सृजन यात्रा सुरू होण्याआधी 'वयम्' चळवळीचे विनायक दादा यांना डोयापाडा गावच्या भेटीविषयी सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले आणि डोयापाडा येथील रघु दादाचा मोबाईल नंबर दिला. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड येथे 'वयम् चळवळ' काम करते. चळवळीचे मुख्य कार्यालय जव्हार येथे आहे. २०२० साली महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा गावात भेट देण्यासाठी आले होते अशी बातमी वृत्तपत्र आणि टीव्हीवरील न्यूज चॅनलवर झळकली होती. आता राज्यपाल त्या गावात भेट देण्यासाठी आले म्हणजे त्या गावाने काहीतरी चांगलं काम केलंच असणार. म्हणून त्या गावभेटीचे नियोजन ठरले. गावात ग्रामसभा भरवली होती. गावातले इतर मुद्द्यांसोबत सृजन यात्रेकरू भेट द्यायला येणार आहेत हा मुद्दा देखील निघाला. बाहेरची माणसं गाव पाहायला येणार म्हणून सगळ्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रकाश बरफ आणि रघु यांच्या बरोबर बोलल्यानंतर आमची भेट ठरली. फांगणे येथील आजीबाईंची शाळा बघून झाल्यावर आम्ही डोयापाडाच्या मार्गी निघालो. तीन तासांचा हा प्रवास होता. दुपारी दीडच्या दरम्यान गावात पोहोचलो.
 |
| सृजन यात्रेदरम्यान माहिती सांगताना रघुदादा |
डोयापाडा येथील लोकांनी एकत्र येऊन गावात केलेला अनोखा बदल पहायला मिळाला. आदिवासींच्या जमिनीवर वनविभागाची अरेरावी चालायची. जंगल क्षेत्रात लोकांना फिरू द्यायचे नाही. आणि दिसलेच तर त्यांच्यावर कार्यवाही करायची असे विविध प्रकार सुरू असायचे. गावातील काही जाणते माणसं अक्षरशः कंटाळले होते. त्यांना जव्हारच्या वयम् चळवळीबद्दल माहिती झाली. ही चळवळ गावकऱ्यांसाठी काहीतरी करते म्हणून त्यांच्याजवळ गेले. वयम् चळवळ वनहक्क, पेसा कायदा यांविषयी पाड्यांतील लोकांना माहिती देऊन चळवळ उभी करते. गावातली वने गावातल्याच लोकांच्या हक्काची आहे त्याचे संरक्षण गावातलेच लोकं करू शकतात. 'वयम्'ने डोयापाडा गावातील लोकांची परिस्थिती समजून त्यांना वनहक्क कायदा, पेसा यांची माहिती देऊन लढण्यास सांगितले. गावातली सगळी लोकं एकत्र आली आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने वन हक्क कायद्याच्या अंतर्गत एकूण दीडशे वन हेक्टर जमीन कायद्यानेच स्वतःच्या ताब्यात मिळवली. हा लढा खूप मोठा होता अनेकांना समजावणे आणि पुढील उद्दिष्ट काय याचे नियोजन करूनच या लढ्याला सुरवात केली. ही पहिली लढाई गावकरी जिंकले आणि पुढच्या कामांना स्फुरण मिळाले. चळवळीशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं.
 |
| रघुदादा, बाबल्या काका यांच्यासोबत. |
२०१५ साली डोयापाडाला संयुक्त वन हक्क प्राप्त झाले. या गावाने संयुक्त वनहक्क समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून नियमावली जाहीर केली. दीडशे वनहेक्टर जमिनीलगत कासपाडा, अळीवपाडा ही गावं देखील आहेत. समितीच्या माध्यमातून चराई आणि कुऱ्हाडबंदीचे नियम लागू केले. जंगलात कोणी झाडं तोडणारे दिसले की त्याला पाचशे रुपये दंड आणि ते जर कोणी निदर्शनास आणून देणार असेल तर त्याला पाच हजार रुपये बक्षीस असे जाहीर केले. यामुळे जंगलतोड साठी कोणी पुढे येईनात. समितीच्या वतीने जंगलात वृक्षारोपण करण्याचे ठरविले. वृक्ष लागवडीसाठी खड्डे श्रमदानातून खणले. गावकऱ्यांनी या वनक्षेत्रात एकूण नऊ हजार झाडे लावली. यात जांभूळ, मोह, मोगरा, करवंद, आंबा, ऐन इत्यादी झाडे लावलेली आहेत. मोहाच्या झाडांची चांगलीच वाढ झालेली आहे. झाडांच्या फुलांचा आलेला पैसा वाटणी करून प्रत्येक कुटुंबाला दिला जातो. आता या गावातली तरुण पिढी देखील स्वतःच लक्ष घालून आहे. रघुदादा आणि महेशदादा यांना वनहक्काच्या कायद्याविषयी पूर्णतः माहिती झाली आहे. वनहक्कक्षेत्रात मिळालेल्या जमिनीचे नकाशे देखील गावकऱ्यांनी बनवून ठेवले आहेत.
 |
| ह्या काकांनी तारपा वाद्य वाजवून त्यावर तारपा नृत्य केलं. |
रघुदादाला एक विनंती केली होती की, ही सर्व मंडळी दुरून आलेली आहे.
आदिवासी भागातील प्रसिद्ध तारपा वाद्य वाजवून जर त्यावर नृत्य झालं तर उत्तम होईल. आणि तशी सोय देखील झाली.
 |
| राज्यपाल यांच्यासमवेत वयम् चळवळीचे प्रमुख मिलिंददादा थत्ते |
डोयापाडा गावात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली असता त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, हे जंगल तुमचे आहे आणि त्याचे रक्षण तुम्हीच करायचे आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे गावकऱ्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.
- शैलेश दिनकर पाटील
पाटील सर ,खूप छान
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
हटवा