कुंभार्ली घाटातली वाघबारस

वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या. 

पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले.


वाघबारस दिनी पाड्यातली माणसं.

गावच्या आणि जंगलाच्या वेशिवर एक मोठा दगड आहे. त्या दगडावर खडुने वाघाचं चित्र काढलं जातं. आणि त्या वाघाची पूजा केली जाते. गावातल्या मोकळ्या मैदानात गावातील मंडळी मुलांना शेपटवणार(हाकलवणे) ही मुलं वेशिवर जाऊन पुन्हा गावात येणार. आणि मग घरोघरी नैवद्य मागणार. प्रत्येकाचा दरवाजा ठोठावताना ते म्हणतात, 'वाघ आला वाघ... खीर द्या, तांदूळ द्या, दूध द्या, खोबऱ्याची वाटी द्या... आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार'.... मग समोरची व्यक्ती म्हणते, 'आमचं रक्षण कर आम्ही तुला त्रास देणारं नाही तुही आम्हाला त्रास देऊ नको.' असे संवाद घडत असतात.
गाव आणि जंगलाची वेस जेथे वाघाचं चित्र काढून पूजा केली जाते.

गावातली लोकं पण स्वेच्छेने दूध, खीर देतात. त्यानंतर वेशिवर काढलेल्या वाघाच्या चित्राचे पूजन सर्व गावकरी करतात. त्याला नैवद्य म्हणून खीर देतात. शिवाय सर्व गावकरी त्या चित्राकडे बघून बोलतात, की तू आमच्या गावात येऊ नको आम्ही तुला त्रास देणार नाही आणि तू ही आम्हाला त्रास देऊ नको.. हा संवाद जरी असा वाटलं तरी तो माणूस आणि वन्यजीवांबद्दलचा एकोपा दर्शविणारा संवाद वाटतो. या पाड्यातील प्रत्येक माणसाने वाघ, बिबट्या अगदी जवळून पाहिला आहे. पाड्यातील बबन शेळके या गृहस्थांना 'द जंगल मॅन' म्हणून ओळखतात. जंगलात गुरं चरायला नेली असताना तीन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता पण बबन मामा चलाखीने तिथून बाहेर पडले.

संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र आलो. गावातल्या लोकांनी त्यांनी जगलेले जंगलातले अनुभव सांगितले. शिवाय लहान मुलांनी त्यांचेही अनुभव सांगितले. त्यांचे वन्यजीवांविषयीचे किस्से ऐकताना तर आम्ही सर्व थक्क होऊन गेलो. पाड्यातली लहान मुलं कमालीची ऍक्टिव्ह आहेत. रात्रीचा मुक्काम पाड्यावरच झाला.

SCRO चे काम सांगताना राणी प्रभुळकर.

सकाळी आम्ही बर्ड वॉचिंगकरिता सह्याद्रीच्या जंगलात निघालो. पक्ष्यांचा आवाज व त्यांची माहिती देण्याकरिता न्यास संस्थेचे विश्वास भावे सर सोबतीला होते. जंगलातून माघारी आल्यावर आम्ही पाड्यातल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. पाड्यातील लोकांना गरजेच्या वस्तू देण्याकरिता एका संस्थेने त्यांना मदत केली होती. त्या मदतीचे वाटप तसेच वाघबारस करिता सहभागी झालेल्या सदस्यांना SCRO कडून प्रमाणपत्र देण्यात आलं.

SCRO कडून प्रमाणपत्र वाटप.

वाघबारस साजरा करणं आणि सह्याद्री संवर्धन इतकंच काय ते काम मला माहिती होतं पण ज्यावेळी राणी आणि सदफ यांनी SCRO ची माहिती दिली तेव्हा जाणवलं की, हे काम फार मोठे आहे. आणि त्यांनी सर्वस्व पणाला लावलं आहे. राणी आणि सदफ खऱ्या अर्थाने जंगल जगत आहे.

ज्यांना वाघबारसचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी.

२०२४ वाघबारसच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत

• १५-१६-१७ नोव्हेंबर 

• ३० नोव्हेंबर - ०१ डिसेंबर 

• १४-१५ डिसेंबर 

मर्यादित सहभाग असल्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल..

वाघबारसकरिता संपर्क - 9422688402 / 7083335365

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"