उत्सव कलाम' उपक्रम-२०२१

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाराखडीच्या माध्यमातून शाळांमध्ये दरवर्षी 'उत्सव कलाम' उपक्रम साजरा केला जातो. 'उत्सव कलाम' उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. या उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांकडून काहीतरी विशेष माहिती प्रदान होईल. एखाद्या विषयावर विचार करण्यास स्वतःला भाग पाडले. दीड वर्ष कोरोना आपत्तीमुळे शाळा, महाविद्यालय बंद होते. पहिल्या वर्षात(२०१९) ठराविक दोन-तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला होता. पण यावर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवू असे ठरले. बाराखडी उपक्रमाची रूपरेषा ठरली गेली. आधी शाळांना सहभागी करायचो पण आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील सहभागी करण्याचे ठरवले. कोरोना आपत्तीने बरंच काही शिकवल्यामुळे कोरोना सारखाच विषय घेऊन स्पर्धा घेण्याचे ठरले.


पहिल्या गटातील क्रमांक पटकावलेले विद्यार्थी

कोरोना आणि विज्ञान(कोरोनामध्ये विज्ञानाचा झालेला उपयोग), कोरोना आजार १९ व्या शतकात आला असता तर..., भविष्यात कोरोनासारखे आजार टाळण्यासाठी विज्ञान कसे सज्ज करणार? असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. ज्या शाळा आधी संपर्कात होत्या त्यांना पत्र पाठवण्यात आले. महाविद्यालयांना संपर्क करणे थोडे कठीण होते. तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तलासरीच्या दोन महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांशी संपर्क करून दिला.


कोरोना काळानंतर शाळा आणि महाविद्यालय नुकतंच सुरू झालं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय कदाचित जड जाणार होते. पण आणखी नवीन काही मिळते का यांच्या शोधात होतो. स्पर्धेसाठी कल्याण, मुरबाड, तलासरी इथल्या शाळा आणि महाविद्यालयातील एकूण त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी निबंधात कोरोना काळातील अनुभव कथन केलं आहे. त्यांना इतक्या मोठ्या सुट्टया पहिल्यांदाच अनुभवयास मिळाल्या होत्या. हळूहळू ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सुरू झाला. ऑनलाईन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. बहुतांश स्पर्धक ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोनची अडचण व्हायची. फार कमी लोकांकडे स्मार्ट मोबाईल. त्यात अगदी पाड्यात असल्यामुळे नेटवर्कची अडचण अशा अनेक समस्या त्यांना उद्भवल्या. कोरोना आजार म्हणजे काय हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या परीने मांडले आहे. त्यात स्वच्छता आणि मास्क याच्या वापराविषयीदेखील सांगितलं आहे. 

दुसऱ्या गटातील क्रमांक पटकावलेले विद्यार्थी

कोरोना आपत्तीचे निर्बंध लागू असल्यामुळे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. ज्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला होता त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत-महाविद्यालयात जाऊन प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देण्यात आलं. स्पर्धेत इयत्ता पाचवी ते नववी आणि दहावी ते बारावी असे दोन गट करण्यात आले. पहिल्या गटातून कल्याणच्या नूतन विद्यालयातील सायली एकुंडे(इ.सहावी), जिल्हा परिषद आरजपाडा शाळेतील रस्मिता इभाड(इ.नववी) व रुतिका काटेला(इ.नववी) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. तर दुसऱ्या गटातून तलासरी येथील कै. नथु ओझरे महाविद्यालयातील युवराज वाघात(बारावी) व निलेश बेंडगा(बारावी), आदिवासी प्रगती मंडळ संचालित ज्युनिअर महाविद्यालयातील रतन पाल(बारावी) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्मजीव, विज्ञान आणि वैज्ञानिक, अग्निपंख, मन्वंतर, अंतराळ आणि विज्ञान व अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा ही पुस्तके भेट देण्यात आली. पुस्तकं देण्यामागचा उद्देश इतकाच की विद्यार्थ्यांनी आणखी समृद्ध व्हावे.  या उपक्रमासाठी ज्या व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे मनःपूर्वक आभार!!

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"