माणुसकी जपणारी मानवता
२०१८ ची घटना पुण्यातल्या वारजे येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागलेली या आगीत अनेक घरे जळाली. त्यांना मदत म्हणून पुण्याच्या एका मित्राने फेसबुकवर मदतीसाठी आवाहन केले होते. त्याची पोस्ट मी फेसबुक आणि व्हाट्सअपवर पोस्ट शेअर केली. समोरून निलेश बच्छाव या अनोळखी व्यक्तीचा लगेच रिप्ले आला. काय काय मदत लागेल ते कळवा. मदतीसाठीचं लागणारं साहित्य त्याला कळवलं आणि अगदी एका दिवसांत त्याने खूप सारे चांगल्या स्थितीत असलेले कपडे, अंथरून पद्धतशीर घड्या घालून जमा केले. आणि माझा मित्र परमेश्वर घोडके करवी पुण्याला पाठवले. या कामांतून निलेशशी ओळख झाली. फेसबुकवर त्याच्या पोस्ट पाहिल्या. रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींसाठी जेवण पोहचवणे, त्यांना दवाखान्यात नेऊन योग्य तो उपचार करवून घेणे. अशी कामे तो आणि त्याचे मित्र कुशल, साई करत असतात. निलेश आणि कुशलबरोबर फोनवर सविस्तर बोलून त्यांच्या कामाविषयीची माहिती घेतली. हे तिघेही साईबाबांचे भक्त. राहायला उल्हासनगरमध्ये. दर गुरुवारी न चुकता साईबाबांच्या मंदिरात आरतीला जातात.
२०१७ चा प्रसंग त्यांनी सांगितला. त्या मंदिरात दर गुरुवारी प्रसाद घ्यायला एक अपंग माणूस यायचा. त्याला घरी सोडणे आणि जेवण देणे या कामाचा कुशलने विडाच उचलला होता. कधी कधी कामामुळे कुशलला वेळ नाही मिळायचा तर ते काम निलेश करायचा. हे सतत दोन महिने सुरू होतं. त्या दोघांनी ठरवलं आपण हे जे करतोय ते एका व्यक्तिपूरता मर्यादित न राहता जर सगळ्यांसाठी मदत केली तर? कसे करायचे काय करता येईल हा सगळा विचार सुरूच होता. साधारण एक वर्षभर या दोघांनी दर गुरुवारी येणाऱ्या त्या अपंग माणसाची सेवा केली. त्यांनतर अंबरनाथ स्टेशनवरील एका आजीची मदत केली. दुर्दैवाने कॅन्सरमुळे आजींचे निधन झाले. पण या दोघांनी त्या आजींची सहा महिने सेवा केली. उल्हासनगर स्टेशनवर एक अपंग महिला भीक मागत होती तिला मदत केली. रूम भाड्याला लागणारे पैसे आणि जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. अशा व्यक्तींना शोधून काढणे हे मोठे काम या दोघांसमोर असते. कामावरून माघारी आले की स्टेशनवरून येता-जाता अशा व्यक्तीच्या हालचाली पहायच्या. अगदी बिकट परिस्थिती दिसली की काही दिवस त्यांचा पाठलाग करायचा. ते राहतात कोठे? करतात काय? घरची परिस्थिती कशी? नेमकी समस्या काय आहे? हे काम त्यांच्या नकळत करावी लागतात. असे करत करत या तीन माणसांपासून यांनी सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी शेकडो माणसांची सेवा केली आहे. रस्त्यावरील एखादा व्यक्ती जखमी अवस्थेत आढळला तर त्याच्या पायावरील जखम साफ करणे आणि त्यानंतर त्यांना आंघोळ घालून तयार करणे ही सारी कामे हे तिघे करत असतात. तिघांनी आपापली कामे वाटून घेतली आहेत. जखम स्वच्छ करण्याचे काम साई, ड्रेसिंगचे काम निलेश आणि त्यांना आंघोळ घालण्याचे काम कुशल करतो. कधी कधी त्यांना दवाखान्यातही घेऊन जावे लागते. मग तिकडे सुद्धा हे तिघेही स्वतःच्या जबाबदारीवर त्या व्यक्तीची काळजी घेत असतात. आळीपाळीने हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करत असतात.
डोंबिवलीच्या जाणीव आश्रमात दोघांची ओळख असल्यामुळे कधी बेवारस वृद्ध व्यक्ती दिसली की त्यांना त्या वृद्धाश्रमात नेतात. तिकडे काऊन्सलिंग करून त्यांच्या घरची माहिती घेतात. घरची माहिती मिळाल्यावर ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामागील हेतू एकच जेणेकरून घरचा पत्ता किंवा संबंधित व्यक्ती संपर्क करेल. बऱ्याचदा त्यांना यासंबंधी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो. पण कधी कधी काही व्यक्ती त्रास देतात मग यांना पोलिसांचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या बेवारस व्यक्तीची तब्येत अगदीच खालावली असेल तर त्यांना दवाखान्यात घेऊन जातात तिथे सगळी जबाबदारी हे दोघे घेतात. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काही अडचण आली की त्यांना जाणीव वृद्धाश्रमचे मनोज पांचाळ मदत करत असतात.
कुशल आणि निलेशला एक सवय होती. लग्नसमारंभ सुरू झालं की घरातलं जेवण टाळायचं. घराबाहेर कोठेही लग्न, वाढदिवस, मुंज असे काहीही कार्यक्रम असले तर तिकडे विना आमंत्रण जेवायला जायचे. एकदा एका लग्नात त्यांचा अपमान झाला. अनोळखी आहेत म्हणून त्यांना बोलणं ऐकायला लागलं होतं. पण तरीही त्यांनी तेथले जेवण सोडले नाही मनसोक्तपणे जेवले. संपूर्ण समारंभ संपेपर्यंत तिथल्या लोकांची गंमत पाहत तेथेच थांबले होते. जेवण झाले की ताटातले उरलेले जेवण तसेच कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. जेवणाची पंगत आणि कॅटरस वाल्यांचे जेवण झाल्यानंतरही जेवण उरले. ते जेवण त्यांनी फेकून दिले. हे या दोघांच्या नजरेत आले त्यांना ते सहन झाले नाही. ज्या व्यक्तीने अपमान केला त्याला बोलावून ह्या दोघांनी समजावून सांगितले. तुम्ही फेकलेल्या जेवणात भुकेलेली किमान शंभर माणसं तरी जेवली असती. त्या माणसाची आणि या दोघांची थोडी बाचाबाची झाली. फेकून दिले गेलेल्या अन्नाचे दोघांना वाईट वाटले. त्यांना तिथेच एक युक्ती सुचली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले. लग्न, जन्मदिवस समारंभात अन्न उरले असेल तर ते फेकून न देता आमच्याकडे द्या आम्ही ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवू. अशा पोस्ट बनवून त्या सोशल मीडियावर शेअर केल्या. महिनाभर काही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सतत पोस्ट शेअर करण्याचे काम सुरूच होते. जून २०१८ मध्ये त्यांना उल्हासनगरमधून चिंतामण अहिरे यांचा फोन आला. उरलेले जेवण देण्यासाठी तेे तयार होते. निलेश आणि कुशल दोघेही ते जेवण घ्यायला गेले. तेथून जेवण घेतले आणि अंबरनाथच्या गरजू लोकवस्तीतील अगदी गरीब कुटुंबांना वाटले. सुरवातीला तीन महिन्यातून फक्त तीन फोन आले. त्यांनंतर हळूहळू फोन वाढू लागले लोकांचा विश्वास बसायला लागला. यावेळी त्यांनी फुटपाथवर राहणाऱ्या लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा विचार केला. एका समारंभातील उरलेले जेवण ते घेऊन गेले आणि फुटपाथवरील लोकांना दिले. पण त्या लोकांनी जेवणासाठी मागे पुढे केले. तुम्ही कोण? आम्हाला ओळखत नाही मग जेवण कशाला देता? असे अनेक प्रश्न त्यांनी केले. या दोघांनी बरच काही समजावलं त्यांना विश्वासात घेतले. त्यांच्यासोबत हे दोघेही मांडी घालून जेवायला बसले. त्या लोकांना हे सगळं विश्वासार्ह वाटू लागले. त्यांनी भरपेट जेवण केलं. कोणी काय जेवण दिले, कधी दिले, आणि त्याचे वाटप कोणत्या ठिकाणी केले याची सगळी नोंद या दोघांनी करून ठेवली आहे. डिसेंबर २०१९ चा आकडा पाहता आतापर्यंत एकशे सत्तर लोकांनी जेवण पुरवले आहे. बदलापूर ते डोंबिवली या भागातील रस्त्यावर राहणाऱ्या लोकांपर्यंत जेवण पोहचवले आहे. जेवण दिलेल्या व्यक्तीचे आभार सोशल मीडियावर करतात. सुरवातीला एक दोन ठिकाणी जेवणाला घेऊन गेल्यानंतर बराच अनुभव यांच्या गाठीशी पडला. जेव्हा कधी जेवणासाठी त्यांना फोन येतो तेव्हा त्यांच्याकडे प्लास्टिकचे जेवणाचे ताट, वाट्या, प्लेट आणि ग्लास हे सगळं तयारच असतं. समजा कधी डोंबिवलीला जेवण मिळालं तर मग डोंबिवली येथील रस्त्यावरील लोकांना जेवण देतील. असे एक एक करत स्टेशनजवळील परिसर या दोघांनी पिंजून काढला आहे. उल्हासनगरमधील पाच-सहा जागा त्यांच्या ठरलेल्या आहेत. त्यांच्या जेवणासंबंधीच्या पोस्ट फेसबुकवर चांगल्यापैकी व्हायरल झाल्या. या उपक्रमासाठी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डोंबिवलीत राहणारे चेतन भोईर यांच्याकडून दर महिन्याच्या पौर्णिमेला शंभर व्यक्तींचे जेवण बनवून मिळते. मागच्याच आठवड्याची घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी चेतन भोईर यांच्याकडे जेवण आणायला गेले होते आणि त्याच दरम्यान त्यांना रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात झालेला दिसला. तो तरुण बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्या तरुणाभोवती माणसांची गर्दी होती पण कोणी काही करायला धजावेना इतक्यात निलेश आणि त्याचा मित्र तिथे पोहोचला आणि त्या मुलावर प्राथमिक उपचार करायला सुरवात केली. त्याची जखम साफ करून मलमपट्टी केली. या सगळ्या कामांतून मानवतेचा अर्थबोध होतो.
जसजसे काम वाढत आहे तसतसे इतर ठिकाणाचे तरुण-तरुणी त्यांना जोडले गेले. हे सारे काम एक विशेष नावाखाली सुरू राहावे म्हणून सर्वांच्या संगनमताने 'मानवता' नाव ठेऊन त्या नावाने कामाला सुरवात केली. त्यांच्या टीममधल्या पाच-सहा जणांच्या गाडीवर मानवता नावाने स्टिकर्स लावलेले आहेत आणि या पाच जणांच्या मोबाईल रिंगटोनही जवळपास सारख्याच आहेत. मानवता टीमचाच आदर्श घेऊन पुण्याच्या लोणी गावात रवी डोंगरे आणि उस्मानाबाद येथील इंद्रजित गायकवाड यांच्या प्रतिक्षालय फाउंडेशनने त्यांच्या त्यांच्या भागात रस्त्यावरील निराधार व्यक्तींसाठी काम सुरू केले आहे. मानवतातर्फे यावर्षी रक्तदान शिबिरचेही आयोजन केले होते. मानवता टीम शहापुरच्या टेम्भा गावातील एका पाड्यात नवीन कपडे, दिवाळी साहित्य वाटप करत असतात. पाड्यात आरोग्यविषयी काही अडचण आली की त्याचीही व्यवस्था हे पाहतात. एक एक पाडा घेऊन त्यांना पूर्ण गाव कव्हर करायचे आहे. निलेश आणि कुशल अगदी सर्वसामान्य कुटुंबातले. त्या दोघांनी स्वतःला या कार्यात मनापासून वाहून घेतले आहे. निलेशला घरचे बोल त्याला सतत ऐकावे लागतात तो एकच सांगत असतो मोठा भाऊ आहे तो घरासाठी आणि मी आहे तो समाजासाठी असं त्याचं सतत म्हणणं असतं. त्याचा आयटीआय झालेला आहे. आणि एका कंपनीत नोकरीला आहे. कुशलने इंजिनिअरिंग केली आहे. तो मेट्रो रेल को-ऑपरेशन येथे नोकरीला आहे. माणसाला माणूसच वाचवू शकतो हेच डोक्यात ठेऊन माणुसकी जपुयात मानवता धर्म टिकवूयात असे सतत जनमाणसांत हे सांगत असतात.
- शैलेश दिनकर पाटील
मानव म्हणजे ऊर्जा आणि मानवता म्हणजे तिचे मूर्त स्वरूप..��������
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवानिलेश बच्छाव ला गेल्या दहा वर्षांपासून ओळ्खतोय.एकत्र शिक्षण आणि पुढे दोन वर्ष सोबत एका कंपनीत काम सुद्धा केलं. हा आमचा 'बच्छा' मित्र आहे याचा खरंच अभिमान वाटतो...त्याच प्रत्येक काम हे दिखाऊ नसून प्रामाणिक आहे.
उत्तर द्याहटवासमाजाबद्दल असलेली जाण तर त्याला आहेच पण तो कष्टाळू देखील आहे.
पहाटे उल्हासनगर वरून ३.५५ ची लोकल पकडून दादर वाया कांदिवली असा रोजचा प्रवास ( दोन वर्षे Apprenticeship ) त्याने केला एवढंच नाही तर आवड म्हणूया नाही तर आणखी काही. हे सर्व करून घरी आल्यानंतर गणपती तयार करण्याचा कार्यशाळेत मूर्ती घडविण्याच काम ही तो करायचा..
एक भारतीय नागरिक म्हणून तो ग्रेट आहेच पण मुलगा म्हणून बच्छा ग्रेटच ठरतो...
अक्षय, खरंय रोखठोक भूमिका मांडणारा. माणसाच्या सेवेसाठी तत्परतेने धावणारा.
हटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
स्तुत्य!!!
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हटवाअतिशय उत्तम कार्य.
उत्तर द्याहटवा'मानवता' या चमूचं आणि अशा समाजहितैषी माणसांची ओळख करून देणाऱ्या शैलेश पाटील यांचंही
खुपच छान!अशी उदाहरणे पुढे आली पाहिजे म्हणजे लोक त्यांचा आदर्श घेतील.
उत्तर द्याहटवाहोय अगदी खरंय. अशाच व्यक्तींना पुढे आणण्याचा एक प्रयत्न.
उत्तर द्याहटवाहा लेख वाचून त्यांच्या कार्याला फक्त सलाम करावासा वाटतो. शैलेशराव धन्यवाद अशा लोकांची माहिती पुरवल्या बद्दल!!!
उत्तर द्याहटवाप्रणवराव खूप खूप धन्यवाद
हटवा