पुस्तक परिचय - युद्ध जीवांचे..
पुस्तक - युद्ध जीवांचे
लेखक - गिरीश कुबेर
गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे हाती आलं. आतापर्यंत असं वाटायचं, की शस्त्रविना युद्ध अशक्यच आहे. पण या पुस्तकात रासायनिक हल्ल्यांविषयी जे काही लिहिलं आहे ते फारच भयानक आहे. जगात खूप काही सुरू असतं पण सामान्य माणसांपर्यंत त्याची फारशी माहिती पोचत नाही. जैविक आणि रासायनिक युद्धांचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. विषारी वायूंची निर्मिती करणारे देश आणि त्यांनी त्यांच्या शत्रूराष्ट्रांवर केलेले हल्ले याची संदर्भासहित नोंद पुस्तकात आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू सारख्या विषाणूंची निर्मिती करून त्याच्यावर औषधी बनवून बाजारीकरण करणारे देश स्वतःला महासत्ताक समजतात. या रोगाच्या विषाणूंचा प्रयोग सामान्य माणसावर केला गेला.
हिरोशिमा नागासाकीवर केलेल्या हल्ल्यामुळे आपल्याला जपानवर कीव येते पण जपानही काही साधा भोळा नाही त्याने तर माणुसकीच्या सगळ्या हद्द पार केलेल्या आहेत. त्यांच्यावर अणुहल्ला का करावा लागला याचा तपशील लेखकाने सविस्तर मांडलेला आहे. हिटलर, विस्टन चर्चिल, जॉर्ज बुश, सद्दाम यांच्या दुष्कर्माचा उल्लेख यांत आहे. सद्दामसारख्या नराधमाला मदत करणाऱ्या देशांना त्याच्या कुरापती समजल्यावर त्याला केलेली शिक्षा म्हणजे फाशी.
संभोगातून समाधीचा मार्ग दाखविणारे आचार्य रजनीश यांचं पुण्यातील कोरेगाव पार्क हे एक व्यापाराचं केंद्रच बनलं. पुणेकरांच्या तक्रारीमुळे रजनीश यांना पुणे सोडावं लागलं. पण तेथून गेल्यावर त्यांनी अमेरिका सारख्या ठिकाणी जागा घेऊन स्वतःचं एक गावंच वसवलं. राजकीय दृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांच्या सचिव आनंद शीला यांनी नको ते विषारी वायूंचे प्रयोग केले. चक्क अमेरिकेत विषाणूंची प्रयोगशाळाच उभारली. अमेरिकीने त्यांच्यावर कारवाई करत त्या प्रकरणातून कोणीही प्रेरणा घेऊ नये म्हणून ते तिथेच मिटवून टाकले. विषारी वायूंचा प्रयोग करणाऱ्या देशांनी कैक कोटी विषारी वायू समुद्राच्या उदरात फेकून दिले. सगळं काही सुरळीत असताना कधी कोठे जैविक-रासायनिक हल्ले होतील काही सांगता येत नाही. हे संपूर्ण पुस्तक वाचल्यांनंतर कोरोनासारखा आजार हल्ल्याचा तर प्रकार नाही ना? अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.
- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा