अनाथांची अम्मा...

महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत असलेल्या दहाड गावात 'समारिटन चिल्ड्रन होम' नावाचे अनाथाश्रम आहे. समारिटन म्हणजे 'चांगल्या सेवेचं घर'. या चांगल्या सेवेची सुरवात मुंबईच्या मारिया स्टेल्ला यांनी केली. आश्रमातील मुलं-मुली त्यांना प्रेमाने अम्मा म्हणतात. अम्मा मुळच्या दक्षिण भारतीय पण त्यांचं बालपण आणि शालेय शिक्षण भांडुप येथेच झालं. अम्माच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला लहानपणीच सोडून दिलं. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची झाली होती. अम्मा आणि त्यांची मोठी बहीण नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते. कमावता माणूस घरात नसल्याने लहानपणीच जबाबदाऱ्या आल्या होत्या. मोठ्या बहिणीने शिकलं पाहिजे म्हणून अम्माने कामाला जायला हवं असा त्यांच्या आईचा आग्रह असायचा. अम्मा शाळेत हुशार होत्या. शाळेतल्या विविध खेळांत त्या सहभागी होत. त्यांच्या आई म्हणायच्या, मोठी बहीण शिकून स्थिरस्थावर झाली की लहान बहिणीला पुढे नेईल.

समारिटन चिल्ड्रन होम 

अम्मा वयाच्या बाराव्या वर्षी एका साडीच्या दुकानात कामाला लागल्या. सकाळच्या सत्रात शाळा आणि दुपारी काम असं त्यांचं सुरु असायचं. अम्माच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. आणि त्या पोरक्या झाल्या. आई-वडील सोडून गेल्यावर आयुष्यात काय घडतं. हे त्यांनी बालपणी अनुभवलं होतं. अम्माला त्यावेळी सतत वाटायचं की माझ्यासारखे असे कैक असतील त्यांचं काय होत असेल बरं? या पोरकेपणातही त्यांनी शिक्षण आणि काम सुरु ठेवलं. अम्मा मुंबईत एका हुकच्या कंपनीत कामाला लागल्या. त्यांच्या कंपनीजवळ एक टायरची कंपनी होती. तेथे काम करणाऱ्या देवा असिरवथम यांच्याशी त्यांचा परिचय आणि त्यांनी मैत्री करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८८ साली त्यांनी लग्न केलं. अम्माचे बालपण आणि ध्येय त्यांना ठाऊक होते. त्यांनी अम्माला धीर देत शिक्षणासाठी सहकार्य केलं. शिक्षण घेऊन आश्रमात काम करण्याचे अम्माने ठरवले होते. १९९४ साली गोवंडीच्या एका अनाथ आश्रमात त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. तेथे त्यांनी शिक्षण आणि आश्रमातील मुलांकडे लक्ष देणं हे सतत चार वर्ष सुरु ठेवलं. या कामाचा अम्माला चांगला अनुभव मिळाला. अनाथांसाठी काहीतरी सुरु करण्याचं मिशन त्यांच्याकडे होतंच. या अनुभवामुळे त्यांना एक दिशा मिळाली होती.

आश्रमातली मुलं जेवणाआधी प्रार्थना बोलतात.


अम्माचे पती देवा यांचे उंबरगावला(गुजरात) नातेवाईक असल्यामुळे त्यांचे सतत येणे जाणे असायचे. आणि या ओळखीतूनच त्यांनी आणि अम्मानी उंबरगाव येथे स्वतःचं आश्रम सुरु करण्याचा घाट बांधला. २००० साली ते उंबरगावमध्ये आले आणि तेथील जवळपासचा भाग सर्व्हे करून अकरा अनाथ मुलांपासून सुरवात केली. उंबरगाव समुद्र किनाऱ्याजवळील वृंदावन स्टुडिओजवळ भाडेतत्वावर जागा घेऊन तेथे अनाथाश्रम सुरु केलं. तेव्हा काहींनी विरोध केला आणि काहींनी सहकार्य केलं. ज्या मुला-मुलींना आश्रमात आणलं त्या प्रत्येकाचं शिक्षण पूर्ण व्हावं ही अम्माची जिद्द असायची. त्या स्वतः जवळच्या शाळांमध्ये जाऊन शालेय प्रवेशाची माहिती घेऊन मुलांना प्रवेश मिळवून द्यायच्या. कोणी आजारी पडलं तर स्वतः त्याला दवाखान्यात घेऊन जात. आज त्या आश्रमाला बावीस वर्ष झाली आहेत. भाडेतत्वावर असल्यामुळे आणि मुला-मुलींची संख्या वाढत असल्यामुळे बावीस वर्षांत अनेकदा अनाथाश्रमच्या जागा त्यांना बदलाव्या लागल्या. २००६ साली उंबरगावला के.सी.सी. कंपनीने एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात आश्रमच्या स्टेल्ला अम्मा यांना देखील बोलावले होते. त्या कार्यक्रमादरम्यान कलाम यांच्याबरोबर भेट झाली होती.


उंबरगावच्या एका कार्यक्रमात अम्मा आणि माजी राष्ट्रपती कलाम यांची भेट.


सध्या हे आश्रम दहाड येथे स्थित आहे. दीड वर्षांपासून ते पंचवीस वर्षांपर्यंत मुलं-मुली या आश्रमात आहे. मुलं आणि मुली दोहोंची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. एकूण पंचावन्न मुलं-मुली आश्रमात आहेत. आश्रमात काही कार्यक्रम किंवा पाहुणे आले की सगळे जण एकत्र येतात. अम्माने आतापर्यंत पंधरा-वीस जणांची लग्न देखील लावून दिले आहेत. त्यांतील काही जण आश्रमासाठी आर्थिक सहकार्य मिळवून देत आहेत तर काहींनी स्वतःला आश्रमासाठी वाहून घेतलं आहे. ज्यांनी बऱ्यापैकी शिक्षण घेतलं आहे ते कामासाठी जवळील जि.आय.डी.सी. भागात जातात. कमवून आणलेले पैसे अम्माकडे देत. मुलाच्या भविष्याकरिताच त्याच्या पैशाचा वापर व्हायला हवा असे नियोजन अम्मा करत. जेवण बनवण्यापासून ते सगळं आवरण्यापर्यंतच्या कामांना अम्मा स्वतः हातभार लावत असतात. अनेक व्यक्ती वाढदिवस किंवा सण साजरा करण्यासाठी येत असतात. अम्माने पै-पै जमवून साठवलेल्या रकमेतून आश्रमासाठी गोवाडा येथे स्वतःची जागा घेतली आहे. आता हळूहळू तेथे कामाची सुरवात होणार आहे. आश्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अम्मा सहकार्य करण्याची विनंती करत असते. कारण लोकांच्या सहकार्याने आणि आधारानेच एक चांगलं कार्य घडणार असतं. तुम्हाला देखील या आश्रमास सहकार्य करायचे असेल तर जरूर संपर्क करा.


समारिटन चिल्ड्रेन होम, दहाड.

स्टेल्ला अम्मा  ९३२७१७३२२१


- शैलेश दिनकर पाटील


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"