खगोलीय आवड जपणारा अवलिया...

माणसाला एखाद्या विशेष क्षेत्राची आवड असते. आणि तो त्या क्षेत्राचा समाजासाठी चांगला वापर करून घेत असतो. अशाच एका गृहस्थाशी परिचय झाला. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील कासा गावात राहणारे चंद्रकांत घाटाळ. त्यांचे वय पंचेचाळीस वर्ष. त्यांनी शालेय शिक्षण कासा येथे मराठी माध्यमातूनच पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असताना चंद्रकांत यांना अवकाश आणि एलीयन्स या विषयांचे प्रचंड आकर्षण होते. त्यांना त्या विषयीचे सतत प्रश्न पडायचे. अवकाश मोहिमेबाबत एखादी बातमी समजली की ते आवर्जून त्याची सखोल माहिती घेत. त्यांनी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली. शिक्षण सुरु असताना नोकरी शोधण्याचा मार्गही सुरुच होता. त्यांनी चेंबूर येथील महाविद्यालयात बी.एडला प्रवेश घेतला. घर दूर असल्यामुळे ते वरळी येथे राहत. शिक्षण सुरु असताना देखील चंद्रकांत यांचे मन अवकाश निरीक्षणात रमायचे. महाविद्यालयातून त्यासंबंधीचे पुस्तक घेऊन वाचन करायचे.

चंद्रकांत घाटाळ

शिक्षणासाठी मुंबईत स्थिरावल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिसराची चांगल्यापैकी ओळख झाली होती. वरळीला राहत असल्यामुळे नेहरू तारांगण त्यांना जवळ होते. सुट्टीच्या दिवशी ते तारांगणात जात. तिथे असलेल्या वस्तू ते बारकाईने अभ्यासत आणि तेथे सुरु असलेल्या व्याख्यानांना ते आवर्जून उपस्थित राहत. शिक्षण पूर्ण होत होतं. डहाणू प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेत त्यांना शिक्षक पदाची नोकरी मिळाली. तेथे त्यांचे मन फार काळ रमले नाही. त्यांनी शिक्षक पदाची नोकरी सोडली. पण त्याच दरम्यान त्यांना पार्ले टिळक विद्यालयात नोकरीची संधी चालून आली. पण त्यांनी मनी ठरवले होते की जे काही करायचं आहे ते आवडीच्या क्षेत्रातच. सगळं सोडून ते पुन्हा कासा येथे आले. उदरनिर्वाहासाठी शेती हे एकमेव माध्यम त्यांच्याकडे होते. राहत्या घरातल्या एका खोलीत त्यांनी निरीक्षण केंद्र उभारण्याची खटपट सुरु केली. नोकरी करून जमवलेल्या पैशांतून दुर्बीणी विकत घेतल्या. सध्या ज्याची आवश्यकता आहे तशा दुर्बीणी जमवल्या. २०१५ साली त्यांनी कासा येथे 'अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र' सुरु केले. त्या केंद्रात खगोलीय माहिती देणारे फलक लावले आहेत. तसेच आकाश निरीक्षणासाठी दुर्बीण उपलब्ध आहेत.

दुर्बीण आणि अवकाश निरीक्षणाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना.

वरळीत असताना सतत नेहरू तारांगणात जात असल्यामुळे तेथील अनेकांशी चांगला परिचय झाला होता. तारांगणाचे संचालक परांजपे आणि त्यांची टीम खगोलीय घटनेचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. आणि या निमित्ताने त्यांनी 'अनुजा अवकाश केंद्राला' भेट दिली. या भेटींमुळे केंद्राचे वलय वाढत होते. पालघर जिल्ह्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले जव्हार आणि समुद्र किनारपट्टी लाभलेला डहाणू परिसर या भागात शाळांच्या अनेक सहली येतात. या स्थळाना भेटी देत ते कासा येथील केंद्राला देखील भेट द्यायचे. मग या भेटीसोबत आकाश निरीक्षण, ग्रहण  गैरसमज, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांची माहिती ते देत. चंद्रकांत म्हणतात, येथे जेव्हा शाळेतले विद्यार्थी येतात आणि आवडीने प्रश्न विचारतात तेव्हा खूप बरे वाटते. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकाने जरी या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले तरी मी खूप समाधानी असेल. विद्यार्थी जेव्हा भेटीसाठी येतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाही.



फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रकांत केंद्राच्या कामाविषयीच्या पोस्ट करत असायचे. आणि याचा फायदा म्हणजे परदेशातील अनेक जण त्यांच्याशी जोडले गेले आहेत. भारतात नेमलेल्या नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी देखील केंद्राला भेट दिली आहे. या भेटींमुळे चंद्रकांत यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढत होता. या कामाचा परिणाम त्यांचा मुलगा अनुजवर झाल्याचं दिसून येतं. यावर्षी तो चौथी इयत्तेत शिकत आहे. फेसबुकवर बाल-ईरा नामक समूह आहे त्या समूहात विविध ठिकाणचे लहान विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्राची कला सादर करत असतात. अनुज अवकाश निरीक्षणाविषयी व्हिडीओ काढून अपलोड करत असतो. मुळात चंद्रकांत यांच्या गरजा फारच कमी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जे आहे त्यात ते फार समाधानी असल्याचे सांगतात. चंद्रकांत यांच्या कामात त्यांची पत्नी मालती आणि मोठे भाऊ अनंत घाटाळ यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळत असते. आपल्या घरातला माणूस काहीतरी चांगलं करत आहे आणि त्यातून समाजाचा फायदा होतं असेल तर उत्तमच आहे अशी भावना दोहोंच्या मनात आहे. अनंत घाटाळ यांच्या मुलीचेच नाव या निरीक्षण केंद्राला देण्यात आले आहे.

नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी समवेत चंद्रकांत घाटाळ.

चंद्रकांत यांनी 'डम्पी' नावाचं पुस्तक लिहायला घेतलं आहे. त्यात वैज्ञानिक कथा असतील. सदर पुस्तक २०२२ वर्षाअखेर प्रसिद्ध करण्याचे योजिले आहे. त्यांच्या कामाची नोंद म्हणून बोईसरच्या कार्यक्रमात पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटील प्रतिष्ठानच्या वतीने 'पालघर भूषण पुरस्कार' मा. खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते २०१६ साली मिळाला. यावर्षीच्या(२०२२) जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू व विश्वास फाउंडेशन यांच्यातर्फे पुरस्कारासाठी नामांकित केले गेले आहे. चंद्रकांत यांना एक मोठे अवकाश निरीक्षण केंद्र उभारावयाचे आहे. त्यासाठी ते मित्रांना आवाहन करत असतात. या क्षेत्रात आवड असणाऱ्यांनी किंवा सहकार्याची भूमिका घेत त्यांना मदत केल्यास पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात खूप मोठं काम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

  1. नांवातच " चंद्र " असल्याने , आणि
    योगा योगाने श्री. चंद्रकांत यानी सुरु केलेले हे अवकाश भ्रमणाचे कार्य नक्कीच स्तुत्य आहे. पालघर मधील जिथे स्थायिक मुलांना ईच्छा असून देखील खगोल शास्त्राचे योग्य
    मार्ग दर्शन अशा दुर्गम भागात दुर्लभ मुलांना असते अशा वेळी अशा मुलांसाठी तसेच नजिकच्या परिसरातील इच्छुक
    विद्यार्थ्यांसाठी चंद्रकांत यांनी सुरु केलेले हे
    सत्कार्य नक्कीच उपयुक्त ठरेल !
    ॥ शुभम भवतु ॥


    उत्तर द्याहटवा
  2. आपणही त्यांच्या केंद्राला भेट देऊया त्यामुळे आपल्यालाही अवकाशातील गमती जमती, खगोलीय ज्ञान, सृष्टीची रचना, या नेहमीच लहानपणापासून कुतुहल असलेल्या गोष्टींची उकल होईल....

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर..... अभिमान आहे चंद्रकांत दादाचा

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान sir!
    Aplya sarv प्रयत्नांना सलाम आहे sir!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"