त्यांनी तयार केलेल्या रजईची माहिती त्या ताई सांगत होत्या. त्यांनी रजईची गॅरंटीही दिली. बाहेरील सेल्समनलाही फिके पाडतील अशा महिला इथे तयार झालेल्या आहेत. इथल्या महिला किती आपुलकीने आणि मन लावून काम करत असतील याची प्रचिती दिसून येते.

टेलरिंग विभाग

टेलरिंगचे काम पाहून झाल्यावर वरच्या मजल्यावर गेलो तेथे शंकर महाराज समूहाचे पाखर संकुल आहे. या पाखर संकुलाचे सचिव शुभांगी बुवा आहेत. एक दिवसांपासून ते सहा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींचा सांभाळ येथे होतो. मुलगी/मुलगा नकोय म्हणून रस्त्यावर टाकून देणे किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकून देणे, स्टेशनवर कुठेतरी सोडून देणे अशी जी मुलं आहेत अशांचा सांभाळ या संकुलात होतो. एकूण सोळा मुलं-मुली या संकुलात आहेत. संकुलात गेल्यावर अगदी शांत वाटत होतं. आत गेल्यागेल्या एक छोटी मुलगी दिसली. अपंग होती. आता हे व्यंगत्व आलंय म्हणून पालकांनी तिला रस्त्यावर सोडून दिलेलं. अशा पालकांच्या मनस्थितीबद्दल काय बोलावे समजेना. दोन-तीन बालकं झोपले होते. थोडं पुढे गेलो चार-पाच लहान मुलं-मुली मस्त खेळत होते. त्यातली एक चिमुकली माझ्याकडे पाहून हसत होती. प्रत्येक बालकांसाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत. सहा महिने ते दीड वर्ष असलेल्या बालकांच्या खोलीत गेलो. ते लहान मूल वर्षभराचं असेल बसायला होत नाही पण प्रयत्न करत होता. त्याला अगदी अलगद उचलले. रडण्याचा जराही आवाज नाही. तिथे एक ताई लहान बाळाला बाटलीने दूध पाजत होत्या. तो बाळ साधारण महिनाभराचा असेल. अगदी शांतपणे दूध पीत होता. या सोळा मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी एकूण सतरा महिला आहेत. अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावतांना दिसत होते. प्रत्येक मुलाची आरोग्य चाचणी केली जाते. आजारी असेल तर औषधोपचार केले जाते. संकुल अगदी स्वच्छ दिसत होते. कोठेही घाण नाही. या सगळ्या मुलांसाठी एक विशेष किचन आहे. किचनमध्ये स्वच्छताही दिसत होती. आठवडाभराचे मुलांसाठी लागणारे जेवण याची यादी तेथे लावलेली असते. जेवण बनवून झाले की स्वतः चाखूनच मुलांना ते द्यायचे. आणि प्रत्येक मुलामुलींना अगदी ताजेच जेवण मिळणार. या मुलामुलींचे नाव ठेवताना पण छान पद्धतीने ठेवले जाते. एखाद्या ताईला जे नाव आवडले ते ठेवले जाते किंवा मग एकमताने नाव ठेवले जाते. त्यांनी एक प्रसंग सांगितला. त्यांना एक मुलगी नवमीच्या दिवशी भेटली त्यामुळे तिचे नाव नवमी ठेवले. संकुलात एक फलक आहे त्या फलकावर प्रत्येक मुला-मुलीचे नाव, वजन आणि त्यांना सांभाळणारी ताई असे तक्ते आखले आहेत. सकाळ-संध्याकाळ प्रत्येकाकडे लक्ष ठेवतात. आठवड्याला वजनही करतात. संकुलातील मुलांना दत्तकही दिले जाते. दत्तक हा जो मार्ग आहे अगदी कायदेशीर रित्या होतो. तिथला सगळा कारभार ऑनलाईन आहे. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला चांगल्यापैकी पारखूनच दिले जाते. मुलाला/मुलीला दत्तक दिल्यानंतरदेखील संस्थेकडून कायदेशीर रित्या फॉलोअप सुरू असतो. त्यामुळे फार अशा मोठ्या अडचणी येत नाहीत. ही सगळी लहान पाखरं त्यांना माया देणाऱ्या या संकुलातील ताई यांचे नाते पाहिले. ही मुलं दत्तक गेल्यावर त्या ताईंची अवस्था काय होत असेल हे शब्दांत सांगणे कठीण आहे.

संकुलातून बाहेर पडल्यावर आम्ही पुन्हा अन्नपूर्णा विभागाकडे आलो. दादांनी काकूंना कॉफी करायला सांगितली. कॉफीचे घोट घेता घेता आमची चर्चा पुन्हा सुरू झाली. आता या सगळ्या महिलांचे आणि उद्योगवर्धिनीचे चांगले ऋणानुबंध आहेत. या महिला इतकं काही करत आहेत. मग या महिलांच्या कुटुंबातील अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी महिन्याला काही ठराविक शिष्यवृत्ती दिली जाते. वेळप्रसंगी आर्थिक सहाय्यही करतात. कोणाचं आजारपण असेल किंवा लग्नकार्य असेल तर तिथेही थोडा हातभार लावत असतात. येथे काम करणाऱ्या महिलांच्या मुलामुलींना मठात दर शनिवार-रविवार चित्रकला, हस्तकला, संगणक, टेक्निकली असे विविध विषय मोफत शिकवले जातात. उद्योगवर्धिनीने काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही केले आहेत. लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांत पहिली चार वर्षे यांनी एकूण एक लाख चपात्या बनविल्या. समाजाच्या सहकार्याने दरवर्षी पाचशे ते सातशे भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली आहे. इथल्या प्रत्येक महिलेची कामाची जिद्द, आपुलकी पाहता विशेष वाटत होते.

- शैलेश दिनकर पाटील
९६७३५७३१४८

टिप्पण्या

  1. धन्यवाद शैलेशजी तुमच्यामुळे आम्हाला उद्योगवर्धिनी संस्थेच्या कार्याचा परिचय तर झालाच पण पदार्थांच्या चित्रदर्शी वर्णनामुळे तोंडाला पाणीही सुटले.
    असेच लिहिते रहा. अनेक अनेक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. शैलेश, सुंदर !! संस्थेच्या कामाचा आढावा देताना तू इतर बारीक सारीक गोष्टी कल्पकतेने नमूद केल्या आहेस. खूप शुभेच्छा !!

    उत्तर द्याहटवा
  3. लेख संपू नये असं वाटत होतं...क्या बात है.... उत्तम 👌

    उत्तर द्याहटवा
  4. Khup chan.. tumhi ase khup kahi karya karta..ani tumche lekh khup chan astat tumche lekh vachtana amhi pratyksh tithe ahot asa vatate

    उत्तर द्याहटवा
  5. फार अप्रतिम लेख.. संस्थेचे कार्य अतिशय विस्तृतपणे नमूद केले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"