शाळा भेट अन् वाचन संवाद

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी काहीतरी उपक्रम सुरु होते. अमृतमहोत्सवात आपणही काहीतरी योगदान द्यावं म्हणून आमच्या बाराखडी टीमकडून 'शाळा भेट अन् वाचन संवाद' या उपक्रमाची आखणी करण्याचे ठरवले. बाराखडीच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये विविध उपक्रम राबवत असतो. त्यांतील पुस्तकांची शिदोरी' नामक उपक्रम राबवतो. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांना पुस्तकं देऊन त्यांच्याशी त्यावर चर्चा करतो.

जिल्हा परिषद आवारपाडा शाळेत पुस्तकांची शिदोरी उपक्रम.

मी महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे राहतो. तेथून तलासरी तालुका सतरा किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण तलासरी तालुका पायी फिरायचा आणि या तालुक्यात येणाऱ्या निवडक शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी पुस्तक आणि वाचनासंदर्भात संवाद साधायचा असे ठरले. तालुक्याचा विस्तार अंदाजे सत्तर ते नव्वद किलोमीटर असावा. प्रवास कोठून सुरु करायचा आणि थांबा कुठे घ्यायचा त्याचे नियोजन केले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रवास करण्याचे ठरले. आम्ही काम करत असताना जिओलाईफ(Geolife) ऍग्रीटेक नामक कंपनी आमच्या संपर्कात आली त्या कंपनीच्या सामाजिक दायित्वाचा भाग असलेल्या जिओलाईफ युथ क्लबमार्फत दोनशे पुस्तके शाळांसाठी मिळाली होती. ही पुस्तके एका जिल्हा परिषद शाळेत देऊन १५ ऑगस्टला पायी प्रवासाची सांगता करायची होती. या प्रवासात बाराखडी टीमचे सोबती विकास ठाकरे आणि परमेश्वर घोडके जोडले जाणार होते. 

१३ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता प्रवास सुरु केला. पहिल्यांदाच प्रवास करणार होतो म्हणून जरा धाकधूक होती. जर अपूर्ण वगैरे राहिलं तर... पण कोठलेही टार्गेट पूर्ण करायचे आहे असे काही ठरले नव्हते. बाहेरील वातावरण पाहता तसे साहित्य सोबत घेतले. पहिल्या दिवसाचा प्रवास पंचवीस किलोमीटरचा होता. भारतीय ध्वज घेऊन प्रवास सुरु केला. वाटेत भेटणाऱ्या काही माणसांनी ध्वज पाहून 'भारत माता की जय' घोषणा दिल्या. अगदी काही ठराविक अंतरावर कामावरचा सहकारी विजय ढेडिया भेटला. काय सुरु आहे विचारत तुझ्यासोबत एक सेल्फी तर बनतो यार असं म्हणत फोटो घेतला. पुढे आमचे सेक्शन इन्चार्ज माडे सर भेटले. नारायण ठाणे चौकीजवळ दोन पोलीस होते. त्यांनी प्रश्न करण्याआधी पाण्याची बाटली हातात दिली. आपलूकीने विचारणा केली. आणि शुभेच्छा दिल्या. खूप बरं वाटलं. एका शाळेची प्रभातफेरी सुरु होती. त्या वाटेने मी जात होतो. मुलं त्यांच्या घोषणेत आणि प्रभातफेरीत गुंग होते. त्यातल्या एका विद्यार्थ्याला अचानक काहीतरी सुचलं त्याने पटकन एक छोटंसं फुल तोडून हातात दिलं. ते इतकं सुखद होतं काय सांगू. पुढे काही शिक्षकांचा गट होता त्यांनी थांबवून विचारपूस केली. आणि शुभेच्छा दिल्या. हे सगळं पाहून खूप छान वाटत होतं. ऊर्जा मिळत होती. वाटेत रिक्षा चालक, ऍम्ब्युलन्स, बाईकस्वार भेटले तलासरी सोडू का विचारत होते. तेव्हा त्यांनाही उद्देश सांगत होतो. खारी-बिस्कीट विक्रेता, भाजी विक्रेता जाताना घोषणा देत होते. कवाडा येथे पोहोचण्याआधी प्रयोगशील शिक्षक ज्ञानेश्वर सरक यांना फोन केला. ते म्हणाले आमच्या शाळेतले काही मुलं घेऊन येतो. आम्ही तुमच्यासोबत काही ठराविक अंतरापर्यंत चालू. तितकंच आमचं योगदान असेल. हे ऐकून खूप बरं वाटलं. कवाडा पोहोचल्यावर सरांनी खाण्यासाठी केळी वगैरे घेऊन दिली. आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी परिचय करून देऊन दोनशे मीटर सोबत चालले. पुढच्या नियोजनात त्यांनीही सहकार्याची भूमिका बजावली.

प्रयोगशील शिक्षक सरक सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत.

विकास आणि परमेश्वर चा फोन आला ते उंबरगाव पोहोचले होते. मुळात जो संदेश द्यायचा आहे ती पाटी पूर्ण करण्याचं काम बाकी होतं. त्यादिवशी ऊन असल्यामुळे घरून उशिरा निघणं टाळत होतो. त्या संदेश पाटीचं काम पूर्ण करून त्यांनी तलासरीला मला गाठलं. तिथून एक सुरक्षित बाजू म्हणून विकासला बाईकवरच रहा म्हणून सांगितलं आणि परमेश्वर संदेशाचा फलक घेऊन सोबत चालणार होता. १७ किलोमीटरचा पहिला टप्पा पार करत आम्ही तलासरीत पोहोचलो. आमचे हक्काचे सहकारी राजूभाऊंकडे चहापाणी झाला. आणि या कार्यात त्यांनीही सहकार्याची भूमिका बजावली. दिवसभराचे नियोजन आणि मार्ग कसा असेल याची मांडणी करून पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत तलासरीच्या बाजारात प्रत्येक ठिकाणी तिरंगा ध्वज दिसत होता. दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी आम्ही ठिकाण शोधत होतो. तिथल्याच एका व्यक्तीला विचारलं त्यांनी बसायला सांगितलं पाणी दिलं. त्यातल्या एकाने परिचय करून दिला. ते म्हणाले हे नगरसेवक आहेत आशीर्वाद रिंजड. त्यांनीही माहिती घेतली. बाराखडी बद्दल ते आधीच ऐकून असल्याचे समाधान वाटत होते. एका फोरव्हीलर मधून कोणीतरी आमचे फोटो काढत असल्याचे समजलं जवळ गेलो तर ते बिल्डिंगमध्येच राहणारे महाजन दाम्पत्य होते. चांगल्या कामाची सुरवात करत आहेत म्हणून त्यांनी पेढा वगैरे भरवला.


कुर्झे फाट्यावर जेवण वगैरे करून आम्ही उधवा मार्गाला निघालो. मार्गावर जाताना अनेक सहकारी भेटत होते. दुपारची वेळ झाली होती. ऊन आणि त्यात हलक्या पावसाच्या सरी सुरूच होत्या. उधवा बाजारात पोहोचल्यावर तिथला संपूर्ण परिसर तिरंग्याने सजलेला होता. प्रत्येक दुकान आणि घरावर भारतीय ध्वज होता. तिथल्या एका गृहस्थाने फलक वाचले आणि त्याच्या सहकारी मित्राला बोलवत संवाद साधला. उधवा येथे आम्हीही काहीतरी सामाजिक कामं करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा आम्हाला माघारी निघायचं असल्यामुळे आम्ही तेथून लवकर निघालो. उधवा ते दापचरी(कुर्झे) मार्गे प्रवास करत होतो. वीर सावरकर रक्तदाता संघांचे कार्यकर्ते तलासरीत राहतात. त्यांनी तलासरीच्या वनवासी प्रकल्पात राहण्याची व्यवस्था केली. तिथे निवासी शाळा असल्यामुळे मुलांशी संवाद साधायला जमणार होतं. संध्याकाळी सात वाजता ३५ किलोमीटरचा पल्ला पार करत आम्ही प्रकल्पात आलो. तेथे फ्रेश झालो आणि तेथेच जेवणाची व्यवस्था झाली. वनवासी प्रकल्पातील माजी विद्यार्थी संजय सक्ते प्रकल्पात येऊन विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम घडवत असतात. त्या प्रकल्पातच मुलांना संस्काराचे धडे देणारे पाठक सर भेटले. मूळचे पुण्याचे पण तलासरीत सेवा म्हणून हे काम पाहतात. विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग ते घेत असतात. विविध कार्यात मुलांना ते घडवत असतात. प्रकल्पात आम्हाला एक सेवाभावी व्यक्तीसोबत भेट झाली. फाटक सरांनी त्यांचा परिचय करून दिला. तेथे स्वच्छतेचं कामं पाहणारी व्यक्ती आता त्यांचं नाव आठवत नाही. पण त्यांनी आम्हाला 'बलसागर भारत होवो' हे गीत ऐकवून आमचं मन तृप्त केलं. रात्री लवकर झोपल्यावर सकाळी सात वाजता संवादाचा कार्यक्रम ठरलेला होता. सकाळी सभागृहात पोहोचण्याआधी विद्यार्थी तेथे वाट पाहत होते. सकाळची प्रार्थना संपवून त्यांच्याशी संवाद सुरु झाला. तेथील शिक्षिका किर्दत मॅडम परिचयाच्या असल्यामुळे त्यांच्याकडून समजलं होतं की इथली मुलं पुस्तकं वाचतात. त्यांच्याशी संवाद साधून ते समजत होतं. बाराखडी, पुस्तक वाचन याबाबत विद्यार्थ्यांशी बोलून आम्ही तेथून बाहेर पडलो. तलासरी येथे पोहोचताच योगेश पवार पण आमच्यासोबत जोडले गेले. त्यांनीही संपूर्ण दिवस पायी प्रवास करण्याचे ठरवले. 


१४ ऑगस्ट कॉ. गोदावरी परुळेकर यांची जयंती असल्यामुळे कॉ. गोदावरी कॉलेजची मिरवणूक निघणार होती. आणि तेव्हा कॉलेज सुरु होते. जगदीश पाटील सर आणि दीपक वाकोडे सरांशी संपर्क केला त्यांना म्हणालो, विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. त्यांनी तात्काळ होकार दिला. मिरवणूक सुरु होण्याआधी आम्ही तेथे पोहोचलो. 'बाराखडी आणि वाचन संवाद' उपक्रम सुरु का केला व हा अट्टाहास कशासाठी हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं. त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला. तिथून बाहेर पडल्यावर कॉलेजचे प्राचार्य श्री. राजपूत सर म्हणाले परवाचा मुलींचा कार्यक्रम छान झाला. दोन दिवसांपूर्वी मुलींसाठी आयोजित केलेला मासिक पाळीचा कार्यक्रम त्यांच्या लक्षात होता. त्यात मी अजिबात त्यांच्या समोर नव्हतो. त्यांच्या कानी फक्त नाव गेलेलं आणि ते त्यांनी बरोबर हेरलं. आपण करत असलेल्या उपक्रमांची नोंद होत आहे याचा आनंद वाटत होता.

कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना.

कॉलेजमधील कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही तलासरी नाक्यावरून अच्छाड मार्गे जाण्याआधी पहिल्या दिवशी राहण्याची व्यवस्था करणारे संतोष पिंगळे यांच्याशी भेट घेतली. दिवसभराचा अनुभव शेअर केला. आणि पुढे जाण्यासाठी निघालो. सावरोली नजिक वरवाडा आश्रमशाळेत कार्यक्रम करण्याचे ठरत होते. पण तिथल्या सदगृहस्थांनी काही कारणास्तव नकार दिला. थोडं नाराज झालो पण मग अच्छाड आमगाव करत डोंगरी-संजान मार्गे अगदी गुजरात सरहद्दीवरून आम्ही उंबरगावकडे जात होतो. दुसऱ्या दिवसाच्या व्यवस्थेसाठी कोणाला त्रास देण्यापेक्षा स्वतःच्याच घरी वस्ती करण्याचे ठरले. दुसऱ्या दिवसाची वस्ती घरीच करायचे ठरवल्यावर १५ ऑगस्टच्या तयारीला लागत होतो. वेवजी येथील जिल्हा परिषद वांगडपाडा या शाळेत लायब्ररी सेटअपसाठी जिओलाईफ(Geolife) युथ क्लब तर्फे पुस्तकं देण्यात आली होती. ही पुस्तकं देऊन आमचा सुरु असलेला पायी प्रवास म्हणजेच 'शाळा भेट अन् वाचन संवाद' उपक्रमाची सांगता होणार होती. वांगडपाडा जाताना वाटेत जिल्हा परिषद शाळेचे विणेश धोडी सर, अविनाश सर, रुपेश सर भेटले त्यांनीही फोटो घेत उपक्रमाचं कौतुक केलं. त्याच मार्गाने शाळेत निघालेले परिचित शिक्षक वर्ग आवर्जून हात दाखवत पुढे जात होते. वांगडपाडा शाळेत वर्षभरापूर्वी भेटी देऊन गेलो होतो. त्यामुळे तेथील शिक्षक वर्ग परिचित होता. आम्ही फक्त पुस्तकं देण्यासाठी तेथे गेलो होतो पण त्यांनी आम्हाला पाहुण्यांचा मान दिला हा तिथल्या मुख्याध्यापकांचा मोठेपणा. ध्वजारोहण त्यांनी बाराखडीच्याच सदस्याकडून करवून घेतले. विद्यार्थ्यांची भाषणं आणि देशभक्तीपर गीतं सुरु होती. मन अगदी भारावून गेलं होतं. त्यात श्रावणाच्या सरी अधूनमधून बरसत होत्या.


जिल्हा परिषदेची मराठी शाळा ह्यांना काय हिंदी-इंग्रजी येईल असे अनेकदा टोले बसत असतात. पण हे सारं इथल्या विद्यार्थ्यांनी खोटं ठरवलं. सगळ्यांसमोर हिमतीनं उभं राहून इंग्रजी आणि हिंदीत भाषणं केली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण आटोपल्यावर त्यांना पुस्तकं दिली. सर्वांचे मनोगत झाल्यावर आदिवासींचे प्रसिद्ध लोकनृत्य तारपा यावर सगळ्यांनी ताल धरत नाचायला सुरवात केली. देश स्वातंत्र्याचा खरा आनंद इकडे वेगळ्या पद्धतीत साजरा होत होता. बारड्याच्या डोंगरावरचा रस्ता चुकल्यावर आम्हाला योग्य मार्ग दाखवणारे याच शाळेतले विद्यार्थी होते. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या शाळेत आता पुस्तकं आली. मुलांना छान छान गोष्टी वाचायला मिळाव्यात आणि त्यांनी त्या वर्गात सादर कराव्यात. इतकीच इच्छा मनात आहे.

प्रवासादरम्यानचे सोबती योगेश पवार व परमेश्वर.

दोन दिवसाच्या प्रवासात ६५ किलोमीटर पायी चालणं झालं. या दोन दिवसांत अनेक अनुभव आले. इतका प्रवास पायी आपण आरामात करू शकतो. असं म्हणत उगाचच स्वतःचं कौतुक वाटू लागलं. प्रवासात भेटणारी माणसं निराळी होती. कोणी आवर्जून भेट घेऊन विचारपूस करत होते तर कोणी लपून फोटो घेत होते. तुम्ही घरोघरी तिरंगा उपक्रमाचा सर्व्हे करत आहात का? असेही काही मजेशीर प्रश्न लोकांकडून ऐकायला मिळाले. जसं की मी आधीच म्हटलं आमचं नियोजन थोडं चुकलं होतं त्यामुळे आठ ऐवजी फक्त तीन शाळांना भेटी देता आल्या. पण या व्यतिरिक्त सकारात्मक बाब अशी की आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथपर्यंत बाराखडी पोहोचत होती. याच दरम्यान रस्त्यात पडलेले ध्वज उचलण्याचे काम आणि त्यासोबतच ध्वज काठीमुळे वाकला असेल किंवा उलटा लावला असेल तर ते सरळ करण्याचे काम आम्ही करत होतो. दोनेक ठिकाणी उलटा ध्वज लावणारे भेटले पण दोघीही कंपन्या बंद होत्या. ध्वज सरळ लावण्याचा प्रयत्न केला पण त्याची शिलाई संपूर्णपणे मारल्यामुळे आम्ही तो ध्वज सन्मानपूर्वक सोबत घेतला.

जिल्हा परिषद वांगडपाडा शाळा.


दोन दिवसांच्या प्रवासात आम्ही खूप काही शिकलो. स्वतःच्या काळजीपोटी सुरक्षिततेची आम्ही अनेक साहित्य घेऊन निघालो होतो पण त्याची फारशी आवश्यकता भासली नाही. ही मोहीम बऱ्यापैकी घडली. आता पुढे काही आणखी वेगळी मोहीम घेता येते का पाहू. वाटेत भेटणाऱ्या सर्वांनी मनोभावे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार.... आणि या मोहिमेत संवाद घडवण्यासाठी ज्यांची मदत मिळाली त्यांचेही खूप आभार...


© शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"