'उत्सव कलाम' उपक्रम-२०२२
बाराखडीच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयात दरवर्षी 'उत्सव कलाम' उपक्रम राबवत असतो. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम सुरु केला. उपक्रमाचे पहिले वर्ष २०१९. तलासरी तालुक्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्य उद्देश होता की विद्यार्थ्यांने अवांतर विषयावर चर्चा केली पाहिजे त्याचे शोध घेतले पाहिजे. म्हणून पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘मी शास्त्रज्ञ झालो तर’, ‘मानवाने विज्ञान उपयोगी लावलेला महत्त्वपूर्ण शोध’, ‘भारत आणि अवकाश संशोधन’ आणि ‘भारतीय उपग्रह माहिती व उपयोग’ हे चार विषय दिले होते. विषय जरा कठीणच होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी उत्तम निबंध लिहिले होते. महत्त्वपूर्ण शोध या विषयात वीज, सायकल, गॅस या विषयांवर लिहिले गेले; पण आम्हाला त्यांतील एक विद्यार्थी असा मिळाला, की त्याने ‘स्क्रू’विषयी माहिती लिहिली. त्याचे नाव मनोहर धोडिया. त्याने त्याच्या निबंधात मांडले होते, की स्क्रूशिवाय पंखा फिरणे शक्यच नाही हे नववीच्या विद्यार्थ्याला सुचणे आम्हाला आनंददायी वाटले. काहींनी कलाम यांच्याविषयी छानपैकी माहिती लिहिली. ‘इस्रो’चे सध्याचे अध्यक्ष के. सीवन यांचाही वारंवार उल्लेख वाचण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘चांद्रयान-२ ही मोहीम कशामुळे अयशस्वी झाली? आणि ती यशस्वी होईलच. आता नाही झाली तर पुढे होईलच आणि भारत एक शक्तिशाली देश बनेल.’ असे सारे भरभरून लिहिले.
![]() |
| उत्सव कलाम २०१९ |
कोरोना काळामुळे एक वर्षाचे अंतर पडले. २०२१ सालच्या उपक्रमात विद्यार्थ्यांना कोरोना संबंधितच विषय दिले होते. विद्यार्थ्यांनी निबंधात कोरोना काळातील अनुभव कथन केलं. त्यांना इतक्या मोठ्या सुट्टया पहिल्यांदाच अनुभवयास मिळाल्या होत्या. हळूहळू ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सुरू झाला. ऑनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. बहुतांश स्पर्धक ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोनची अडचण व्हायची. फार कमी लोकांकडे स्मार्ट मोबाईल. त्यात अगदी पाड्यात असल्यामुळे नेटवर्कची अडचण अशा अनेक समस्या त्यांना उद्भवल्या. कोरोना आजार म्हणजे काय हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या परीने मांडले होते. त्यात स्वच्छता आणि मास्क याच्या वापराविषयीदेखील सांगितलं. मागच्या उपक्रमापेक्षा यावेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. उत्सव कलाम उपक्रम यावर्षीही राबवणार आहोत. मुळात यावर्षी जरा वेगळी संकल्पना घेऊन आलो आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या सहा विषयांपैकी एका विषयाची मांडणी पाच ते सात मिनिटात सादर करायची आहे.
![]() |
| उत्सव कलाम उपक्रम २०२१ |
तुमच्या जवळच्या परिसरात विशेष काम करणारी व्यक्ती अर्थात व्यक्तीपरिचय, मियावाकी संकल्पना, पेट्रोल आणि विजेवर चालणारी वाहने व प्रदूषण, नमामि गंगे, GDP, वनहक्क कायदे हे विषय आहेत. स्पर्धेचे विषय वेगवेगळ्या धाटणीचे आणि संशोधनपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेगळ्या विषयांबद्दल चर्चा होईल, व्हिडीओ बनवताना ज्ञान वाढीस लागेल. तसेच हे विषय समाजाशी निगडित असल्याने हेच व्हिडीओ जेव्हा ऑनलाईन(बाराखडीच्या सोशल माध्यमातून) पोस्ट केले जातील तेव्हा त्यातून समाजप्रबोधन घडेल. आणि विद्यार्थ्यांची ओळख, चर्चा, मुलाखत त्यांच्याच परिसरातील विशेष/प्रयोगशील माणसाशी होईल. त्यातून त्यांना समाजात डोळसपणे पाहायचा विचार मिळेल याशिवाय आपल्या समाजातील प्रयोगशील माणसं आपल्यालाच कळतील. अशी माणसं की ज्यांचं काम अजून लोकांपर्यंत पोचलेलं नाही. यावर्षीच्या स्पर्धेतून हेच साध्य करायचं आहे. त्यामुळे आमची ही छोटीशी धडपड सुरु आहे. क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाशी किंवा कलाम यांच्याशी निगडित असलेली पुस्तकं बक्षीसरूपात देतो. यंदाचे हे तिसरे वर्ष. विद्यार्थ्यांनी आवर्जून या स्पर्धेत सहभागी व्हावं हीच अपेक्षा आहे.
- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा