फॅन्ड्री फाउंडेशनचा प्रोजेक्ट होप...

फॅन्ड्री फाउंडेशन 'Project Hope' उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्य आणि इतर उपक्रमांचे आयोजन करते. जून महिन्यात शाळा सुरु झाली की साहित्य वाटपाची तयारी सुरु होते. फॅन्ड्रीच्या कार्यक्रमाची माहिती प्रवीण दाभोळकरांकडून समजली. फॅन्ड्रीच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधून त्यांच्या उपक्रमात सामील झालो.

पालघर जिल्ह्यातील मनोरपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील तांबडीपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटपासाठी गेलो होतो. फॅन्ड्रीची टीम होतीच त्यांच्यासोबत मी आणि कामिनी नव्याने जोडलो गेलो होतो. पाड्यात गेल्यावर शाळा पाहिली. शाळेतील शिक्षक संतोष निमसे सरांनी स्वागत केले. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा. आधी वाटलेलं की गरम व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांना अंगणात बसवलं असेल. पण सरांशी चर्चा केल्यावर समजलं की त्या अंगणातच शाळा भरते. पूर्वी तेथे गोठा होता. आता तो दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या पाड्यात जावे लागायचे. त्यांचा त्रास वाचावा म्हणून तांबडीपाडा येथे शाळेसाठी मान्यता मिळवली. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे पाड्यात कोणाच्या तरी घरी शाळा सुरु करावी लागणार होती. पाड्यात प्रवेश करताना साईनाथ तांबडी यांचे घर लागते. तेथेच शाळा भरण्यास सुरवात झाली. संतोष सर हे प्रयोगशील शिक्षक. विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोचावी हाच त्यांचा उद्देश. संतोष यांच्या मित्राचे मित्र अशोक राऊत आणि अर्पिता राऊत ह्या फॅन्ड्री फाउंडेशनच्या स्वयंसेविका. अन् मग या परिचयाच्या माध्यमातूनच शाळेसाठी मदतीचा ओघ सुरु झाला.

ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून त्या मोकळ्या जागेवर पत्रे बसवण्यात आले. तेथे होणारा संपूर्ण खर्च साईनाथ यांच्या कुटुंबानी केला. साईनाथ यांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती. शाळेकरिता जो काही हातभार लावता येईल तो हातभार हे कुटुंब लावत आहेत. शिवाय शाळेसाठी मिळणारं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंकरितादेखील साईनाथ यांच्या घराचा वापर होतो.

शाळेसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करताना फॅन्ड्री फाउंडेशनने त्या पाड्यातील लोकांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना फूलशेतीकरिता आवाहन केले. परंतु पाड्यातील दोन-तीन कुटुंबानी फुलशेतीसाठी पुढाकार घेतला. विलास तांबडी यांनी या कामाकरिता प्रचंड मेहनत घेतली. फॅन्ड्रीच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण जागा पाहणी करून तेथे मोगरा आणि कागडा रोपांची लागवड करण्यास सांगितली. तेथे त्यांनी शेतीविषयक तज्ञ असलेले विनायक यांची मदत घेतली. फॅन्ड्रीचे स्वयंसेवक अर्पिता राऊत यांनी सतत जागेवर येऊन पाहणी करणे आणि कामांचे नियोजन करणे ही जबाबदारी स्वीकारलेली.

विलास आणि साईनाथ यांच्या शेतात दोन बोअरवेल करण्यात आल्या तसेच तीन हजार मोगरा व दोन हजार कागडा रोपांची लागवड करण्यात आली. तसेच दोन बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली. लागवड करण्याआधी खड्डे खणणे, ठिबक सिंचन, इतर कामं पाड्यातील लोकं आणि फॅन्ड्रीचे स्वयंसेवक सोबत करत होते. फुलशेतीच्या प्रकल्पासाठी एस. बी. आय. जनरल यांच्या सी.एस.आर. अंतर्गत मदत मिळाली. फुलशेती लागवड केल्यानंतर देखील फॅन्ड्रीचे स्वयंसेवक दर महिना-दोन महिने पाड्यात भेट द्यायचे. आणि तेथील कामकाज पाहायचे. लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांच्याच कुटुंबाचा निर्वाह होतो. २०२१ पासून सतत फॉलोअप घेणं त्यासोबतच कामांची पाहणी करणे असं सर्व सुरु असतं. शिवाय हे सर्व पाहताना स्वयंसेवक आणि पाड्यांतील लोकं यांच्यात वेगळीच कौटुंबिक भावना निर्माण होताना दिसून येते.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"