स्थलांतरित प्रवासी

आज(१८ जून) कामावर जायला निघालो तेव्हा वाटेत एक व्यक्ती दिसला. त्याने त्याच्या बॅगेला भारतीय ध्वज बांधला होता आणि एक छोटी पाटी होती. मला जरा कुतूहल वाटले म्हणून त्याच्याकडे गेलो. त्याची माहिती घेतली. त्याचं नाव नरेश शिजापती. मूळचा नेपाळचा पण कामानिमित्त अहमदाबाद येथे आला. तो अहमदाबाद येथे पनाह फाउंडेशनसोबत नऊ वर्षांपासून काम करत आहे. पनाह फाउंडेशन स्थलांतरितांसाठी(migration) काम करते. कोविड काळात स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे. 

प्रवासी नरेश शिजापती

नरेश स्वतः स्थलांतरित(migrate) व्यक्ती आहे. चार वेळा त्याला स्थलांतर करावे लागले आहे आणि प्रत्येक ठिकाणी मिळणारा अनुभव वेगळा होता. त्याचं म्हणणं आहे की, कामगार वर्ग दिवसाचा तीनशे रुपये रोजगार कमावतो आहे पण त्याला हवा तसा सन्मान कोठे मिळतो? त्यांना कायम दुय्यम लेखलं जातं. अशा या कामगार वर्गासाठी त्याने संकल्प केला आहे. दहा राज्यातून तो पाच हजार शंभर किलोमीटर प्रवास करणार आहे. हा प्रवास नऊ महिने सुरू राहणार आहे. दहा राज्यच का? तर जेथे स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे अशाच ठिकाणी त्याने जायचे ठरवले आहे. या प्रवासाला १४ जूनपासून मुंबई येथून सुरवात केली. आजचा(१८ जून) त्याचा पाचवा दिवस. ठराविक रक्कम घेऊन प्रवास सुरु केला आहे. रात्री झोपण्याची सोय कुठे होईल माहीत नाही या अनुषंगाने संपूर्ण तयारीनिशी तो निघाला आहे. पण मागील तीन-चार दिवसांचा अनुभव सांगितला आणि म्हणाला, सतत कपडे बदली करणे किंवा रात्री झोपण्याकरिता बिछान्याची आवश्यकता नाही भासत. काल एका ढाब्यावर झोपलो त्याने खाट दिली आणि तिथे निवांतपणे झोप लागली.


तो आज(१८ जून) ज्या परिसरात(तलासरी) होता त्या परिसराबद्दल त्याला सांगितलं. काही कॉलेजची मुलं त्याच्यासोबत अर्धातास चालली. काहींनी त्याला सहकार्य म्हणून पैसे दिले. बोलता बोलता सहज त्याला विचारलं, आपकी शादी हुई है? तो म्हणाला, दो लडकी है. माझा लगेच पुढचा प्रश्न होता, तो आपके परिवारसे आपको कोई कुछ बोलता नही? हम को छोड के इतना दूर क्यू गये? वगैरा... तो म्हणाला, 'हम प्रवासी है. और प्रवासी का कोई ठिकाना नही होता. आज यहाँ तो कल वहाँ.' स्वतःचं घर-दार सोडून समाजाला प्रोत्साहित करण्याचं काम करणाऱ्या माणसांकडून बरंच काही शिकायला मिळतं.

- शैलेश दिनकर पाटील



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"